जाम फ्रस्ट्रेशन आलंय?

By Admin | Updated: September 11, 2014 17:06 IST2014-09-11T17:05:44+5:302014-09-11T17:06:05+5:30

काहीच मनासारखं होत नाही, काही केल्या यश मिळत नाही, कुणीच आपलं ऐकत नाही, असं वाटतं?

Jam frustration? | जाम फ्रस्ट्रेशन आलंय?

जाम फ्रस्ट्रेशन आलंय?

येतं कुठून ते नेमकं? करतं काय?
 
सनय. पंचवीस वर्षाचा आहे. लहानपणापासूनच त्याला वडिलांसारखं सी.ए. व्हायचं होतं. तो खूप मनापासून सीएच्या तयारीला लागला. पहिल्या दोन परीक्षांना त्याला फारसे प्रयास पडले नाहीत. पण आता मात्र पाच-सहा  अटेम्प्ट करुनही  त्याची गाडी अडकून पडली आहे. तो खूप अभ्यास करतो, खूप प्रयत्न करतो. तो हुषारही आहे; पण काय कुणास ठाऊक त्याचं सी.ए. मात्र पूर्ण होत नाहीये. प्रत्येक परीक्षेनंतर निकाल लागतो तेव्हा सनयचा हिरमोड झालेला असतो.
मग तो फ्रस्ट्रेट होतो.
 
राजश्रीची गोष्ट थोडी निराळी आहे. राजश्रीचा स्वभाव जरा तापट आहे. साध्या साध्या गोष्टींवरून ती एकदम भडकते आणि रागाच्या भरात हमखास काहीतरी चुकीची गोष्ट करून बसते. म्हणजे कुणाला तरी लागेल असं बोलते, कुणाशी तरी वाद घालत असते, भांडते. तिच्याजवळची माणसं तिच्या या स्वभावामुळे दुखावली जातात आणि तिच्यापासून दुरावतात. राजश्रीलाही आपलं रागावर नियंत्रण नाही याची जाण आहे. त्या रागाला हाताळण्यासाठी ती खूप प्रयत्नशीलही आहे. पण प्रयत्न करूनही तिला म्हणावं तितकं यश त्यात आलेलं नाही. मग राजश्रीचं फ्रस्ट्रेशन उफाळून वर येतं..
 
वाहन चालवणार्‍यांच्या बेशिस्तीमुळे सातत्यानं ‘ट्रॅफिक जाम’मध्ये अडकून पडणं.
साध्या अपेक्षित असलेल्या सुविधा, व्यवस्था मिळण्यासाठी झगडावं लागणं. उदा. कार्यालयातील स्वच्छता नसणं. घरात पाण्याची टंचाई असणं, बाहेर स्वच्छतागृहांची दुरावस्था असणं.
जवळच्या माणसांचा असहकार, त्यांचं वागणं, त्यांचे स्वभाव, घरात व्यसनाधीन व्यक्ती , आजारी व्यक्ती, त्यांचं उपचारांना सहकार्य न करणं, अशा अनेक लहानमोठय़ा गोष्टींनी आपण फ्रस्ट्रेट होतो. 
 
