लव्ह बाइट्स, खेड्यापाड्यातली मॉडर्न लव्हष्टोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 03:02 PM2018-01-10T15:02:51+5:302018-01-11T08:47:01+5:30

खेड्यातल्या प्रेमात अडचणीच फार. आईबापभाऊबहीण, जवळचे- लांबचे नातेवाईक, घरची परिस्थिती, शेजारपाजारी, राजकारणी लोक, पोलीस मामामामी, जातधर्म, शाळाकॉलेजातले शिक्षक आणि एकूण एक घटक जातीपातीने प्रेमात हजेरी लावतात. जोडण्यासाठी कमी, तोडण्यासाठी जास्त!!

Love bytes, Modern Lovestory from the villages | लव्ह बाइट्स, खेड्यापाड्यातली मॉडर्न लव्हष्टोरी

लव्ह बाइट्स, खेड्यापाड्यातली मॉडर्न लव्हष्टोरी

Next

-  श्रेणिक नरदे

बदलत्या काळाबरोबर सगळं बदलत जात असतंय. पूर्वी आणि आत्ता... असं सगळे आपले आईबाप, आज्जाआज्जी कितीतरी गोष्टी सांगत राहतात. त्यात आम्ही १९९० नंतर जन्माला आलेली पिढी. आम्हाला नुस्तंच बघत राह्यल्यासारखं वाटतंय. कायकाय येतंय आणि कायकाय येणार हाय? हे नुस्तंच बघत रहाण्याशिवाय आपण दुसरं केलंय तरी काय?
तसंच प्रेमाच्या बाबतीत...
प्रेमात असणाऱ्या स्टेपवर पण सगळ्या बदलामुळं बदल झालाय असं मत झालंय.
पूर्वीचे आशिक लोक आपल्याला शिनमातून दिसत्यात. त्यांचे कपडे विशेषत:. आशिक गड्याचं तळमळणंच जायचं इंटर्वलपर्यंत. मग कुठंतरी शेवटच्या अर्धा तासात इजहार करायचा, व्हायची ती फायटिंग-बोंबाबोंब व्हायची आणि शेवट गोड व्हायचा. गावखेड्यातल्या लोकांना त्यातही चावट वाटायचं. आता त्याच काळातली लोकं जर आपल्याबरोबर आताचे शिनमा बघायला लागली तर काय चवचोथाच राह्यला नही असं साधारणपणे बडबडून गप्प बसतात.
नाही म्हटलं, तरी ह्या साधनांचा, तंत्रज्ञानाचा माणसावर परिणाम झालायच.
प्रेयसीची एक झलक बघण्यासाठी यष्टी चुकवावी लागायची, कॉलेजमध्ये तिची एंट्री बघायला तिच्या आधी अर्धा तास जाऊन वाट बघत बसावं लागायचं. तिच्याशी बोलणं म्हणजे लांबच पण तिच्या मागंमागं हिंडून ती आपल्याकडे पण एक झलक टाकेल अशी आशा बाळगायची. असा एक जमाना झाला.
आत्ता ती हुरहुर, अंगावर काटं येणं, मागंमागं फिरणं (मनात भीती घेऊन), मुलीची किंवा मुलाची मित्रमैत्रिणीकडून हिस्ट्री काढणं हे आता जवळपास बंदच झालंय असं म्हटलं तर त्यात काय भयंकर अतिशयोक्ती नाही. तंत्रज्ञानानं सगळं सोप्पंसार करून ठेवलंय.
आता फक्त ती किंवा तो (बहुतेक वेळा ‘तो’च) फक्त नाव समजलं की, स्पेलिंग येत असलं की, तिच्या/त्याच्याकडे बघून पहिला शोध फेसबुकवर घेतला जातो. तिथं फ्रेंड रिक्वेश्ट पाठवली जाते. तसेच फ्रेंड रिक्वेश्टबरोबर थोडक्यात परिचय पण इनबॉक्समध्ये पाठवला जातोय. त्याला जर उत्तर भेटलं नहीतर, ख1 झाले का? असे काळजीवाहू प्रश्नं विचारली जातात. कधीकधी दोन मिनटात फ्रेंड रिक्वेश्ट स्वीकारली जाऊन बोलनं चालू होतंय. दोनचार रोज बोलल्यावर पुढच्या दिवशी व्हॉटसॅपचा नंबर मिळाला तर तो पुण्यवान माणूस ठरतो. आणि तिथून एका नव्या प्रेमकहाणीला सुरवात. तिथून माणूस भेटीगाठीच्या निमित्तानं वास्तवात येतोय.
