केदार जाधव पॉकेटसाइज डायनामाइट

By Admin | Updated: February 1, 2017 15:35 IST2017-02-01T15:35:24+5:302017-02-01T15:35:24+5:30

त्यानं संयम सोडला नाही, वाट पाहिली. स्वत:वर ठाम विश्वास ठेवला आणि कसून सराव केला, एकेक शॉट गिरवला आणि मग एक दिवस त्याची तळपती बॅट साऱ्यांनी डोळे भरून पाहिली...

Kedar Jadhav PocketSize Dynamite | केदार जाधव पॉकेटसाइज डायनामाइट

केदार जाधव पॉकेटसाइज डायनामाइट

- शिवाजी गोरे

भारतीय क्रिकेट संघात एक मराठमोळा चेहरा ‘फिनिशर’ म्हणून पुढे येतोय.  केदार जाधव.
त्याच्या धमाकेदार बॅटिंगचं कौतुक आज साऱ्या देशात होतं आहे.
हा एक मराठमोळा तरुण. वयाच्या तिशीत पोहचलाय आज. क्रिकेटसारख्या तरुणांच्या खेळामध्ये तिशी म्हणजे तर कारकिर्दीची संध्याकाळ म्हटली जाते. पण केदारनं येणारा प्रत्येक क्षण ही नवी सुरुवात समजली. प्रत्येकवेळी आपण एक परीक्षा देतोय असं तो समजत गेला. खरं तर त्याच्या करिअरसाठी ही अग्निपरीक्षाच होती. पण या साऱ्या परीक्षांमधून त्याचं क्रिकेट उजळून निघालं, त्याचं तेज आज सारं जग पाहतं आहे...
केदारच्याच नव्हे तर त्याच्या कुटुंबांच्याच अंगात क्रिकेट भिनलेलं आहे. त्यामुळे आपलं इंडियन कॅपचं स्वप्न पूर्ण करताना केदारनं करिअरचं कोणतंही टेन्शन घेतलं नाही. त्याच्या कुटुंबीयांनीही ते त्याला घेऊ दिलं नाही. कुणाही मध्यमवर्गीय कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता गरजेची वाटते. खेळ आणि त्यातून मिळणाऱ्या नोकऱ्या याचं आकर्षणही अनेकांना असतं. पण तसं केदारने केलं नाही. स्थानिक पातळीवरील क्रिकेटमध्ये केदार चमकायला लागल्यापासूनच अनेक कंपन्यांच्या त्याला नोकरीच्या आॅफर होत्या. वडील २००३ मध्ये एमएसईबीतून निवृत्त झाले होते. तरीही त्यांनी केदारला भक्कम पाठिंंबा दिला. भारतीय संघात खेळण्याची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत नोकरी करण्याची गरज नाही, असं त्याला सांगितलं आणि केदारनं आपलं क्रिकेटवरचं लक्ष अजिबात ढळू दिलं नाही.
केदारचं जाधव कुटुंब मूळचं माढा तालुक्यातील जाधववाडीचं. केदारचा जन्म पुण्यातला. कोथरूडमध्ये तो वाढला. वयाच्या तिसऱ्या वर्षी क्रिकेटची बॅट त्यानं हातात घेतली होती. लहान असताना तो टेनिसबॉल क्रिकेट खूप खेळायचा. त्याचा फायदा त्याला आता होतो आहे.
आठवणींच्या वाटेवर मागे जात केदार सांगतो, ‘२००६ ते ८ हा काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. पण त्याकाळातही मी खचून न जाता जिद्दीनं उभा राहिलो. पुढे जात राहिलो. फलंदाजी आणि गोलंदाजीचा कसून सराव सुरूच ठेवला. फलंदाजीमध्ये माझे बाबाच माझे मुख्य मार्गदर्शक होते. मैदानावरचे मार्गदर्शक ज्येष्ठ क्रिकेटपटू सुरेंद्र भावे यांनीही खूप सहकार्य केलं. ते नेहमीच खूप धीर द्यायचे. माझ्या चुका समजावून सांगायचे. त्यांनी मला कधीच नाऊमेद हाऊ दिले नाही. त्यांच्या समजावून सांगण्यातसुद्धा एक आपलेपणा असायचा. बाबा आणि त्यांनी माझा आत्मविश्वास कधी ढळू दिला नाही. आपण म्हणतो, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते, पण मी म्हणेन माझ्या मागे माझे बाबा आणि सुरेंद्र भावे उभे होते.
२००८ ते १२ यादरम्यान माझ्या फलंदाजीत खूप बदल झाले, माझ्या फटक्याची शैली बदलली. माझा खेळपट्टीवर टिच्चून उभे राहण्याचा आत्मविश्वास वाढला. चॅलेंजर्स चषक क्रिकेट स्पर्धेत त्याची प्रचिती मला आली. माझी फलंदाजी बहरली होती. फटके अचून बसत होते. माझा कठीण काळ संपला होता.’
२०१२ च्या रणजी करंडकमध्ये उत्तर प्रदेश विरुद्ध ३२७ धावांच्या खेळीने त्याला हे सांगितलं की, खेळपट्टीवर जर आपण टिकून राहिलो तर धावा होतातच. त्यानंतर त्यानं २०१३-१४ मध्ये रणजी मोसमात महाराष्ट्राकडून सहा शतकांसह एकूण १२२३ धावा केल्या. यावेळी महाराष्ट्र संघ १९९२-९३ नंतर प्रथमच रणजीच्या अंतिम फेरीत पोहोचला होता.
केदार सांगतो, २०१४ मध्ये माझी बांगलादेश दौऱ्यासाठी निवड झाली; तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पण तेथे गेल्यावर मला एकही सामना खेळायला मिळाला नाही. पण तरीही मला त्याचं अजिबात वाईट वाटलं नाही किंवा दु:ख झालं नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्टेडियममध्ये संघाबरोबर बसलेलो असतानासुद्धा खूप काही शिकायला मिळालं. ड्रेसिंग रूममध्ये जी चर्चा व्हायची त्यातूनसुद्धा खूप काही शिकता येतं. बांगलादेश दौऱ्यावरून आल्यावर माझ्या सराव पद्धतीतसुद्धा बदल करावे लागले. परदेशातील वातावरण आणि हवामान याच्याशी जुळवून घेण्यात काही अडचणी येऊ नये म्हणून मी माझ्या सरावाच्या वेळासुद्धा बदलल्या. कधी दुपारी तर कधी सकाळी अन्यथा सायंकाळी काही वेळीस रात्रीसुद्धा मी सराव केला आहे. नंतर नोव्हेंबर २०१४ मध्ये मला श्रीलंका विरुद्ध भारतीय संघात स्थान मिळालं. रांची येथे झालेल्या या सामन्यात मी २४ चेंडूंमध्ये २० धावा केल्या होत्या. त्यावेळी मला वाटलं की आता आपलं काही खरं नाही. धावा झाल्या नव्हत्या, त्यामुळे मी नाराज झालो. पण पुण्यात आल्यावर पुन्हा जोमानं सरावास सुरुवात केली. २०१५ मधील झिम्बाब्वे विरुद्ध वन डे लढतीत पहिली नाबाद १०५ धावांची खेळी केली. २०१६ मध्ये याच संघाबरोबर टी-२० मधील ५८ धावांच्या खेळीने माझा आत्मविश्वास वाढविला. त्यामुळे भारतीय अ संघाकडून खेळतानासुद्धा मला आॅस्ट्रेलियामध्ये मुळीच भीती वाटली नाही. त्यानंतर आयपीएलमध्ये प्रथम दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळताना विरेंद्र सेहवाग आणि रॉयल चॅलेजर्स बेंगळुरूकडून खेळताना विराट कोहलीसारख्या खेळाडूंबरोबर खेळताना खूप काही शिकायला मिळालं.’
संयम आणि योग्य वेळेची वाट पाहत अचूक खेळणारा हा खेळाडू...
आत्ता कुठं त्याच्या भारतीय संघातील प्रवासाची सुरुवात झाली आहे.
तो उत्तम फिनिशर ठरेल याची झलक त्यानं दाखवून दिली आहेच...

