विमानातून उडी

By Admin | Updated: May 1, 2014 14:54 IST2014-05-01T14:46:59+5:302014-05-01T14:54:29+5:30

हवेतून पृथ्वीवर उडी मारायची आणि उडत खाली यायचं. वाचायला, ऐकायला सोपं वाटतं. आपण हवेत मस्त उडू, चालत्या विमानातून झप्कन उडी मारून सपक्न खाली येऊ हे सारं भन्नाट वाटतं.

Jump from the plane | विमानातून उडी

विमानातून उडी

>
स्काय डायव्हिंग/ पॅरा जम्पिंग
हवेतून पृथ्वीवर उडी मारायची आणि उडत खाली यायचं. वाचायला, ऐकायला सोपं वाटतं. आपण हवेत मस्त उडू, चालत्या विमानातून झप्कन उडी मारून सपक्न खाली येऊ हे सारं भन्नाट वाटतं. तुम्ही विमानात बसता.विमान हवेत झेपावतं. विमानाचा आवाज कानात नाही डोक्यातही घुमायला लागलो. एरवी विमानात बसता तेव्हा खुर्चीची पेटी बांधून, दारं बंद करून. पण इथं विमानाचं दार सताड उघडतं, हवेचा झोत भसकन आत घुसतो. आणि आपण विमानाच्या दारात उभे. काही दोर फक्त आपल्याला विमानाशी बांधून ठेवतात. त्यावेळी विमानाच्या दारात उभं असताना, खाली पाहताना भीती वाटतेच. प्रचंड भीती वाटते.टरकतेच. त्याक्षणी देव, आईबाबा, प्रियकर-प्रेयसी कुणी आठवत नाही.
भीती असते ती फक्त उडी मारून आपला जीव वाचवण्याची. मग एक क्षण येतो की, आपण विमानातून उडी मारतो.भिरकावून देतो स्वत:ला हवेत. पण ते स्वत:ला भिरकावू देणं, फेकून देणं विमानातून इझी नसतं, असली-नसली ती सारी हिंमत एकवटून उडी मारावीच लागते.
पण तेवढंच, एकदा आपण खाली आलो.पॅराशूट उघडलं, हवेत तरंगायला लागलो.बर्ड आय व्ह्यू दिसायला लागला. की जीव जाम खूश होतो.
इतका आनंद आपल्याला कधीच झालेला नसतो. आपले पाय खर्‍या अर्थानं जमिनीवर टेकतात. तेव्हा आपण आनंदात आणि समाधानात न्हाऊन निघालेलो असतो. आणि मग वाटतं, फक्त एकच उडी? एकदाच.पुन्हा एकदा करायलाच हवं हे स्काय डायव्हिंग. पॅराशूट जम्पिंग, स्काय डायव्हिंग, हॉट एअर बलून जम्पिंग हे सारं मग नशेसारखं भिनायला लागतं. आपण आपल्यातल्याच भीतीला हरवायला सिद्ध होत जातं.

