जंपसूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 03:00 IST2018-06-07T03:00:00+5:302018-06-07T03:00:00+5:30
करिना कपूरचा जंपसूट सध्या चर्चेत आहे. जंपसूट कुणीही घातला तर शोभून दिसेल का?

जंपसूट
- श्रुती साठे
जंपसूट, प्लेसूट, डंगरी ही सगळी मंडळी एकाच घराण्यातली !
साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर, टॉप आणि पॅण्ट किंवा शॉर्ट्स एकत्र शिवलेले असले की त्याचा जंपसूट होतो!
आता हा जंपसूट ही कोण्या एका फॅशन डिझायनरची कल्पकता नाहीये बरं का ! हा जंपसूट काही विशिष्ट क्षेत्रातले लोकच पूर्वी वापरायचे. अंगभर असलेला हा सूट ऊब, संरक्षण, वापरण्यातला सुटसुटीतपणा यासाठी प्रचलित होता. खाण कामगारांपासून ते अगदी अंतराळवीरांपर्यंत सगळेच हा जंपसूट वापरताना दिसतात. फायटर पायलट, स्कुबा डायव्हर्स (पाणबुडे) , कार रेसिंग इत्यादीमध्ये जंपसूट वापरला जातो.
गळ्यापासून पाऊलांपर्यंत दिसणाऱ्या एकसंधतेमुळे फॅशन डिझायनर्स जंपसूटकडे ओढले गेले असे म्हणायला हरकत नाही. जंपसूटमध्ये स्टाइल आणि प्रयोग करू तितके कमीच आहेत. फुल स्लीव्हज, स्लीव्हलेस ऑफ शोल्डर, बेलबॉटम, हेरम स्टाइल बॉटम, फ्रण्ट बटण, लेस, प्लेन, प्रिंटेड- करू तेवढी यादी कमीच आहे!
करिना नुकतीच तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जंपसूटमध्ये दिसली. ऑफ शोल्डर, व्हिक्टोरियन स्टाइल कॉर्सेट टॉप असलेला हा जंपसूट. प्रिन्सेस कट आणि समोर लावलेल्या लेस स्टाइलमुळे सुरेख दिसला. ऑफ शोल्डर लॉँग स्लीव्हज आणि निमुळती होत जाणारी पॅण्ट, कमरेला असलेल्या बॉक्स प्लिट यामुळे हा जंपसूट उठून दिसला.
वावरायला सुटसुटीत असलेला जंपसूट कुणीही घालावा. स्लीव्हलेस आणि शर्ट स्टाइल फ्रण्ट बटण असा जंपसूट सर्व वयाच्या आणि बांध्याच्या मुलींना शोभून दिसतो.
sa.shruti@gmail.com