जॉब हॉपर्स नकोत? का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 12:55 IST2019-01-31T12:55:27+5:302019-01-31T12:55:39+5:30
सतत नोकरी बदलणं फॅशनेबल असलं तरी फायद्याचं असेलच असं नाही.

जॉब हॉपर्स नकोत? का?
- नितांत पाटील
नेक्स्ट बेस्ट ऑपॉच्र्युनिटी.
हे सध्या मिलेनिअल्स पिढीच्या म्हणजे तरुण मुलांच्या जगातले महत्त्वाचे शब्द आहेत. एकदा नोकरीला चिकटलं आणि तिथंच आयुष्य काढलं हे तर आता कालबाह्य प्रकरण झालं. आता नवीन शब्द आहे, जॉब हॉपिंग. सतत-पटापट नोकर्या अनेकजण बदलतात. त्यातून त्यांना भराभर प्रमोशन मिळतं, पगार वाढतो, आपल्याला मार्केटमध्ये किंमत आहे असंही वाढतं. त्याउलट जे एकाच कंपनीत अनेक वर्षे काम करतात, तिथल्या मालकांनाही वाटायला लागतं की एवढे लोक नोकर्या बदलत असताना या व्यक्तीनं नोकरी बदलली नाही, म्हणजे याचं स्किल कमी असणार किंवा याला बाहेर कुणी नोकरीवर ठेवत नसणार, त्यामुळे त्याची पगारवाढ आणि एकूण करिअरवाढही मंदावते.
प्रत्यक्षात हे खरं नसतं, एकाजागी उत्तम काम करणारी माणसंही आपल्या कामात परफेक्शन कमावतात, विषयतज्ज्ञ असतात आणि चारदोन हजार रुपये पगार वाढतो म्हणून आहे त्या कंपनीला सोडत धावत सुटत नाही. अर्थात असा विचार करणारे थोडेच, सध्या काळ आहे तो जॉब हॉपिंगचा. तीन वर्षापेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी नोकरी करणं हेच अनेक मुलांना आउटडेटेड वाटतं. आपण ‘सडतोय’ एकाच जागी असा फील येतो.
सेन्ससवाइड या कंपनीने अलीकडेच केलेल्या सव्र्हेनुसार 56 टक्के लोक सांगतात की, त्यांनी गेल्या 16 महिन्यांत एक ते तीनदा नोकरी बदलली आहे. अर्थात हे सारे नोकरदार आयटी, टेलिकॉम या क्षेत्रातले अधिक प्रमाणात आहेत. जुलै ते ऑगस्ट 2018 या काळात हा सव्र्हे करण्यात आला. या सव्र्हेत सहभागी झालेल्या 85 टक्के तरुण नोकरदारांना वाटतं की किती काळ नोकरी एकाच कंपनीत केली याला काही महत्त्व नाही. किती स्किल आहे, किती संधी मिळाली, किती पगार वाढला आणि पद वाढलं याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे 60 टक्के तरुणांना असं वाटतं की, नोकरी बदलली तरच पगार चटकन वाढतो अन्यथा वाढत नाही. 43 टक्के तर आवजरून सांगतात की सतत नाही पण ठरावीक काळानंतर नोकरी बदलली तर आपल्या रेझ्युमची ताकद वाढते.
मात्र का बदलतात हे तरुण नोकर्या?
तर त्याची साधारण तीन कारणं दिसतात.
एक म्हणजे नव्या नोकरीत वाटलं होतं तसं, अपेक्षेप्रमाणे काम वाटय़ाला आलं नाही. दुसरं म्हणजे जिथं काम करतो, तिथलं वातावरण चांगलं नाही, प्रोफेशनल नाही आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे चांगली, नव्या कामाची, जास्त पगाराची नोकरी मिळाली.
हे चित्र एकीकडे, दुसरीकडे मात्र आता हे जॉब होपर्स नोकरी देणार्यांच्या डोक्याला ताप होऊन बसले आहेत. त्यामुळे या सव्र्हेत सहभागी 87 टक्के नोकरी देणारे, व्यवस्थापनातले लोक सांगतात की, जे पटापट नोकर्या बदलतात असं रेझ्युममध्ये दिसतं, त्यांना आता आम्ही मुलाखतीलाच बोलावत नाही, नोकरी देण्याचा तर प्रश्नच नाही.
जॉब हॉपिंग करणं चांगलं की वाइट यावरची चर्चा निरंतर सुरूच राहणार आहे, त्याचे फायदे-तोटेही आहेतच; पण ते करतानाही यापुढे तारतम्य ठेवावं लागेल, हे उघड दिसतं आहे.