आता जवळपास सगळ्या गावात वीज पोचलीय. मोबाइल पोचलेत. तशीच पोरंपोरी पण ‘पोचलेत’. यात हुरहुर, पोरीच्या बापाची भावाची काळजी न करता पहिलं संभाषण व्यवस्थित पार पडतंय. ह्याबद्दल विशेषत: पोरांनी तंत्रज्ञानाचं ऋणी असलं पाहिजे.
मला जुनी दिवस आठवतात.
एफ.एम.चा मोबाइल जाऊन बाजारात दणकेबाज आवाजाचा चायना मोबाइल आला. त्यावेळी यष्टीत प्रेयसी असली तर तिला मोबाइलवर गाणं वाजवून मनातल्या भावना सांगायच्या. किंवा मग यष्टीत एल्युमिनिअमच्या शीटवर किंवा कॉलेजमधल्या ती बसणाऱ्या बेंचवर नाव किंवा नावाची पहिली अक्षरं कोरायची. त्यासाठीच पेटीतला कंपास मोफत दिलेला असायचा. ह्या पद्धती तशा रिस्की असायच्या, अंगलट आलं तर क्लासटीचर प्रिंसिपलकडं न्यायचे, तर यष्टीतला मास्तर पोलीस स्टेशनाला गाडी घ्यायचं. मग रिश्टिगेटेड करणं किंवा आईबापाला बोलवून पोरापोरींना समज देऊन सोडून देणं हे व्हायचं आणि ते बिचारं मग अब्रूची पर्वा करून एकदा खाली घातलेली मान लग्नात बायकूने हार घालतानाच वर करायची, अशी दहशत एककाळी होती.
किती केलं तरी गावखेडी आणि शहरं ह्यात फरक हा असतोयच. साधं जर बघायला गेलं तरी आपल्याकडं व्हाटसॅप, फेसबुक, रोजची वर्तमानपत्रं बघितली तर लक्षात येतंय की, प्रेमाकडे खेड्यात कसं आणि शहरात कसं बघितलं जातंय? शहरातल्या प्रेमात एवढ्या अडचणी येत नाहीत, पण खेड्यात आईबापभाऊबहीण, जवळचे- लांबचे नातेवाईक, शेजारपाजारी, राजकारणी लोक (हे सगळीकडं), घरची परिस्थिती, पोलीस मामामामी, जातधर्म, शाळाकॉलेजातले शिक्षक आणि एकूण एक घटक कमी वेळा जोडण्यासाठी आणि जास्त वेळा तोडण्यासाठी जातीपातीने प्रेमात हजेरी लावतात.
प्रेमात काय नाही?
प्रेम करायला, ते टिकवायला अक्कल लागते. सगळ्या टपून बसलेल्यांना चुकवून भेटी घेण्याचं मॅनेजमेंट लागतं. जसजसं प्रेम वाढत जाईल तसतसं बुद्धी येत जाते, माणूस कनवाळू होतोय, जगातल्या तमाम जिवांची काळजी निर्माण होते (बदल्यात आपली काळजी घेणारं कुणी नसतं), प्रेमात सोन्या, बाबू, बाळू, पिल्लू, ठोंब्या, म्हस, रेड्या, रेडकू अशी सगळी प्रिथ्वी येते. समज- गैरसमज, किसी रोज तुमसे ते चाँद सी मेहबुबा, मध्येच प्यार किया तो... अशी प्रोत्साहनपर गाणी, केलेल्या चुका, भांडणं, हट्ट, रोमान्स आणि हरेक माणसाची हरेक तºहा. अशा सगळ्या गोष्टींनी प्रेमाला महान रूप दिलंय. काही लोकं ही जन्मजात प्रेमाचा द्वेष करणारी असतात. त्यांना हे प्रेमीयुगल म्हणजे दहशतवादी वाटतात. या सगळ्यांना तोंड देत प्रियकर प्रेयसी आपला प्रवास रमतगमत करत असतात. प्रेमच माणसाला जिवंत ठेवतं. नाहीतर हे आयुष्य तसं रडगाण्याशिवाय दुसरं काय असतं?

(फूड टेक्नॉलॉजीत बी.एस्सी. केलेला श्रेणिक जयसिंगपूरला राहतो, शेती करतो आणि मस्तमौला जगतो.)

Web Title: Love bytes, Modern Lovestory from the villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.