नेटवर्क तुटू शकतं, पण नकाशा आहे ना हातात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 07:20 IST2019-09-19T07:20:00+5:302019-09-19T07:20:06+5:30
मित्रांसह फिरायला गेलो, वाट हरवलो, रस्ता चुकलो; पण सापडलं, ते भलतंच !

नेटवर्क तुटू शकतं, पण नकाशा आहे ना हातात?
रवींद्र पुरी
एके दिवशी संध्याकाळी एका मित्नाचा फोन आला. हे ‘‘वुड यू लाइक टू जॉइन अस फॉर अ ट्रीप टू गोल्ड कोस्ट’’, मी दोन सेकंद विचारात पडलो; पण लगेचच नकळत म्हणालो, ‘‘व्हाय नॉट’’.
गोल्ड कोस्टला खूप दिवसापासून जायचा प्लॅन होता. पण योग येत नव्हता. शेवटी गोल्ड कोस्टला मी जाणार, मी खूप आनंदी होतो.
फ्लाइट बुक झाली रविवार, सोमवार व मंगळवार अशी तीन दिवसांची ट्रीप होती. शनिवार, रविवार वीकेण्ड ऑफ असल्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता. पण सोमवार?
ऑफिसला न जायचा बहाणाही शोधून ठेवला.
दिवस उजाडला. सकाळी सातची फ्लाइट होती. मी 6 वाजता अगदी शहाण्याबाळाप्रमाणे एअरपोर्टला पोहोचलो, थोडय़ाच वेळात बोर्डिगही चालू झाली. मित्नांचा अजूनही पत्ता नव्हता माझे सगळे मित्न असे लेट लतीफ का असतात या विचारात मी पडलो. बरं फोन तरी उचलावा तोही नाही. शेवटी मी वैतागून विमानात चढलो. मी आत पोहोचल्यावर विमानाचा दरवाजा बंद व्हायला काही मिनिटे शिल्लक होती तेवढय़ात हे दोघे धावत पळत विमानाच्या दारात पोहोचले. धापा टाकत एअर होस्टेसला बोर्डिग पास दाखवत सीट विचारून एव्हरेस्ट सर केल्यासारखं विमानात आले मी दिसताच जल्लोष. मी आपली मान हलवली. म्हणजे मला म्हणायचे होते, धन्य आहात तुम्ही!
त्यातला एक ब्राझीलचा आणि एक चेक रिपब्लिकचा.
त्यामुळे असे मराठी वाक्प्रचार बोलले तरी त्यांना कळणारे नव्हते. असो बसलो आम्ही. तासाभरात गोल्ड कोस्टला पोहोचलो. खरंच अतिशय सुंदर आहे. गोल्ड कोस्ट उतरल्यानंतर मित्नांनी उशीर का झाला त्याचे कारण सांगितले. तुम्ही जर लवकर किंवा वेळेवर बोर्डिग करत असाल तर तुमचे केबिन लगेजचे वेट चेक होते. या दोघांच्याही बॅग्ज ओव्हरवेट जवळपास 15 किलो. पॅसेंजरला जर उशीर झाला तर विमानाला उशीर होऊ नये म्हणून ते बॅग फार चेक होत नाहीत, असा त्यांचा समज. मी परत मनातल्या मनात ‘धन्य आहात तुम्ही!
एअरपोर्टच्या बाहेर आलो तासभर फिरून सगळ्यात स्वस्त रेट असणारी एक हॅचबॅक कार भाडय़ाने घेतली. गप्पा मारत, हसत-खेळत हॉस्टेलवर पोहोचलो चेक इन केलं. पुढे काय?
काही लोकांशी बोलल्यानंतर ठरवले माउण्ट टॉम्बरीन वु हुकडे निघालो. वळणावळणाच्या वाटा, सुंदर डोंगर. खूपच मजा येत होती. माउण्ट टॉम्बरीनवरील एका रेनफॉरेस्टमध्ये गेलो. 3-4 तास त्या रेनफॉरेस्टमध्ये गेले. खरं सांगायचं तर पूर्ण रेनफॉरेस्ट तासाभरातच फिरून होतं; पण फोटो कधी काढणार. अक्षरशर् शेकडो फोटो काढल्या गेले. अगदी दिसेल त्या किडय़ामुंगीसोबत, नंतर सडकून भूक लागली म्हणून जवळच्या रेस्टॉरंटमध्ये फीश व चिप्सवर ताव मारला. पोट भरल्यावर कळले बाहेर खूप सारं धुकं पडलं होतं. गाडी चालवणं कठीण, उगाचच रिस्क नको म्हणून आम्ही निघलो अक्षरशर् 15-20 मीटर व्हिजिबिलीटी होती. अर्धा तास गाडी चालवल्यानंतर कळलं आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये खाल्लेलं आम्ही तिकडेच परत आलोय मोबाइलचा विक नेटवर्कमुळे कन्फ्युज करत होता.
6 वाजले होते सगळी दुकानं बंद आम्ही एका उंच पहाडावर पोहोचलो तेथे नेटवर्क नाही. पूर्ण धुकं हॉस्टेलवर परत कसं जाणार? सगळेच घाबरले. जवळच एक छोटं घर होतं. म्हटलं चला काही मदत मिळते का बघावं. एका आजोबांनी दरवाजा उघडला. आम्ही घाबरलेलो व त्यांचा चेहरा हसरा. सगळा किस्सा सांगितला त्यांनी एक पेपर मॅप आणुन दिला आणि परतीचा रस्ता समजावला.
मिश्कीलपणे हसत म्हणाले, जेव्हा समोरचा रस्ता अंधुक होतो. तेव्हा डेस्टिनेशनर्पयत कसं पोहोचणार असा विचार करून हताश नाही व्हायचं. एका वेळी समोरचा फक्त एका अडथळ्याचा विचार करायचा आणि तो अडथळा पार करायचा. रस्त्यात चौक लागला तर क्षणभर थांबायचं शांतपणे. मॅप बघायचा आणि मग पुढचा रस्ता ठरवायचा मग बघा प्रवास कसा मजेशीर होता.
आम्ही आभार मानले. निघणार तेवढय़ात ते म्हणाले, ‘आयुष्याच्या रस्त्यावरही कधी धुकं पडलं तरीही हीच पद्धत वापरा’, असे म्हणून त्यांनी दरवाजा बंद केला. आजोबांनी आम्हाला केवळ रस्ता नव्हे तर जीवन कसं जगायचं हे अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितलं.
(लेखक ऑस्ट्रेलियास्थित मोटिव्हेशनल ट्रेनर आहेत)