जाऊ का पळून?
By Admin | Updated: September 11, 2014 17:24 IST2014-09-11T17:24:24+5:302014-09-11T17:24:24+5:30
मुलं पळून जातात म्हणून त्यांना नालायक ठरवता, मग जातीच्या बेड्या त्यांच्या पायात घालताच कशाला ?

जाऊ का पळून?
>हा विषय तुमच्याशी बोलावा की बोलू नये? जाहीरपणे बोलावा की बोलू नये?
अशा कोंडीत असताना मी हे पत्र लिहितेय.
मला खरंच सांगा, कुठल्या मुलीला वाटतं हो, पळून जाऊन लग्न करावं? आपल्या घरच्यांना दुखवावं?
कुणाला वाटत नाही की घरच्यांनी लाडाकोडानी पाठवणी करावी? डोळ्यात अभिमानाचं पाणी यावं?
नसतेच ना, मुलींनाच काय मुलांनाही नसतेच पळून जाऊन लग्न करायची हौस! पण घरचे मुलांच्या भावना समजूनच घेत नसतील तर करायचं काय? इतके दिवस पेपरमधल्या पळून जाऊन लग्नाच्या कहाण्या मी वाचत होते, तेव्हा वाटायचं काहीतरीच, असं कुठं होतं का?
मग नंतर हेच सारं माझ्या मित्रमैत्रिणींच्या बाबतीत घडायला लागलं. तेव्हा वाटायचं त्यांनी करावं कन्व्हिन्स घरच्यांना, पण ते सोपं नाही हे कळायचं. भीतीही वाटायची.
मात्र आता हे सारं माझ्याच बाबतीत सुरू झालं आणि मी हादरले.
नोकरीत आम्ही एकत्र होतो, दोन वर्षे एकाच कंपनीत नोकरी करतोय. तो चांगला, सालस, होतकरु तरुण आहे. आमच्या भेटी वाढल्यावर त्यानं मला लग्नासाठी विचारलं. मी घरी विचारून सांगते म्हणाले. खरंतर जातीपातीचाही काही प्रश्न नाही. आम्ही दोघंही मराठाच आहोत. मला वाटलं होतं मुख्य अडचण संपली. हो, खोटं कशाला बोला. जातीपाती मानत नाही म्हणतो आपला समाज पण प्रत्यक्षात लग्नात जात किती छळते हे एकदा मान्यच करुन टाकलेलं बरं!
आमच्या बाबतीत आम्ही एकाच जातीचे असूनही कुळ जुळत नाहीत, आमचं श्रेष्ठ, त्याचं नाही असं काहीतरी कारण सांगून घरचे त्याच्याशी लग्नाला त्याला न भेटताच नाही म्हणाले.
आता माझ्यासाठी मुलं शोधताहेत.
अशावेळी मुलींनी पळून जायचं नाही तर काय करायचं? किती दिवस या जातीपाती आणि एकाच जातीपातीतल्या या सगळ्या सतराशे साठ गोष्टींसाठी स्वत:चा बळी द्यायचा?
हा असा विचार करुनच आईबाबा, नातेवाईक मुलांच्या स्वप्नांचा बळी देतात आणि मग मुलं पळून गेलीच तर म्हणतात की पोरं नालायक निघाली.
आम्ही कसे नालायक, सांगा तरी?
किती काळ हे असंच चालणार? किती काळ जातीपातीवरुन आणि गोत्र-कुळावरुन मनं मारली जातात?
सुशिक्षित, शहाणी व्हावीत मुलं म्हणून आम्हाला शिक्षण देणार्या आईबाबांना कोणी आणि कसं समजवायचं?
या अशा अनेक प्रश्नांनी माझं डोकं उठलंय! काय करायचं?
कसं ठरवायचं?
जाऊ का मी पण पळून?
नकोच ही जातीपातीची बंधनं, टाकावीत तोडून एकदाची!
-सातार्या जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातली मुलगी मी, माझं नाव छापू नका.