लाईक कमेण्टांचा भोवरा

By Admin | Updated: September 11, 2014 17:16 IST2014-09-11T17:16:21+5:302014-09-11T17:16:21+5:30

तरुण मुलं ‘पडीक’ असतात सोशल मीडिया साइट्सवर.निव्वळ टाइमपास करतात, बकबक करतात. नस्त्या कॉमेण्टाच्या पिचकार्‍या मारतात,असा आरोप नेहमी होतो. पण नव्या काळात हेच सोशल नेटवर्किंग, ही इंटरनेट बेस्ड माध्यमं आणि हातात आलेली एका क्लिकवर जगापर्यंत पोहोचण्याची ताकद आपल्या अवतीभोवतीचं जग बदलवू शकेल का? आपले प्रश्न सोडवू शकेल का? तरुण जगण्याला अधिक समृद्ध करू शकेल का? ह्याच प्रश्नांची ही विशेष चर्चा..

Lacs | लाईक कमेण्टांचा भोवरा

लाईक कमेण्टांचा भोवरा

>समाजात चांगले बदल व्हावेत, आजूबाजूचे प्रश्न सुटावेत, निदान समाजासमोर मांडले जावेत म्हणून जगभरात आता सोशल मीडियाचा वापर होतो आहे. यापुढेही होत राहील.
मुख्य प्रवाहातील माध्यमात जी माहिती ‘ब्लॉक’ होते, वाचक किंवा दर्शक अर्थात सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाही, ती माहिती सोशल मीडियाद्वारे आता पोहोचते आहे.
‘इंटरनेट इज सपोज्ड टू बी कंटेण्ट न्युट्रल’ असं म्हणतात.  तुमचा कण्टेट काय यावरून जोवर तुमचा अँक्सेस रोखला जात नाही तोपर्यंत इंटरनेट हे सर्वांसाठीचं मुक्त माध्यम आहे. आणि तीच या माध्यमाची ताकद आहे.
मात्र इंटरनेट, विशेषत: सोशल मीडिया हे माध्यम तरुण मुलं त्या ‘ताकदीनं’ वापरतात का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
 
 सोशल मीडियावरचा 
 तुमचा चेहरा कसा?
 
सोशल मीडिया वापरणार्‍या सर्वच वयोगटातल्या व्यक्तींची काही वैशिष्ट्यं ठळकपणे जाणवतात. त्यांचे काही प्रकारही दिसतात. आपण कोणत्या प्रकारात मोडतो हे ज्यानं त्यानं एकदा ठरवायला हवं.
 
१) स्व-वेडे.
काहीजण हे स्वत:च्याच प्रेमात आकंठ बुडालेले असतात. ते स्वत:चेच फोटो टाकतात. स्वत:विषयीच बोलतात. स्वत:पलीकडे दुसरं काही पाहतच नाही.
 
२) ब्लॅकमेलर्स
काहीजण सतत स्वत:चे प्रश्न, समस्या, दुखणी गार्‍हाणी जाहीरपणे सांगत बसतात.
 
३) एंटरटेनर
काहीजण फक्त टाइमपास करायला येतात. मजा करतात, स्वत:चं आणि दुसर्‍यांचंही मनोरंजन करतात.
 
४) कौन्सिलर
काहीजण इतरांसाठी समुपदेशकांचं काम करतात. सल्ले देतात. त्यांना फॉलो करणार्‍या लोकांना आधार देण्याचा प्रयत्न करतात.
 
५) सिकर्स
काहीजण सतत याच्या त्याच्याकडे स्वत:च्या प्रश्नांविषयी मदत मागतात. सहानुभूती शोधण्याचा प्रयत्न करतात.
 
६) अँक्टिव्हिस्ट
नेमके सामाजिक प्रश्न काय आहेत, ते लावून धरत काहीजण त्या प्रश्नांवर लक्ष वेधण्याचा, त्याविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करतात.
 
७) चीअर लीडर्स
काहीजण फक्त चीअर लीडर्स असतात. बाकीचे लोक जे करतात ते फक्त लाईक करतात. इतरांना प्रोत्साहन देतात.
 
८) थॉट लीडर्स
प्रत्येक गोष्टीत हे लोक स्वत:चा छोटासा का होईना वेगळा विचार मांडतात. इतरांना दृष्टी देण्याचा प्रयत्न करतात. अशी माणसं कमी असतात, पण असतात.
 
तुम्ही कोणत्या कॅटॅगरीतले?
 
या कॅटॅगरी समजून घेतल्यावर प्रत्येकानं विचार करायला हवा आपण कुठल्या कॅटॅगरीतले? अनेकदा अनेकजण एकातून दुसर्‍या कॅटॅगरीत ये जा करत असतात.
मात्र ते करताना हे लक्षात घ्यायला हवं की सोशल मीडिया हे ‘कॅज्युअल’ माध्यम नाही. खाजगी तर नाहीच नाही. आपण मनातलं काहीतरी कागदावर खरडलं आणि खोडून, कागद फाडून टाकला असं हे माध्यम नाही. आपण लिहिलेलं जरी डीलीट केलं तरी ते कायमस्वरूपी डीलीट होत नाहीच. 
मग आपणच हे ठरवायचं की, हे माध्यम वापरण्याचा आपला हेतू काय?
लोकांनी आपल्याला काय म्हणून ओळखावं? आधी सांगितलेल्या कुठल्या कॅटॅगरीतली ओळख घेऊन आपल्याला सोशल मीडियात वावरणं, ओळखलं जाणं आवडणार आहे?
आणि आता त्यापुढचा प्रश्न?
मी सोशल मीडियावर जे लिहिणार आहे, ते कुणासाठी? माझा ‘ऑर्डिअन्स’ नेमका कोण आहे?
अनेकजण म्हणतात की, मी माझ्यासाठी लिहितो, पोस्ट करतो, मला काय फरक पडतो कुणी ते वाचतंय की नाही!
मात्र लोक तुम्हाला फॉलो करतात, लाईक करतात, शेअर करतात तुमचं म्हणणं याचा अर्थ ते तुमचा ऑर्डिअन्सच आहे. तुम्ही त्यांच्याशी थेट संवाद साधू शकता, दोन्ही बाजूनी विचारांचं आदानप्रदान होऊ शकतं.
 
संवाद हीच ताकद
सोशल मीडिया हे टू वे चॅनल आहे. एकानं सांगायचं बाकीच्यांनी ऐकायचं असं नाही. हे माध्यमच संवादी आहे. इथं तुम्ही संवाद साधू शकता. लोकांना एकत्र आणू शकता, मनं जिंकू शकता.
सामाजिक प्रश्नच कशाला, शांतता, सलोखा, यासाठीही प्रयत्न करू शकता. मात्र त्यासाठी सोशल मीडिया वापरणार्‍या प्रत्येकानं स्वत:ला विचारलं पाहिजे की, ‘मी सोशल मीडिया का वापरतो आहे?
या प्रश्नाचं योग्य उत्तर तुमच्याकडे असेल, तर  तुम्ही सोशल मीडियाचा ताकदीनं वापर करू शकता. त्यातून बदल घडवू शकता. तुम्हाला किती लाईक्स मिळतात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही तिथं काय मांडता आहात हे महत्त्वाचं!
विशेषत: तरुण मुलांनी स्वत:साठी या प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजेत, विचारायला पाहिजे स्वत:ला, मी का वापरतोय हा सोशल मीडिया?
- अनुपम सराफ

Web Title: Lacs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.