मॅगी की बिर्यानी ?
By Admin | Updated: April 30, 2015 17:19 IST2015-04-30T17:19:52+5:302015-04-30T17:19:52+5:30
निर्णय तुमचा, पण बिर्यानी हवी असेल तर तयारी आधीपासून करावी लागते, दोन मिण्टात बिर्यानी शिजत नाही ! तसंच करिअरचं. कॉलेजातला मोकळा वेळ, भलीमोठी सुटी वाया घालवली तर नंतर बिर्यानी कमवण्याची ऐपत कशी येईल ! त्यासाठी आत्तापासूनच तयारी करायला हवी !

मॅगी की बिर्यानी ?
‘मला आठवतंय, 2007ची असेल ही गोष्ट. विभोर अग्रवाल नावाच्या एका तरुणाला मी बेंगळुरूमध्ये भेटले होते. तो आयआयटी मुंबईचा पासआऊट, बेंगळुरूत आयआयएम करून एका कन्सलटन्सी कंपनीत नोकरीला लागला होता. उत्तम पैसा कमवत होताच, पण ते सारं सोडून तो त्याच्या गावी मेरठला परत गेला!
मेरठ, उत्तरप्रदेशातलं. छोटंसं, अजिबात हॅपनिंग नसलेलं गाव. त्याच्या वडिलांचा तिथं बिझनेस होता. 1 कोटी रुपयांचा असेल टर्नओव्हर. विभोर म्हणाला, ‘ मी हा बिझनेस वाढवणार, शंभर कोटी रुपयांचा करून दाखवणार. सगळ्यांनी त्याला वेडय़ात काढलं. सबने बोला, पागल हो गया है! मीही म्हटलं करशीलही, काय सांगावं? त्यानंतर 2013मध्ये मी त्याला भेटले. शंभर कोटी नाही पण फक्त सहा वर्षात त्यानं बिझनेस 25 कोटींवर नेऊन ठेवला होता.
अर्थात सोपं नव्हतंच त्याचं काम. एकतर त्याला मेरठमध्ये माणसं मिळत नव्हती. चांगली कुशल माणसं फक्त नोकरीसाठी म्हणून त्या गावात येऊन रहायला तयार नव्हती. तो सांगत होता, कामगारांच्या मुलांचे शाळेत प्रवेश घेऊन देण्यार्पयत धावाधाव केली तेव्हा कुठे 20 लोकांचे 200लोक झाले.’
हे सारं करताना त्याला धडपड, मेहनत करावी लागलीच. ती सगळ्यांनाच कुठं ना कुठं करावी लागते, पण त्याच्या कामानं त्यानं आणखी एक गोष्ट केली. त्याच्या या मोठय़ा होत चाललेल्या व्यवसायानं त्याच्या शहराचंही व्यक्तिमत्त्व बदलण्यात मदत केली. ज्या शहरात काही स्कोप नाही, यहॉँ कुछ नहीं हो सकता असं लोकांना वाटत होतं. त्याच शहरात माणसं कामाला येऊ लागली. त्यानं स्वत:चा बिझनेस वाढवताना इतरांनाही कामं मिळवून दिली.
आणि आशा दिली की, यहॉँ बहुत कुछ हो सकता है।
ही वैभवची गोष्ट छोटय़ा शहरात राहणा-या अनेकांच्याबाबतीत खरी होऊ शकते. तुम्ही छोटय़ा शहरात, गावात राहतात. त्यावेळी वाटतं इथं काहीच घडत नाही. इथं काही संधी नाही. शिक्षणाच्या सोयी नाहीत. म्हणून मग शिकायला बाहेर पडून पुणं-मुंबई गाठता. तिथं नोकरीही मिळू शकते, पण शांत-सुंदर आयुष्य तुमच्या छोटय़ा शहरात आहे ते तिथं नाही !
आणि परत यायचं तर आपल्या शहरात आपल्या लायक नोकरी मिळत नाही. मग आपणच काही बिङिानेस का सुरू करू नये ? आपण कुणासाठी नोकरी करण्यापेक्षा स्वत: इतरांना काम देता येईल, असं काहीतरी करू! आपल्याच शहरात उत्तम काम, उत्तम पैसे मिळाले तर कोण कशाला जाईल मोठय़ा शहरात ?
तसंही आता तंत्रज्ञानामुळे तुम्ही कुठे बसून काम करता, याला फारसं महत्त्व उरलेलं नाही. मुंबईत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स अर्थात बीकेसीमध्ये ज्या प्रोफेशनली, इफिशियण्टली काम चालतं ते केलं तर बीकेसी काय आणि बुद्रूक काय काही फरक पडत नाही. तुमचा माइण्डसेट कसा आहे यानं फरक पडतो !
