आम्हाला बोलू द्याल की नाही?

By Admin | Updated: March 26, 2015 20:49 IST2015-03-26T20:49:57+5:302015-03-26T20:49:57+5:30

पुण्यात दोन दिवस रंगलेल्या युवक साहित्य संमेलनात लिहित्या-वाचत्या तरुण मुला-मुलींनी मांडलेल्या काही प्रश्नांचा हा एक ऑन द स्पॉट रिपोर्ट

Let us talk or not? | आम्हाला बोलू द्याल की नाही?

आम्हाला बोलू द्याल की नाही?

कलिम अजिम

पुण्यात दोन दिवस रंगलेल्या युवक साहित्य संमेलनात लिहित्या-वाचत्या तरुण मुला-मुलींनी 
मांडलेल्या काही प्रश्नांचा हा एक ऑन द स्पॉट रिपोर्ट
-------------
‘‘पाळीचे पाच दिवस माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी असतात त्याबद्दल मला बोलायचं आहे, माझ्या मातृत्वाचा आदर  करताना त्यातील  वेदना तुम्ही समजून घेणार आहात का? का नुसतं गौरवीकरण करणार? पण हे सारं बोलणार कुठं? कारण प्रचलित माध्यमं तर रेसिपी, रांगोळी, मेंहदी विशेषांक यांच्यापलीकडे स्त्रीला नाकारतात. मग मी कुठे बोलू? त्यासाठी आम्ही फेसबुक हा मार्ग शोधला; परंतु तिथंही मी काही बोलले की इनबॉक्समध्ये कमरेखाली वार सुरू होतात. हा समाज आणि माध्यमं मला एक मुलगी म्हणून मोकळेपणानं बोलू देणार आहे का?’’
- असे अनेक सवाल अश्‍विनीनं केले त्यावेळी जमलेली तरुण मुलं आणि ज्येष्ठ मंडळीही स्तब्ध झाली. अश्‍विनी बाहेर येताच समवयस्क मुलींनी तिला घेरलं ‘‘आमच्या मनातलं तू बोललीस’’ म्हणत मग अनेकींनी आपापले अनुभव शेअर केले. अश्‍विनीसारखे बरेच तरुण मुलं-मुली आपापल्या मनात खदखदणार्‍या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ‘युवा साहित्य’ संमेलनात जमली होती. 
पुण्यात टेकरेल अकॅडमीच्या वतीनं एस. एम. जोशी सभागृहात गेल्या आठवड्यात दोन दिवसांचे पहिले युवा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. संमेलनाचा उद्देशच होता की, तरुणांना मुक्तपणे बोलता यावं, आपल्या जगण्याविषयी, एक्सप्रेस करण्याविषयी त्यांनीच एकत्र येऊन मुक्त चर्चा करावी. हे सारं मनात ठेवून तरुण-तरुणी जमले होते; मात्र हळूहळू लक्षात आलं की, मुख्य प्रश्न आहे तो आयडेण्टिटी क्रायसिसचा. माझी भाषा, माझं अस्तित्व, मी कोण आहे, समाजात माझं स्थान काय, माझ्या समस्या कोणी ऐकून घेणार का, असे अनेक प्रश्न या तरुणांच्या मनात होते आणि चेहर्‍यावरही!
 संमेलनासाठी अंबाजोगाईतून आलेला धनंजय सांगत होता, ‘मी फेसबुकवर अनेक व्हच्यरुअल मित्र मिळवले. त्या आभासी जगात अनोळखी मित्रांसोबत हिरवळीपासून सेक्सपर्यंत गप्पा मारूनही मन शेवटी अस्वस्थच. माझे रूममेट म्हणवणारे स्पर्धा परीक्षांची भाषा बोलतात. कॅण्टिन आणि कट्टय़ावरचे मित्र स्मार्ट फोन्समध्ये बोटं घालून टूकटूक करतात. मग मी बोलू कोणाशी? ’
कुणालचा प्रश्न त्याहून वेगळा, तो म्हणतो, तरुण मुलांना अस्वस्थ करणार्‍या, छळछळ छळणार्‍या प्रश्नांविषयी थेट आणि स्पष्ट माध्यमंही बोलत नाही. फॅशन आणि ट्रेकिंग असे तरुण विषय, पण बदलत्या तरुण मध्यमवर्गीय जाणिवांविषयी कोण बोलणार?’ 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एमफिल करणारी विजया.   ती म्हणते ‘सोशल मीडियामुळे मी काही बाबतीत सुक्ष्म विचार करू  लागले. धडाधड कोट, विचार माझ्या व्हॉटस अँपच्या मॅसेज बॉक्समध्ये पडतात. पण ते सारं गंभीर नसतं. त्यामुळे मी स्वत:ला वाचनाची सवय लावून घेतली आहे. तिच्यासोबत असलेल्या तिघीजणी गोविंद पानसरेंच्या बहुचर्चित ‘शिवाजी कोण होता’वर चर्चा करत होत्या. 
अशी बरीच चर्चा, वाद आणि अनौपचारिक गप्पांचे अड्डे या संमेलनाच्या निमित्तानं खूप रंगले. व्यासपीठावर तर मान्यवरांनी तरुण जगण्याची, त्यांच्या व्यक्त होण्याची चर्चा केलीच, मात्र त्याचवेळी जमलेली तरुण मुलं आपापलं काही गवसतं आहे का, हे शोधताना दिसली. 
मराठीत अनेक साहित्य संमेलनं भरतात; पण त्या इव्हेण्टमध्ये तरुण, त्यांच्या जाणिवा, प्रश्न, त्यांची घुसमट हे सारं व्यक्त व्हायला कुणी अवसरच देत नाही. म्हणून मग काही तरुणांनी एकत्र येत हे युवा साहित्य संमेलन भरवण्याचा निर्णय घेतला. संमेलन दोन दिवस उत्तम रंगलं, तरुण मुलं मोकळेपणानं बोलली. तरुण लेखक-वाचक एकत्र आले, यानिमित्तानं निदान काही प्रश्न तरी उघडपणे बोलले गेले! 
- संमेलनातून घरी परतताना ते प्रश्न सोबत आले, डोक्याला त्रास देऊ लागले हे नक्की!
 
--------------
‘‘जसा प्रादेशिक विकासाचा असमतोल असतो तसाच सांस्कृतिक विकासाचाही असमतोल असतो. तो सांस्कृतिक अनुशेष भरून काढणं आणि साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात तरुण मुलांना वाव मिळणं, त्यांना आपल्या लेखन, वाचन प्रक्रियेची चर्चा करता येणं ही या युवक साहित्य संमेलनाची मूळ प्रेरणा होती. त्यातून हे संमेलन भरवलं आणि दोन दिवस तरुण मुला-मुलींनी मोकळेपणानं बोलत, समजून घेत आणि ऐकून घेत ते यशस्वी केलं, याचाच आनंद आहे!’
- सचिन पवार , आयोजक, युवक साहित्य संमेलन 

 

Web Title: Let us talk or not?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.