सेव्ह नवीद- इराणी तरुणाला वाचवण्यासाठी ट्रम्प यांनी का केलं ट्विट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 05:15 PM2020-09-10T17:15:48+5:302020-09-10T17:19:16+5:30

तो सेलिब्रिटी, इराणी कुस्तीपटू. लोकप्रिय. इराण सरकारने मात्र राष्ट्रद्रोहासह हत्येचा ठपका ठेवत त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

iran-save-navid torture-execution-human-rights - Trump tweet | सेव्ह नवीद- इराणी तरुणाला वाचवण्यासाठी ट्रम्प यांनी का केलं ट्विट?

सेव्ह नवीद- इराणी तरुणाला वाचवण्यासाठी ट्रम्प यांनी का केलं ट्विट?

Next
ठळक मुद्देइराणी तारुण्याचा स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठीचा एल्गार

कलीम अजीम 

इराणच्या प्रसिद्ध कुस्तीपटूची फाशीची शिक्षा रद्द करावी, या मागणीसाठी जगभरात ‘सेव्ह नवीद’ ही मोहीम सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ट्विट करत फाशी देऊ नये असे म्हटलं आहे. ऑनलाइन पीटिशनवर लोक सह्या करत आहेत. 
तर कोण हा नवीद?
नवीद अफकारी नावाचा हा 27 वर्षीय कुस्तीपटू. हत्येच्या आरोपाखाली सध्या तो इराणच्या तुरुंगात आहे. देशातील लोकप्रिय मल्ल अशी त्याची ओळख आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यानं अनेक पदकं मिळवली आहेत. इराणमध्ये कुस्ती हा लोकप्रिय खेळ आहे. या खेळात अनेक तरुण व तरुणी प्रावीण्य मिळवण्यासाठी सतत प्रयत्नरत असतात. नवीद अफकारी कोच म्हणूनही इतरांना प्रशिक्षण द्यायचा.
नवीद हा इराणचा सेलिब्रिटी अ‍ॅथलिट आहे, असं म्हणता येईल. सप्टेंबर 2018मध्ये झालेल्या एका सरकारविरोधी निदर्शनात तो सहभागी झाला होता. बेरोजगारी, आर्थिक संकट आणि महागाईच्या विरोधात हे आंदोलन सुरू होतं. या आंदोलनात मोठय़ा संख्येने 
तरुणांचा सहभाग होता. दक्षिण इराणमधील शिराज शहरात झालेल्या एका निषेध आंदोलनात नवीद आपल्या मित्नांसह सहभागी झाला होता. आंदोलनस्थळी पोलीस व निदर्शकांत चकमक झाली. यात एका खासगी सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. पोलिसांचं म्हणणं आहे की, नवीदने चाकूने भोसकून ही हत्या केली. ज्याचा मृत्यू झाला तो एका खासगी कंपनीत सिक्युरिटी गार्ड असून, त्याचं नाव हसन तुर्कमान आहे. फॉक्स न्यूजच्या मते, सरकारविरोधी षड्यंत्नातून ही हत्या झाली, असं स्थानिक पोलीस म्हणत आहेत. पोलिसांनी नवीदचा भाऊ वाहिद अफकारीलादेखील शासनविरोधी षड्यंत्नाचा भाग म्हणून अटक केली. शिवाय त्याचा तिसरा भाऊ हबीब यालादेखील ताब्यात घेतलं.