अनुभव
मला जगापेक्षा वेगळं काहीतरी करायचं होतं. शाळा-कॉलेज- नोकरी-लग्न ही नाकासमोरची वाट नको होती. म्हणजे हे करायचं नव्हतं असं नाही तर फक्त हेच करायचं नव्हतं. मला असं काहीतरी करायचं होतं, ज्यात माझाच नाही तर देशाचाही सन्मान होईल. घरचे म्हणाले देशासाठीच काहीतरी करायचंय ना, मग सैन्यात जा. पण मला माहिती होतं की सैन्यात एका र्मयादेत सगळं करावं लागतं. मला तेही नको होतं. त्याकाळात मी स्विमिंग, कराटे शिकत होते. एकदा खडकवासलाला एनएसडीत गेले तर तिथे सैनिकांना पॅराजम्पिंगचं प्रशिक्षण देणं सुरू होतं. कमलसिंह ओबर, हे माझ्या मैत्रिणीचे भाऊ. त्यांना मी विचारलं की, हे मला करता येईल का, तर ते म्हणाले का नाही. नक्की जमेल. नंतर एकदा त्यांची मुलाखतही टीव्हीवर पाहिली. विमानातून उडी मारतात, मग पॅराशूट पटापट उघडतात. लोक जमिनीवर तरंगत येतात हे त्यांच्याकडच्या काही व्हिडीओतही पाहिलं. मला वाटलं की मी हेच करून पहायला हवं. पण करणार कसं? माझं काही प्रशिक्षण झालेलं नव्हतं. विमानातून उडी मारायची तर किती खर्च येणार हे माहिती नव्हतं. बिना ट्रेनिंग उडी मारणं रिस्की होतंच. कमलसरांनीच आयडिया दिली की अशी बिना ट्रेनिंग उत्तर-दक्षिण ध्रुवावर कुणी उडी मारलेली नसेल, गिनीज बुकवाल्यांना विचारू. तुला जमलं तर ते एक रेकॉर्ड होईल.
प्लॅन केलं. खर्चाचा अंदाज ठरवला. स्पॉन्सर्स शोधले. मी तेव्हा कॉलेजात होते आणि घरच्यांना हे सारं माहितीही नव्हतं. कळलं तेव्हा एकुलत्या एका मुलीला हे सारं करू द्यायला ते चटकन राजी होईना. मग मीच त्यांना म्हटलं की, दुसर्‍या देशातल्या एखाद्या मुलीनं हे केलं तर किती अभिमान वाटतो, मग मीच का ते करू नये? त्यांनीही परवानगी दिली, आधार दिला आणि मी १८ एप्रिल २00४ रोजी मायनस ३७ डिग्री तपमानात उत्तर ध्रुवावर उडी मारली. त्याला नुकतेच १0 वर्षं पूर्ण झाली. उत्तर ध्रुवच का, तर उत्तर ध्रुवावर उडी मारण्याचा खर्च तुलनेने कमी होता. मात्र तो भाग रशियाच्या ताब्यात. त्यांनी माझ्याकडून लिहून घेतलं की मला काही झालं तर त्याला फक्त मीच जबाबदार असेन. मी लिहून दिलं. पण विमानातून नुस्ती उडी मारणंच अवघड नव्हतं. तर समुद्रात तरंगत्या बर्फावर मी उतरणार होते. जिथे उतरणार तिथला बर्फ किती ठिसूळ, माझ्या वजनानं तो तुटून मी पाण्यात तर नाही जाणार, अशा शंका होत्याच. पण मी ते केलं आणि एक वर्ल्ड रेकॉर्ड झालं. एका भारतीय मुलीनं कुठलंही प्रशिक्षण घेतलेलं नसताना उत्तर ध्रुवावर विमानातून उडी मारली. 
पण त्या उडीनंतरच माझ्या लक्षात आलं होतं की वन इज नॉट इनफ. हे समाधान आणि आव्हान पुन्हा पेलायला हवं. त्यानंतर मी दक्षिण ध्रुवावर उडी मारली. एकामागून एक ४ रेकॉर्ड केले. पण मला इथंच थांबायचं नव्हतं. २00६ मध्ये मी अमेरिकेत जाऊन प्रशिक्षण घेतलं. ३00 जम्पचं ते प्रशिक्षण मी २५0 जम्प पूर्ण केल्या. त्यासाठी खर्च होता २0 लाख रुपये. त्यातले १५ लाख रुपये महाराष्ट्र सरकारनं मला दिले.
त्याच काळात माझ्या लक्षात आलं की, स्काय डायव्हिंगचा वर्ल्डकप भरतो. ३0/४0 देश त्यात सहभागी होतात. पण भारतात हा खेळ पोहचलेला नाही. त्यातून आता फिनिक्स अकॅडमी मी सुरू केली आहे आणि तिथं अनेकांना पॅराशूट जम्पिंग आणि स्काय डायव्हिंग शिकवलं जातंय.
या खेळानं मला नुस्तं थ्रील नाही दिलं तर देशासाठी रेकॉर्ड करण्याची संधी दिली, तेही मला तितकंच महत्त्वाचं वाटतं.

शीतल महाजन (आंतरराष्ट्रीय ख्यातीची स्कायडायव्हर आणि फिनिक्स स्काय डायव्हिंग संस्थेची संचालक)


काय करावं / टाळावं?
१) हार्टचा आजार असेल, गुडघेदुखी असेल तर अशी विमानातून उडी मारू नये. गुडघेदुखी असेल, हाडं ठिसूळ असतील तर लॅण्ड करताना फ्रॅर होऊ शकतं.
२) मात्र ज्यांना काही आजार नाहीत, हिंमत आहे, थ्रील हवंय त्यानं कुणीही करावं.
३) अट एकच, प्रशिक्षक सांगतील त्या सूचना नीट तंतोतंत पालन करायच्या, ओव्हर कॉन्फिडन्स नक्की घातक ठरू शकतं.

खर्च किती?
१) फ्री फॉल जम्प, एकट्याने मारायची असेल तर सुमारे ४५ हजार रुपये खर्च येतो. मात्र त्यात दोन दिवसांचे ट्रेनिंग आणि दोन जम्प यांचा समावेश असतो.
२) प्रशिक्षक सोबत असतो, तो पॅराशूट उघडतो आपल्याला सोबत घेऊन उडी मारतो त्यासाठी ३0 हजार रुपये खर्च येतो.
३) स्टॅटिक जम्प, ज्यात तुम्ही उडी मारली की विमानाला बांधलेलं पॅराशूट आपोआप उघडतो त्यासाठी १८हजार रुपये खर्च येतो.

Web Title: Jump from the plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.