आणि तो माइण्डसेट तुम्हाला स्वत:ला घडवायला लागतो !
आणि मी गेल्या काही वर्षात अशी अनेक तरुण मुलं पाहिली आहेत, इंडियाज् झुकेरबर्ग, की ज्यांचं पहिलं ऑफिस हे त्यांची होस्टेलची रूमच असते. त्यांच्या बिङिानेसची सुपीक आयडिया ते कॉलेजात असतात तेव्हाच कामाला लागते. होस्टेलच्या छोटय़ाशा खोलीतच त्यांच्या बडय़ा उद्योगाचे ‘स्टार्टअप’ आकार घ्यायला लागतात. त्याला कॅम्पस स्टार्टअप्सच म्हणायचं खरंतर !
मी किती कॉलेजात लेर्स द्यायला जाते. विद्यार्थी भाषण कान देऊन ऐकतात.
भाषण संपल्यावर म्हणतात, ‘ हे सगळं मस्त आहे. कॉलेज संपल्यावर मी असंच काहीतरी करीन!’ किंवा काहीजण म्हणतात, ‘कॉलेज संपलं की काय करू सांगा?’
मी म्हणते, कॉलेज संपलं की ? मग आज कॉलेजात असताना एवढा वेळ मिळतो आहे, चिक्कार मोकळा वेळ हाताशी आहे, त्याचं काय करणार? हे दिवस, ही वेळ हातातून निघून गेली की कधीच परत येणार नाही. आयुष्यात परत कधीच इतका मोकळा वेळ मिळणार नाही !
माझं उदाहरण सांगते, कॉलेजात असतानाच मी लिहायला लागले होते. अहमदाबादला आयआयएममध्ये शिकत होते; मात्र फायनल सेमिस्टरच्या आधीच माझा निर्णय झाला होता की, मला लेखक व्हायचंय. क्रिएटिव्ह काम करायचंय. मी नाही कॅम्पस इण्टरव्ह्यूला जाणार ; मात्र या निर्णयार्पयत मी येऊ शकले कारण कॉलेजात असताना मी अनेक उद्योग करून पाहिले होते. वृत्तपत्रत लिहित होते, त्याआधी काही जाहिरात एजन्सीसाठी प्रॉडक्ट सव्र्हे केले होते. पण मला कळून चुकलं होतं की, लिहिलं की मला मस्त वाटतं. जास्त लिहिलं की मला जास्त छान वाटतं. मी प्लेसमेण्ट इण्टरव्ह्यूला जाणार नाही असं ठरवलं तेव्हा माझ्या हातात पत्रकार म्हणून एक नोकरी होती !
हे सारं जमलं ते मी त्याकाळात केलेल्या समर जॉब्जमुळे, इण्टर्नशिपमुळे आणि आपल्याला काय आवडतं हे समजून घेण्याच्या धडपडीमुळे !
त्यामुळे कॉलेजात फार अभ्यास असतो, बाकी काही जमतच नाही असं कुणीच सांगू नये !
सगळ्यांनाच माहितीये की कॉलेजमध्ये कुणीच ‘टू मच पढाई’ करत नाही. परीक्षेच्या दोन आठवडय़ांपूर्वी जो तो रट्टा मारतो. उत्तम अभ्यास करतो. बाकी वर्ष तसंच मोकळाच वेळ असतो.
आणि सुटीत तर वेळच वेळ असतो. त्यामुळे निदान सुटीत तरी पॉकेटमनीसाठी का होईना समर जॉब/समर इण्र्टनशिप करूनच पहायला पाहिजे ! अमेरिकेत मल्टीमिलेनियर असतील. वडील मुलाला बीएमडब्ल्यू घेऊन देतील, पण सांगतील पेट्रोल तुझं तू भर, त्यासाठी पैसे कमव !
आपल्याकडे तसं नाही ! काही मुलं मस्त होस्टेलवर राहतात, मजा करतात. पिङङो खातात. त्यांचे आई-बाबाही त्यांना भरपूर पैसे देतात. आई-बाबा तर काय एटीएम मशिनच होऊन गेले आहेत. लागले पैसे की मागायचे त्यांच्याकडे ! पण स्वत: मेहनत केली तर कळतं की फक्त तीन हजार रुपये मिळायलाही किती कष्ट करावे लागतात.
त्यामुळे समर जॉबकडे खरंतर संधी म्हणून पहायला हवं ! अशी संधी जी आपल्याला करिअरच्या वाटेर्पयत घेऊन जाईल.
