Loss

By Admin | Updated: September 25, 2014 17:14 IST2014-09-25T17:14:00+5:302014-09-25T17:14:00+5:30

मीच का? माझ्याच वाट्याला का हे दु:ख यावं?असं म्हणत मन वेदनेनं भरुन निराश होतं तेव्हा..

Loss | Loss

Loss

>- दु:ख आपल्याला बदलवतं, यावर विश्‍वास ठेवाल तुम्ही?
 
 
आपल्या सर्वांच्या जगण्यातली एक महत्त्वाची भावना. मृत्यू ही आपल्या जगण्यातली अटळ गोष्ट. मृत्यूला आपण का घाबरतो? कारण मृत्युमुळे आपण आपल्याला जवळची असणारी प्रिय व्यक्ती कायमची हरवून बसतो. अशा पद्धतीने काही गमावून बसण्याचा अनुभव खूपच दाहक असतो. आपलं अत्यंत जीवाभावाचं, अत्यंत प्यारं असं आपण काहीतरी गमावून बसतो, तो अनुभव तमा कुणासाठीच साधा नसतो. त्या अनुभवाला सामोरं जाताना जाणवणारी भावना म्हणजे दु:ख.
मात्र असं गमावून बसणं, सर्वस्व हरवणं हे काही फक्त कुणाच्या निधनामुळेच वाट्याला येतं असं नाही. मरणाहून भयंकर दु:ख अनेकदा जीवंतपणी भोगावं लागतं असं म्हणतातच ना !
घटस्फोट, नोकरी जाणं, शिक्षणात वर्ष वाया जाणं, मैत्री तुटणं, गर्भपात होणं, स्वप्नभंग होणं, पाळीव प्राण्याचा मृत्यू, आजारपणामुळे निरोगी आयुष्य गमावून बसणे, आर्थिक नुकसान, घर विकावं लागणं, आघातामुळे सुरक्षितता अथवा विश्‍वास गमावून बसणं, जवळच्या व्यक्तीचं आजारपण अशा अनेक घटनांमुळे आपल्याला प्रचंड दु:ख होतं. 
 या गोष्टींमुळे खूप दु:ख होतं असं आपण दाखवू शकू अशा काही कॉँक्रीट गोष्टी असतात, ज्या सांगता, दाखवता येतात, त्यांना स्पर्श करता येतो. काही मात्र अत्यंत अँबस्ट्रॅक्ट असतात. म्हणजे नात्यातला ट्रस्टच हरवला, एकदम इनसिक्युअर वाटू लागलं तरी दु:ख होतं, पण ते दाखवता येत नाही.
पण माणसाला दु:ख होतं म्हणजे काय?
कोणत्याही कारणाने जेव्हा दु:ख होतं तेव्हा मनाची एक खूप मोठी प्रक्रिया होत असते. कारण ते दु:ख अनुभवल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा स्वत:कडे, जगाकडे, इतर माणसांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो.
तुम्ही आठवून पहा तुमच्या आयुष्यातले काही ‘गमावून’ बसण्याचे प्रसंग. परीक्षेत नापास झाल्यानं वर्ष वाया गेलं, ब्रेकप झाला, जवळची व्यक्ती कायमची सोडून गेली, तेव्हा आपण कसे होतो. त्या दु:खानंतर आपण कसे झालो? आपल्यात काय बदल घडले? असा विचार केला तर तुम्हालाही तुमच्यात झालेले काही बदल निश्‍चित जाणवतील. 
थोडक्यात कोणत्याही ‘लॉस’ला मन देतं ती  स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणजे दु:ख. ते  तुम्हाला आतून बदलायला, स्वत:ला तपासायला भाग पाडतं. दु:खाने माणसं अंर्तमुख होतात. समाजापासून काही काळासाठी विलग होतात. कारण दु:खाच्या त्या फेजमधून जाताना आपण काय गमावलं याची स्वत:च्या नकळत आपण गोळाबेरीज करतच असतो. 
 या ‘लॉस’ला आपण सामोरे कसे जाणार आहोत याची तयारी करू लागतात. कोलमडलेल्या मनाची पूर्णबांधणी करतात. म्हणूनच दु:ख ही भावना तशी वेदनाकारक असली तरी झालेल्या घटनेला सामावून घेत, आपलं जगणं पुन्हा नव्यानं सुरु करायला हीच भावना मदत करते.
- संज्योत देशपांडे

Web Title: Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.