कुंभाची क्रेझ, डिजिटलची झलक
By Admin | Updated: October 8, 2015 20:52 IST2015-10-08T20:52:27+5:302015-10-08T20:52:27+5:30
संध्याकाळच्या वेळी नेहमीच्या कट्टय़ावर आम्ही चार मित्र चहा पीत बसलो होतो. आज कुछ तुफानी करते है, म्हणायची सवयच. पण आज जरा जास्तच मनावर घेत सगळेच पेटले होते.

कुंभाची क्रेझ, डिजिटलची झलक
संध्याकाळच्या वेळी नेहमीच्या कट्टय़ावर आम्ही चार मित्र चहा पीत बसलो होतो. आज कुछ तुफानी करते है, म्हणायची सवयच. पण आज जरा जास्तच मनावर घेत सगळेच पेटले होते. मग काय ठरलं आणि आम्ही पर्वणीच्या दिवशी नाशिक गाठायचं ठरवलं. खिशात घरून आलेला पॉकेटमनी होताच. आतापर्यंत घरच्यांची परवानगी घेणं हे प्रकार आमच्या चौघांपैकी कुणालाच जमला नाही म्हणा किंवा आम्ही स्वत:ला तेवढे शहाणो समजतो असं म्हणा, त्यामुळे विचारलं कुणालाच नाही. तडक नाशिक गाठलं.
पर्वणीच्या एक दिवस अगोदर आम्ही नाशकात पोहचलो. थंडी, पाऊस आणि काही भक्त, काही श्रद्धाळू अन् त्यात आम्ही दीड नाही, चार शहाणो भिजत होतो. रात्रभर गोदावरी हसत होती, नाचत होती, गात होती, तरीही ती शांत भासत होती. त्या गर्दीतला प्रत्येक व्यक्ती स्वत:शीच बोलायचा प्रयत्न करत होता. तेव्हा त्याच गोदावरीच्या रामघाटामध्ये एका काठावरून ते दुस:या काठार्पयत पाण्यात गिरक्या घेत अन कोलांटय़ाउडय़ा मारत एक लहान 12 वर्षाची मुलगी पोहत होती. तिला हाका मारत, बोलावत आमच्या दिशेनं ये असं सांगितलं. ती तशी ओली, थंडीत कुडकुडत होती. तिला कुतूहलानं विचारलं, ‘तुझं नाव काय? स्विमिंग कशी शिकलीस?’
‘कोमल कुशिरे’ नाव होतं तिचं. स्विमिंग या शब्दाचा अर्थ तिला कळेना. ‘तू पोहणं कुठं शिकली?’ असं विचारल्यावर ती म्हणाली, कुणी कशाला शिकवेल, मला येतं लहानपणापासूनच पोहता!
अशा ब:याच गप्पा झाल्या. मग कौतुकानं तिला एक चॉकलेट दिलं तर ती खूश झाली. पण ते तोंडात टाकणार तेवढय़ात तिच्या तोंडात रुपयाचं नाणं दिसलं. तेव्हा लक्षात आलं की ही लोकांनी पाण्यात टाकलेले पैसे गोळा करते. दररोज किती पैसे मिळतात, असे विचारलं तर म्हणाली, सापडतात शंभर-दोनशे रुपये!
चहापाण्यावर सहज पॉकेटमनीतून शे-दीडशे उडवणारे आमच्यासारखे आणि ही पोहून पोहून जिवाचं रान करणारी मुलगी अशी तुलना नकळत मनाशी केलीच.
कुणाच्या वाटय़ाला काय जगणं आणि कसं तारुण्य येतं, प्रश्नच पडला मनाला.
पण उत्तर नव्हतं.
तसेच प्रश्न घेऊन मग नाशिकच्या साधुग्रामात गेलो.
अवतीभवती बरेच तरुणही होते.
बरेचसे क्रे झ म्हणून, आवड म्हणून, शोध म्हणून, तर काही जीवनातील नैराश्याला वाट मोकळी करत, सुखाच्या व्याख्या शोधत फिरताहेत असं वाटलं. काही हौस म्हणून, काही अभ्यास म्हणून, काही नैराश्याने वैतागलेले, काही भरकटलेले, तर काही बेरोजगार, काही विनाकारण विरंगुळा म्हणून आलेले असावेत. स्वयंसेवी संस्थांमध्ये सहभागी होत, दिवसरात्र पावसात सेवा देणारे तरु णदेखील तिथे होते. एकीकडे विविध प्रश्नांनी ग्रासलेल्या तरु णांचा लोंढा, तर एकीकडे समाधान म्हणून समाजसेवा करणारा तरु णांचा सहभाग. एकीकडे डिजिटल इंडियाला साद घालणारा भारत, तर दुसरीकडे रामघाटावर स्नान करणारा भारत. हा विरोधाभासच होता.
त्यात काही तृतीयपंथीही दिसले. या सोहळ्यात त्यांचा सहभाग असतो का, असा मला प्रश्न पडला.
पण उत्तर वेगळंच सापडलं. तिथे ‘सखी’ हा तृतीयपंथी संप्रदायाचाही सहभाग होता. राधा आणि कृष्णा यांच्या अतूट प्रेमावर प्रचंड श्रद्धा आणि विश्वास असलेला हा संप्रदाय आहे. सखी आखाडय़ाचा उदय हा 1988 मध्ये बिहार येथे झाला. महंत विशाखा हे या आखाडय़ाचे महामंडलेश्वर आहेत. रामरथी नावाच्या एका तृतीयपंथी व्यक्तीने सखी संप्रदायाची माहिती दिली. तेव्हा आज प्रत्यक्षपणो जरी समाज तृतीयपंथींना सहभागी करून घेत नसला, तरी यांनी आपले वेगळे अस्तित्व मान्य केले आहे. स्वीकारले आहे.
एका वेगळ्याच धार्मिक सोहळ्यातला हा स्वीकार अत्यंत वेगळा आणि आनंददायीही वाटला.
किती वेगळी माणसं, समाज, वर्ग, भाषा इथे जमले होते. सारेच वेगळे होते. समजून घ्यावे असे प्रश्न होते. उत्तरं मिळालीच असं नाही, पण तरी एक नवीन जग दिसलं हे नक्की!
कुंभातल्या या सफरीनं आणखी एक नजर दिली, असं मात्र नक्की वाटतं!
- स्नेहा मगर
पुणो