मेसी चोटी, खोपा, घुंगरू, गुलाबमोगरा गजरा

By Admin | Updated: March 20, 2015 14:58 IST2015-03-20T14:58:34+5:302015-03-20T14:58:34+5:30

ट्रॅडिशनल आणि ट्रेण्डी लूक एकाच वेळी साधणारं एक नवं तंत्र; जे ‘लूक’ बदलवून टाकतं, त्याचंच नाव फ्यूजन!

Macy Peak, Khopa, Ghangru, Gulabogora Gajra | मेसी चोटी, खोपा, घुंगरू, गुलाबमोगरा गजरा

मेसी चोटी, खोपा, घुंगरू, गुलाबमोगरा गजरा

>- लीना खांडेकर (ब्यूटी एक्सपर्ट)
 
एरव्ही मॉडर्न लाइफस्टाइलचा कितीही मोह पडत असला आणि आधुनिक आणि ट्रेण्डी दिसण्यासाठी कितीही आटापिटा केला जात असला, तरी लग्न ठरलं की अनेकींच्या मनात एकच प्रश्न घर करतो!
लग्नाच्या दिवशीच्या लूकचं काय?
आणि त्यातही पहिली अट असते की, लूक एकदम ट्रॅडिशनलच दिसला पाहिजे.
खरंतर हाच एक मोठा ट्रेण्ड आहे की, आपल्या लग्नात आपण पारंपरिक लूकमधे दिसावं, सुंदर आणि टिपिकल नववधूसारखं!
त्यामुळे मुली वारंवार सांगतात की, एकदम ट्रॅडिशनल लूक दिसला पाहिजे!
पण हे सांगताना त्यांची अडचण अशी असते की, लग्न समारंभ एका दिवसात कोंबलेला. विधी-लग्न आणि रिसेप्शन सगळं एकाच दिवशी, एकदम बॅक टू बॅक. 
मग नऊवारी नेसायची म्हणून खोपा घातला, एकदम ट्रॅडिशनल हेअरस्टाईल केली, तर मग रिसेप्शनचं काय करायचं? कारण पुन्हा हेअरस्टाईल आणि मेकअप बदलायला वेळच नसतो. बरं रिसेप्शनच्या आधुनिक वर्कवाल्या डिझायनर साडीवर खोपा म्हणजे काहीतरीच दिसणार!
घोळ होतो तो इथेच!
मात्र तरीही मधला मार्ग काढला जातो. त्याला म्हणतात फ्यूजन!
लग्नसराईच्या काळात हे फ्यूजन सध्या खूप सुंदर काम करतं आहे. नव्याजुन्याचा मेळ घालणारा हा मेकअपचा एक नवा ट्रेण्ड.
म्हणजे काय तर हेअरस्टाईल करताना अनेकदा पुढच्या बाजूनं पारंपरिक हेअरस्टाईल केली जाते. आणि मागच्या बाजूनं आधुनिक लूक असलेली हेअरस्टाईल करण्यात येते. म्हणजे काय तर पुढच्या बाजूनं खोप्यासारखी रचना, त्यात पारंपरिक सोन्याची कर्णफुलं माळली जातात. विधींच्या वेळेस असं वाटतं की, नवरीनं खोपाच घातला आहे. नऊवारीवर पण तो खोपा खूप सुंदर दिसतो.
मागच्या बाजूनं मात्र एका साइडनं ब्रूच लावलं जातं. लग्नानंतरच्या रिसेप्शनच्या साडीवरपण मग ती हेअरस्टाईल शोभून दिसते.
हे असं फ्यूजन आता आम्ही अनेक गोष्टीत करतो. 
कारण एकच, मुलींना ट्रॅडिशनलही दिसायचं असतं आणि आधुनिकही. एकाच दिवसात दोनदोन फंक्शन्स असतात. आणि वेळ कमी असतो.
मग हेअरस्टाईल्समधे जसं फ्यूजन केलं जातं तसंच फ्यूजन मेकअपमधेही केलं जातं!
विशेषत: ब्राईडल मेकअपमधे असं फ्यूजन तर करतातच; पण ज्यांना मैत्रिणीच्या, भावाबहिणीच्या लग्नात मिरवायचं असतं तेही फ्यूजन लूकलाच प्राधान्य देतात.
त्यामुळे या लग्नसराईत जर तुम्हाला ही ट्रॅडिशनल-ट्रेण्डी कसरत करायची असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात!
तसं पाहता हा नवा ट्रेण्ड आहे खूप सुंदर फक्त तो आपल्याला नीट कॅरी करता आला पाहिजे, आणि आपल्याला नक्की हवं काय हे कळायलाही पाहिजे!
तर तुमचा स्पेशल ‘लूक’ एकदम ‘खास’ आणि ‘यादगार’ ठरू शकेल!!
 
 
१) स्वत:च्या किंवा इतरांच्या लग्नात नऊवारी नेसणार असाल तर त्याला ट्रॅडिशनल मेकअप, हेअरस्टाईल, दागिने याची जोड द्यावी लागेल हे लक्षात ठेवा. 
२) नऊवारीवर मोत्याचे दागिने जास्त सुंदर दिसतात. पारंपरिक सोन्याचे दागिनेही हवेतच. पण एवढे सगळे सोन्याचे दागिने कुठून आणणार? पण हल्ली मोहनमाळ, कोल्हापुरी साज, ठुशी, फुलं, चंद्रहार, पोहेहार, तोडे, गोठ हे सगळं एक ग्रॅम सोन्यात मिळतं. बहुतेकजणी हेच दागिने वापरतात. सोन्याचा दागिना एखादाच असतो. त्यामुळे एक ग्रॅमचा ऑप्शनही लक्षात ठेवा.
 
३) लायनर ही खरं तर अत्यंत छोटी वस्तू. पण ते लावण्याच्या प्रकारात फरक असतो. त्यावरून आपला लूक ट्रॅडिशनल की आधुनिक हे ठरतं. ट्रॅडिशनल लूकमधे डोळ्याच्या बाहेर बारकी रेष काढतात. 
 
४) नुस्त्या मोगर्‍याचे गजरे ट्रॅडिशनल. फ्यूजन करताना गुलाबाच्या पाकळ्या आणि मोगर्‍याची फुलं असे गजरे करता येतात. ते खूप सुंदर दिसतात आणि वेगळेही.
 
५) या गर्ज‍यासोबत केसांत आम्ही घुंगरू माळतो. हेअर डेकोरेशन. गजरा सुकला तरी या घुंगरामुळे त्याकडे लक्ष जात नाही.
 
६) सध्या कॉलेजगोईंग मुलींमधे पुढे पफ आणि मागे सिम्पल बन अशी फॅशन आहे. आणि दीपिका-सोनम यांची मेसी चोटीही मुलींना आवडते. दुसर्‍याच्या लग्नात मिरवताना हा सिम्पल बन किंवा मेसी चोटीचा ऑप्शन ट्राय करून पहा. लूक वेगळा दिसेल.

Web Title: Macy Peak, Khopa, Ghangru, Gulabogora Gajra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.