तुरुंगात जगण्याची किंमत कळतेय.
By Admin | Updated: October 8, 2015 20:51 IST2015-10-08T20:51:26+5:302015-10-08T20:51:26+5:30
मी सातवीला असतानाच कर्जाचा भार आमच्यावर होता. माङो वडील कष्ट करता करता दिवस-रात्र एक करायचे. मी पण शाळा सोडून छोटी-छोटी कामं करायला सुरुवात केली

तुरुंगात जगण्याची किंमत कळतेय.
माङया आयुष्याची सुरुवातच दु:खात झाली.
मी सातवीला असतानाच कर्जाचा भार आमच्यावर होता. माङो वडील कष्ट करता करता दिवस-रात्र एक करायचे. मी पण शाळा सोडून छोटी-छोटी कामं करायला सुरुवात केली. मला त्यावेळी हवा होता फक्त पैसा. त्यावेळी मी अज्ञानी होतो. मला माझं भवितव्य काय तेव्हा कळलंच नाही. कारण मी शाळेत खूप हुशार होतो, स्कॉलरशिपमध्ये प्रथम नंबर यायचा. हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम यायचो. पण पैशापुढे हे सगळं दिसायचं नाही.
मी कामासाठी खेडेगावात जायचो. त्या गावाची गावठी भाषा, तिथल्या डोंगरासारख्या टेकडय़ा, जुने मंदिर, हिरवीगार शेती बघून मी रमून जायचो. मला त्यावेळी काही काळापुरता आनंद वाटायचा. पण मी नेहमी चुकत गेलो. मी भविष्यकाळाचा विचारच केला नाही.
म्हणूनच मी आज या रत्नागिरी विशेष कारागृहामध्ये आहे.
मला नेहमी पैसा हवा होता. मग तो ब्लॅक असो किंवा व्हाइट, मी फक्त पैशाच्याच मागे लागलो. मला पैशाची हावच लागली. म्हणून मी काही चुकीची कामे केली. विचार केला नाही की पैसा मला कुठे घेऊन जाईल. पण नेहमी एकच विचार करत असायचो की, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. म्हणून आज एका वर्षापासून कारागृहात जेवढा अनुभव मिळतो तो मन:पूर्वक घेतो. कारण मला माहीत आहे की, हा अनुभव मला नक्की चांगल्या मार्गावर घेऊन जाईल, जेणोकरून मी माङया कुटुंबाला सुखात ठेवू शकतो. त्या मार्गाची मी आतुरतेने वाट पाहत आहे.
म्हणतात ना, आपले जीवन कबड्डीच्या खेळासारखे असते. जेव्हा-जेव्हा आपण जिंकण्यास पुढे जातो, तेव्हा तेव्हा आपल्याला हरवण्यासाठी आपले पाय खेचले जातात. मी नेहमीच हरत गेलो. मला जिंकण्याची संधी कधी मिळालीच नाही. माङया आई-बाबांनी मला नेहमी यशाकडे ढकलले. मी मात्र नेहमी अपयश व दु:खाचा मार्ग निवडला. पण आता त्या मार्गाचा शेवट आला आहे. कारण मी एक अनुभव घेतलेला आहे. तुरुंगात राहून मला जगण्याची किंमत कळते आहे.
पोटाची भूक भागवण्यासाठी भाकरी करताना जसे तव्याचे चटके सोसावे लागतात तसेच मी या वाईट वाटेतून काटे, चटके सोसत चांगल्या मार्गाला लागेल, याची मला आता खात्री आहे.
- राहुल चव्हाण