संबंधित खटला सुरू असताना सरकारी पक्ष व पोलिसांनी कोर्टात अनेक सरकारी पुरावे सादर केले. त्यात नवीदच्या दोन्ही भावांचा कबुलीजबाबही होता. रॉयटर वृत्तसंस्थेच्या मते, नवीदनं हत्येची कबुली दिली, असा अहवाल पोलिसांनी कोर्टात दाखल केला. प्रत्यक्ष पुरावे व परिस्थिती पाहता शिराजच्या स्पेशल कोर्टाने गेल्या महिन्यात नवीदला दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाने त्याच्या दोन्ही भावांना आजीवन कारावास व फटके मारण्याची शिक्षा दिली. नवीदविरोधातच हत्या, राष्ट्रद्रोह, ईश्वराविरुद्ध युद्ध छेडणे व अवमान करणे इत्यादी गंभीर गुन्हे नोंदवण्यात आलेली आहेत. 
मात्र जगभरातून नवीदच्या या शिक्षेवर टीका केली जात आहे. इराणचे सर्व राष्ट्रीय स्पोर्ट्स चॅम्पिअन्स फाशीचा विरोध करत आहेत. मोसलिम इस्कंदर फिलाबी, इराणचे राष्ट्रीय खेळाडू आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये 17 सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक विजेते आहेत. त्यांच्या पुढाकाराने इराणचे अ‍ॅथलेटिक्स समितीने नवीद बचाव मोहीम सुरू केली आहे. तब्बल 48 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलिट कमिटीला याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.  सर्वानी नवीदचा मृत्युदंड रद्द करण्याची मागणी केली आहे. नवीदला राजकीय प्यादा बनवू नका असा आक्र ोश केला जात आहे. सेव नवीद अशी चळवळ उभी राहात आहे.
नवीदच्या आईने एका व्हिडिओद्वारे आवाहन केलं आहे की, माझ्या तीन तरुण मुलांना वाचवा. मुलांचा छळ करून त्यांना एकमेकांविरुद्ध साक्ष द्यायला भाग पाडले आहे, असा आरोप तिनं केला आहे. इंटरनॅशनल फेडरेशन फॉर ह्युमन राईट्स आणि लंडनस्थित जस्टिस फॉर इराण यांनी जूनमध्ये एका अहवालात म्हटलं होतं की, गेल्या दशकात इराणमध्ये सरकारी यंत्नणांनी 355हून अधिक सक्तीची कबुलीजबाब नोंदवली आहेत. इराणी अधिकारी मात्न हे आरोप नाकारतात. फॉक्स न्यूजच्या मते, स्थानिक मीडियाने वेळोवेळी संशयितांच्या कबुलीजबाबांवर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. 
सरकारविरोधाचं प्रत्येक शस्र मोडून काढायचं ही इराणची रीत राहिलेली आहे. विरोध दडपण्यासाठी कठोर शासन ही एकमेव पद्धत इराणी राज्यकर्ते हाताळतात. नवीदच्या निमित्ताने अनेक मानवी हक्क संघटना, राजकीय विश्लेषक, अभ्यासकांनी ही सक्ती थांबण्याची मागणी केली आहे. शिवाय देहदंडाच्या शिक्षेची तरतूद कायमची रद्द करण्याची मागणी केली जात आहे. नवीदच्या निमित्ताने सोशल मीडियावर सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीची समीक्षा केली जात आहे. आज नवीद आहे उद्या तुम्हीदेखील असू शकता, असं ट्विट केलं जात आहे. 
अमेरिकी-इराणी विचारवंत मरियम मेमारसादेगी म्हणतात, ‘नवीद अफकारीचा एकमेव गुन्हा म्हणजे देशप्रेम. आपल्या दोन भावांसोबत तो स्वातंत्र्यासाठी देशव्यापी निषेधांमध्ये सामील झाला. कृपया न्यायासाठी आमच्या बाजूने उभे राहा!’
देशातील राष्ट्रीय स्पोर्ट्स चॅम्पिअन्सने आरोप केला हे की, सत्ताधारी राजवटीकडून खेळाडूंना सतत त्नास देण्याचा प्रयत्न/मोहीम सुरू असते. 
गेल्या आठवडय़ात हे प्रकरण जगभर व्हायरल झालं, कारण अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजची एक लिंक शेअर करत नवीदच्या माफीची मागणी केली. त्यानंतर जगभरात या खटल्याची समीक्षा सुरू झाली आहे. इराणच्या हेकेखोर धोरणाचा समाचार घेतला जात आहे. 

( कलीम मुक्त पत्रकार आहे.)

Web Title: iran-save-navid torture-execution-human-rights - Trump tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.