मी वेगळीच झाले!

By Admin | Updated: July 10, 2014 18:42 IST2014-07-10T18:42:16+5:302014-07-10T18:42:16+5:30

मानसी मूळची पुण्याची.पं. शमा भाटे यांच्याकडे कथक शिकली. ती सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना आहे.

I was different! | मी वेगळीच झाले!

मी वेगळीच झाले!

 

- मानसी तापीकर -देशपांडे
मी खूप लहान होते, आठ वर्षाची. माङया आजीच्या घराजवळच कथकचा क्लास होता. हौस म्हणून शिकतात तशी मी ही कथकच्या क्लासला जायचे. माझं नशीब थोर की माङया गुरू पंडिता शमा भाटे यांच्याच तो क्लास होता. मी शिकायला लागले तेच त्यांच्याकडे. मी सातवीत जाईर्पयत हे असंच चाललं होतं, पण त्यावर्षी शमाताईंनी माङया पालकांना बोलावून घेतलं. त्यांना सांगितलं की, ‘या मुलीला कथकची आवड आहेच, पण तिच्यात उत्तम ग्रेस आहे. तिनं डान्समध्येच करिअर केलं तर उत्तम होईल.’
त्यानंतरही दहावीर्पयत पूर्वीसारखीच मी कथकच्या क्लासला जात होते. पण दहावीनंतर एमए पूर्ण होईर्पयत मी रोज अख्खा दिवस, सकाळी 7 ते रात्री 8 वाजेर्पयत फक्त नृत्याचाच विचार करत शमाताईंकडे असायचे. त्यांच्या प्रोजेक्टमध्ये काम करायचे, शिकायचे, खूप गोष्टी त्यातून समजल्या.  कथक म्हणजे नक्की काय हे उलगडायला लागलं.
पूर्वी गुरुकुल पद्धत होती, शिष्य गुरुबरोबर राहत गुरुकडून अनेक गोष्टी शिकत. तसं गुरुकुल पद्धतीचं शिक्षण मला शमाताईंकडे मिळालं. कथक तर शिकत होतोच, पण शमाताई बोलतात कशा, वागतात कशा, संगीत कसं ऐकतात याचे संस्कारही माङयावर तिथेच झाले. संगीत ऐकणंही त्यांनीच शिकवलं. मोठमोठय़ा कलाकारांचं संगीत त्या आम्हाला ऐकायला लावत. त्यांची खासियत काय, ते का मोठे आहेत, हे त्यातून कळायला लागलं.
पण हे असं संगीत आणि नृत्य शिक्षण एकीकडे सुरू असताना दुसरीकडे आम्ही अनेक गोष्टी शिकत होतो. शमाताईंची शिस्त म्हणजे शिस्त. सकाळी 7 वाजता प्रॅक्टिस सुरू करायची तर 7 म्हणजे सातच. कुठंही जायचं तर वेळेवरच जायचं, 5 मिण्टं उशीर झालेला त्यांना खपत नसे. कुणाशी कसं बोलावं, आत्मविश्वासानं संवाद कसा साधावा, कसं चालावं, कसं उभं रहावं, हे सारं त्यांनी शिकवलं. माझं तर व्यक्तिमत्त्वच बदलून गेलं.
आता मला वाटतं की, मी नृत्य नसते शिकले ना तर मी कुणीतरी वेगळीच झाले असते, आज जे माझं व्यक्तिमत्त्व आहे, ते एरवी नसतंच. 
मला अजूनही तो प्रसंग आठवतो. शमाताई नेहमी सांगत की, तुम्ही डान्स करायला उभ्या राहिल्या की तुमचा स्वभाव त्यात दिसतो, तो दिसता कामा नये.
माझाही स्वभाव त्यांना माङया नृत्यात दिसत असणारच. मी खूप इंट्रोवर्ड होते. खूप अबोल. स्वत:हून कुणाशी फारशी बोलत नसे, हसून बोलणं तर लांबच. माङया आतलं, मनातलं कुणाला काही सांगतच नसे. त्याकाळी मी अभिनय शिकत होते. माझा पहिलाच सोलो परफॉर्मन्स होता. त्या मला ठुमरी शिकवत होत्या. त्यात सगळं कृष्णाचं वर्णन होतं. गाणंही एकदम उत्साही, नटखट होतं.
पण माझा रिझव्र्ह स्वभाव, मी काही मोकळेपणानं त्या गाण्यावर अभिनय करत नव्हते. बिचकत होते. मग शमाताईंनी मला समजावलं की, ‘तुझा स्वभाव कसा आहे हे तुङया नृत्यातून दिसतंय. ते दिसता कामा नये. तू मोकळेपणानं या गाण्यातले भाव मांडले तर ते लोकांर्पयत पोहचतील, नाही तर नाही.’
त्यानंतर मी कानाला खडा लावला की, आपला स्वभाव तर आपल्या नृत्यात दिसायला नकोच; पण आहे तो स्वभाव बदलायला पाहिजे. आपण गप्प बसतो, बोलत नाही म्हणून लोकांना वाटतं की काय खडूस मुलगी आहे. अकारण गैरसमज होतात. मग मी आपणहून इतरांशी बोलायला लागले. जरा मोकळेपणानं बोलू लागले, आणि त्यानंतर माझा स्वभाव खरंच बदलला. आणि माझं व्यक्तिमत्त्वही.
शमाताईंनी नृत्य तर भरभरून शिकवलं, त्यातला आनंद मला दिलाच, पण त्यांच्यामुळे माझं आजचं व्यक्तिमत्त्वही वेगळं दिसतं आहे, मी वेगळी झालेय..
माङया गुरुनं जे दिलंय, ते सारं माङया रोजच्या जगण्याचा भाग झालंय.
 
 

Web Title: I was different!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.