राजस्थानातला एक ग्रुप. त्यांना करण्यासारखं काहीच नव्हतं. सहज आयडीया म्हणून त्यांनी एक इण्टरनेट बेस बिझनेस सुरू केला. एक वेबसाइटच. मग एक फेसबुकसारखंच अॅप्लिकेशन बनवलं. आणि नंतर इण्टरनेटवर जाहिरात कशी करता येईल याचं अॅप्लिकेशन बनवलं !
एकामागून एक धडाधड काम करत सुटले. रिकाम्या वेळातल्या उद्योगातून त्यांना खराखुरा उद्योग सापडला !
हे जर त्यांना ग्रामीण भागात बसून जमतं, तर बाकीच्यांना का जमू नये ?
पालकांकडून पैसे येण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा सरळ आपण आपले पैसे कमवायला लागावेत.
आता तर सर्रास समर व्हेकेशन जॉब मिळतात. समर इण्टर्नशिप स्वत:हून अनेक कंपन्या देतात. सव्र्हिस म्हणजेच सेवा क्षेत्र मार्केटिंग ते ऑनलाइन काम, यासह अनेक क्षेत्रत तरुण मुलं काम करू शकतात. आणि हा अनुभव आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
हा अनुभव, हे काम हेच तुमचं करिअर होईल असं प्रत्येकवेळेस होणार नाही. पैसेही कमी मिळतील, कदाचित मिळणारही नाही; मात्र त्यातून जे शिकायला मिळेल त्याला तोड नाही. ते सारंच तुमच्या व्यक्तिमत्त्वाला सुंदर आयाम देईल !
जेव्हा पदवीनंतर तुम्ही कुठंही मुलाखतीला जाल, तेव्हा स्पर्धा असेलच. या स्पर्धेत सगळ्यांच्या पदव्या सारख्या, बायोडाटा सारखे, सीव्हीही सारखेच !
मात्र तुमचा बायोडाटा तुमच्याविषयी त्या गर्दीतही वेगळं काहीतरी सांगेल ! तुमचे कष्ट, मेहनत, डेडिकेशन, तुमची धडपड आणि तुमचा अनुभव वेगळा ठरेल !
स्पर्धेत टिकायचं म्हणूनही आणि वेगळ्या, चांगल्या संधी आपल्याला मिळाव्यात म्हणूनही या कॉलेजातल्या सुटीकडे, आपल्या रिकाम्या वेळाकडे पहायला हवं !
केरळ सरकारनं तर हल्ली एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. देशात कामासाठी राज्यातून बाहेर पडणा:या लोकांमध्ये केरळी लोकही आघाडीवर आहेत. लोकांनी स्थलांतर न करता इथं उद्योगधंदे सुरू करावेत, इतरांना त्यातून रोजगार मिळावा असं सरकारचं धोरण. त्यासाठी ते स्टार्टअप्सना म्हणजे अगदी छोटय़ा उद्योगकल्पनांना पाठिंबा देत सहकार्य करत आहेत. कॉलेजात शिकणारी जी मुलं असा छोटा उद्योग-व्यवसाय-स्टार्टअप सुरू करतात त्यांना सरकार मदत करतंच. त्याचबरोबर त्यांची वर्गातली उपस्थिती कमी असली तर अटेण्डन्समध्ये सवलत दिली जाते.
हेतू काय, तर तरुणांनी आपल्या सुपीक कल्पक डोक्यातून एकसेएक उद्योग सुरू करावेत, वाढवावेत.
केरळ सरकार जे करतंय, ते आपल्या स्तरावर आपणही करू शकतोच !
समर जॉब केले, नवीन अनुभव घेतले, नवीन उद्योगासाठी खटपट केली तर आपले प्रोफसर, कॉलेजही मदत करतील !
आपली दृष्टी, जगाचं आकलन बदलेल आणि प्रोफेशनल जगण्याची पायाभरणीही जोरदार होईल !
आपल्याकडच्या मौल्यवान मोकळ्या वेळात एवढं जरी जमवलं तरी आपलं करिअरविषयी असलेलं कन्फ्यूजही दूर होईल. व्यवहार ज्ञानासह थोडय़ा पैशाची कमाई होईल ती वेगळीच !
करून पाहणं, हाच खरा तर हे करण्याचा सोपा मार्ग !
कर के देखो !!
-रश्मी बन्सल
(सुप्रसिद्ध लेखिका. स्टे हंग्री स्टे फुलिश, कनेक्ट द डॉट्स, राइज अवेक या पुस्तकांच्या लेखिका. मेहता पब्लिशिंग हाऊसने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी रश्मी नाशिकला आल्या होत्या. त्या कार्यक्रमात रंगलेल्या गप्पांचे हे संकलन)