फक्त विचारा, मी काय मदत करु?

By Admin | Updated: April 30, 2015 17:09 IST2015-04-30T17:09:30+5:302015-04-30T17:09:30+5:30

आपण समाजासाठी काहीतरी करावं; असं वाटतं ? पण करायचं काय, कसं हे शिकायला हवं ! आणि त्यासाठी ही मोठी सुटी काही गोष्टी फुकट शिकवू शकते !

Just ask, what can I help? | फक्त विचारा, मी काय मदत करु?

फक्त विचारा, मी काय मदत करु?

>- सोशल वर्क करायचं; स्किल आहे तुमच्याकडे ?
 
खूप मुलांना वाटतं, सुटीत काहीतरी समाजोपयोगी काम करावं ! पैसे नाही मिळाले तरी चालतील, पण कुणीतरी काम दिलं पाहिजे. एखाद्या एनजीओत जाऊन आपण काहीतरी मदत करायला पाहिजे. फळ वाटप, वस्तू वाटप यापलीकडे जाऊन काहीतरी करायला पाहिजे !
हे ‘वाटतं’ याचंच खरंतर खूप कौतुक करायला पाहिजे! आपण माथेरान-महाबळेश्वरला न जाता, मित्रंबरोबर टाइमपास न करता असं काहीतरी करायला पाहिजे असं वाटण्याला किंमत आहेच !
पण असं नुस्तं वाटून उपयोग नसतो, तसं काम करून त्यातून आपली समज वाढवता आली पाहिजे !
खरंतर या कामाकडे आपला समाज समजून घेण्यासाठी वापरलेला वेळ असं म्हणून पहायला पाहिजे !
एखाद्या समाजसेवी संस्थेत जाऊन आपण समाजसेवा करू, त्याबदल्यात आपल्याला काही पैसे आणि मिळालंच तर एखादं ‘सर्टिफिकेट’ मिळेल असा त्रोटक विचार असेल तर यावाटेला खरंतर न गेलेलंच बरं !
आणि जायचंच असेल तर समाजसेवी संस्थाच कशाला पाहिजे ! म्हणजे मिळालीच एखादी चांगली संस्था, तिथं जाऊन काही शिकता आलं, मदत करता आली तर फारच छान !
पण सगळ्या छोटय़ा गावात, खेडय़ात, तालुक्यात अशी संस्था कुठून मिळणार ?
मग तिथल्या मुलांनी काय करायचं ?  
मुळात हेच मनातून काढून टाका की, सुटीत आपल्याला कुणीतरी काम देईन आणि आपण ते करू.
त्यापेक्षा आपण आपल्यापद्धतीनं काही काम करून पाहू.
असे बरेच उद्योग मी माङया सुटीत केले आहेत,
त्यातले काही सांगतो.
करून पहा. ‘समज’ वाढवायला यासा:या खटाटोपाचा फार उपयोग होतो !
- अमृत बंग
कार्यकर्ता, निर्माण
 
1) तहसीलदार कार्यालयाच्या आवारात 
फक्त जाऊन बसा.
 
हे असं काम कुणी करतं का सुटीत? असं वाटेलही. पण खरंच चारपाच दिवस जाऊन तर बसा तहसीलदार कार्यालयाच्या आवारात. तिथलं काम कसं चालतं, यंत्रणा कशी चालते, कोण कुणाचा साहेब, कुठला विभाग काय काम करतो, हे सारं समजून घ्या. बोला, भेटा लोकांना. काही लोक बोलतील, काही नाही. पण अनुभव तर मिळेल. त्यात आपलं काम करून घेण्यासाठी त्या कार्यालयात आलेली खेडय़ापाडय़ातली माणसं भेटतील. त्यांना विचारा अडचण काय आहे, काम कुठं अडलं? अनेकांना लिहिण्यावाचण्याचा सराव नसतो, बोलण्याचा आत्मविश्वास नसतो, एक साधं पत्र नाही, चार ओळीचा अर्ज लिहून आणा असं म्हणत माणसं परत जातात. त्यांच्याशी बोला. शक्य असेल तर तो अर्ज लिहून द्या. त्यांचं काम ज्या साहेबाकडे त्याच्याशी जाऊन बोला, अनेकदा खमकेपणो उत्तरं मागितली जात नाहीत म्हणून काम होत नाही. त्यांच्या वतीनं तुम्ही बोला !
हे सारं समजलं, करता आलं तर एका अत्यंत गुंतागुंतीच्या व्यवस्थेशी तुमचा परिचय होईल. आपल्या समाजातल्या माणसांचे खरे प्रश्न कळतील. अस्वस्थही वाटेल, पण कळेल तरी की, आपल्याला वाटतात त्यापेक्षा किती वेगळे आहेत, माणसांचे प्रश्न.
 
2) एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट द्या.
 
आपल्या देशातली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था समजून घ्यायची तर जवळच्या एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जा, ग्रामीण रुग्णालयात जा, सिव्हिलमध्ये जा ! 
तिथे येणा:या रुग्णांचे प्रश्न कळतील, नुस्ते आजारच नाही तर बाकीचेही आरोग्याचे, जगण्याचे प्रश्न कळतील.  त्यातून त्यांना काही मदत लागली तर (म्हणजे आर्थिकच असं नव्हे) जाऊन भेटा संबंधित डॉक्टरला. अडचण सांगा, उपचार योग्य होत आहेत का ते विचारा, मदत मागा. आपला काही संबंध नसताना आपण वाईटपणा घेतला तर त्याचा उपयोग होतो. 
 
3) समाजसेवी संस्थेत जाऊन काय विचाराल ?
अनेकांना वाटतं की, असं गावभर फिरून काय होणार? आपण एखाद्या सोशल वर्क करणा:या संस्थेबरोबर काम करू. करायला हरकत नाही. चांगली, मनापासून काम करणारी संस्था पाहून नक्की काम करा; मात्र त्या संस्थेत पाय ठेवताच त्या लोकांची मुलाखत घ्यायला लागू नका. तुम्ही काम काय करता, कसं करता, मग बाकीचे प्रश्न सोडून हाच प्रश्न का निवडला, असं करता त्याऐवजी असं करून पाहिलं तर असे फुकट सल्ले देऊ नका.
त्यापेक्षा एकच प्रश्न विचारा,  मी तुमच्या कामात काय मदत करू शकतो ? मला काही काम सांगाल का?
माहिती मागणारे प्रश्न जरूर विचारा, विषय समजून घ्या. 
हे या दृष्टीनं काम सुरू केलं, तर कदाचित तुम्हाला स्वयंसेवी संस्थेतही काही शिकायला मिळेल !
 
त्याग करताय, असं कुणासाठी ?
हे चांगलंच आहे की, तुम्ही काहीतरी करून पहायचं म्हणून समाजसेवी संस्थेत जाता, पण तिथं गेल्यावर पडेल ते काम करायची तयारी ठेवा. आपण समाजसेवा करायला आलो आणि हे काय आपल्याला डाटा एण्ट्री करायला सांगतात, असं म्हणू नका. फायलिंग करण्यापासून ते श्रमदानार्पयत जे पडेल ते काम करण्याला काही पर्यायच नसतो.
आपण मनापासून काम करायला आलो ना, मग जे मिळेल ते काम करायचं. मनापासून करायचं !
अनेकदा होतं काय की, अनेकांना एक्सपोजर हवं असतं, जबाबदारी नको असते !
ती जबाबदारी घ्या.
मग तुम्हाला कळेल की, आपल्याला नक्की काय काम करायचं आहे.
 
एमएसडब्ल्यू करण्यापूर्वी..
अनेक मुलं बीए झाले की, थेट एमएसडब्ल्यू करायला जातात. त्याआधी सामाजिक कामाचा काही अनुभवच नसतो. आता तर अनेकांना एमबीए करतानाही पुढच्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे धडे गिरवतात. इंजिनिअरिंग करणा:यांनाही कम्युनिकेशन शिकावंच लागतं!
त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीत घरीच बसण्यापेक्षा जर तुमचा कल असेल संवाद आणि समाजकल्याण विषयाकडे, तर काही गोष्टी समर जॉब्ज म्हणून करून पाहता येतील.
1) आपल्या आसपासच्या सामाजिक संस्थेत जा, तिथं काही काम आहे का विचारा, अनेकांना व्हॉलेण्टिअर हवे असतात. तिथं काम करून  पहा.
2) पैसे मिळणार नाहीत पण आपल्या गावात घरटी किती माणसांकडे रोजगार हमी कार्ड आहे. आरोग्य कार्ड आहे हे शोधा. असा अभ्यास तुम्हाला खूप काही शिकवेन !
3) सामाजिक संस्थांचे सव्र्हे, त्याचं डेटा कलेक्शन, सॅम्पलिंग हे कामं तुम्ही करू शकता.
4) सगळ्यात महत्त्वाचं, हे काम आपण समाजाचं भलं करण्यासाठी तर स्वत: काहीतरी शिकायचं म्हणून करतो हे लक्षात ठेवा!

Web Title: Just ask, what can I help?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.