त्याच्या आयुष्यात जे काही चढ-उतार येऊन गेले त्यावेळी थोडंही खचून न जाता जिद्दीने प्रत्येक अडचणींवर त्यानं मात केली. आत्मविश्वास कमी होऊ न देता सातत्यानं सराव करून त्यानं हे यश मिळवलं आहे. मी त्याला पॉकेटसाइज डायनामाइट म्हणतो. तसंच केदारचं आहे. जर त्याची बॅट एकदा तळपली की तो अफलातून फटके मारतो. त्याच्या यशाची, कारकिर्दीची एक वेगळी सुरुवात आता झाली आहे.
- सुरेंद्र भावे, ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि केदारचे मार्गदर्शक 


आपल्या आयुष्यात प्रत्येक तरुणानं एकतरी स्वप्न पाहावं. ते प्रत्यक्षात उतरवण्याठी प्रयत्न करावेत. कोणत्याही दडपणाला न घाबरता, परिस्थितीचा मुकाबला करून पुढं जावं. अपयशाला किंवा अडचणींना घाबरून खचून जाऊ नये. अपयश हे प्रत्येकाला खूप काही शिकवून जाते. तो अनुभव खरा आपला असतो. 
- केदार जाधव
  

goreshiva@gmail.com

Web Title: Kedar Jadhav PocketSize Dynamite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.