‘फ्रस्ट्रेशन’ ही आपल्या जगण्यात वारंवार अनुभवास येणारी एक भावना आहे. नाउमेद करणार्‍या अशा अनेक घटना घडत असतात. ज्यानं आपल्याला वारंवार ‘फ्रस्ट्रेशन’ येतं. ज्याला आपण मराठीत वैफल्य येणं म्हणतो. 
आपल्या उद्दिष्टांमध्ये, हव्या असणार्‍या गोष्टीत कोणत्याही कारणानं अडथळा निर्माण झाला की, निर्माण होणारी भावना फ्रस्ट्रेशनची असते. आपली चिडचिड व्हायला लागते. कधी त्याचं रागात रूपांतर होतं, तर कधी खूप हताश वाटतं.
खरंतर ही भावना त्रासदायक वाटली तरी  एका पातळीवर मदत करणारी असते कारण ही भावना आपल्याला आपल्या जगण्यातल्या समस्यांची जाणीव करून देते आणि आपल्याला बदल (स्वत:मध्येही) घडवून आणायला प्रवृत्त करत असते.
मात्र ही भावना जेव्हा मदत करणारी नसते तेव्हा मात्र माणसांमधली आक्रमकता वाढताना दिसते.  त्यांना राग येतो. तो वाढतच जातो आणि त्यातून माणसं अधिक आक्रमक होताना दिसतात. शब्दांच्या माध्यमातून अथवा कधी कधी शारीरिक पातळीवरही हा राग व्यक्त केला जातो. त्यामुळे फ्रस्ट्रेशन आलं की, माणसांच्या वर्तनात बर्‍याचदा काही ठळक बदल होताना दिसतात.
फ्रस्ट्रेशनची ही भावना आपण जर योग्य पद्धतीनं हाताळली नाही तर त्याचे आपल्या कामावर, आरोग्यावर व नातेसंबंधांवर खूप नकारात्मक परिणाम होतात.
म्हणूनच हे फ्रस्ट्रेशन हाताळायचं कसं?
-शिकायला हवं!
- डॉ. संज्योत देशपांडे
 
 
फ्रस्ट्रेशन आलंय? कसं ओळखाल.
 
 
फ्रस्ट्रेशन आलं की, अनेकांच्या वर्तनात त्याचे परिणाम दिसू लागतात.
नेमकी कुठली असतात ही लक्षणं?
१) राग येतो!
 रस्त्यात गाडी बंद पडली तर गाडीला लाथ मारणं, आईनं पार्टीसाठी पैसे दिले नाहीत तर जोरात दार आपटून निघून जाणं. अशा अनेक गोष्टी सहज केल्या जातात. राग अनावर होतो.
२)मला नाहीच जमणार!
कधी कधी काही गोष्टी या बर्‍याचदा आपल्या आवाक्याबाहेरच्या असतात. त्या मिळाल्याच पाहिजे हा अनाठायी अट्टहास न करता त्या त्यावेळी सोडून देणं शहाणपणाचं असतं. मात्र काही माणसांची त्रास सहन करण्याची क्षमताच मुळात कमी असते. काही जणांच्या स्वभावात धीर धरण्याचा भागच नसतो अशावेळी जरा काही मनासारखं झालं नाही की,  ठरवलेल्या गोष्टींचा नाद लगेच सोडून द्यायचा ही मंडळी निर्णय घेतात. उदा. अभ्यासासाठी चिकाटी लागते. तीच नसते मग अभ्यासाला बसलं की खूप त्रास होतो म्हणून शिक्षणच सोडून द्यायचं. 
एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जरा झगडावं लागतंय असं वाटलं की, ते तिचा विचारच सोडून देतात. त्यातून त्यांची बरीच कामं  अर्धवट रहातात. कोणत्याही कामात दीर्घकाळ टिकून रहाण्याची त्यांची क्षमताच कमी असते. म्हणून मग ते  कामात, शिक्षणात, नोकरीत सतत बदल करत रहातात. या सगळ्याचा त्यांच्या आयुष्याच्या गुणवत्तेवर नक्कीच परिणाम होतो.
३) आत्मविश्‍वास गायब 
 सातत्यानं कामं अर्धवट सोडून देण्याच्या सवयीमुळे या व्यक्तींचा स्वत:कडे पाहण्याचा दृष्टिकोनच खूप नकारात्मक होतो. ठरवलेलं काम आपण पूर्ण करू याची त्यांना खात्री वाटत नाही.
४) हताश , निराशा वाटतं
वारंवार असे अनुभव आल्यानं त्यांना हताश वाटतं. मन उदास होऊन जातं. आपण या सर्वातून बाहेरच पडू शकणार नाही, असं वाटायला लागतं.
अर्थातच या सगळ्याचा मनावर खूप ताण येतो. त्याचा शारीरिक-मानसिक आरोग्यावरही खूप परिणाम होतो. हा ताण कमी करण्यासाठी कधी कधी काहीजण व्यसनांचा आधार घेतात.
 
 

Web Title: Jam frustration?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.