इंजिनिअर झालो, आता शिपाई होईन म्हणतोय.
By Admin | Updated: October 29, 2015 16:26 IST2015-10-29T16:26:37+5:302015-10-29T16:26:37+5:30
इंजिनिअर तर झालो, पण शहरात आमचा टिकाव लागत नाही. आणि खेडय़ापाडय़ात नोक:या नाहीत. जवळ कुठं नोकरी धरावी तर पगार महिना आठ हजार. त्यात पडेल ते काम करायचं. आणि अपमान सहन करत राहायचं. काय उपयोग आमच्या डिग्य्रांचा?

इंजिनिअर झालो, आता शिपाई होईन म्हणतोय.
>मागच्या काही दिवसांत पेपरमधे काही बातम्या वारंवार वाचल्या. त्यांचं म्हणणं होतं की, चपराशी पदासाठी इंजिनिअर्सचे, अगदी पीएचडी करण्यास पात्र उच्चशिक्षित तरुणांचे अर्ज येताहेत. नोकरी करण्यास पात्र आहेत तरुण पण ‘लायक’ नाही असं सांगणा:याही बातम्या, सव्र्हे कायम वाचायला मिळताहेत. त्यावर चिंता, वाद आणि चर्चा झडताहेत.
पण या सा:यात मूळ प्रश्न बाजूलाच राहतोय. या उच्चशिक्षित तरुणांना चपराशी पदासाठी अर्ज करावा असं का वाटत असेल?
बीए-एमए झालेलेही मिळेल ती नोकरी खरंतर सरकारी नोकरी का पदरात पाडून घेण्यासाठी धडपडताहेत?
शोधायची म्हटली तर कारणं खूप आहेत. त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त दोष आहे तो या कमकुवत शिक्षण व्यवस्थेचा. शिक्षण पूर्ण झालं की, कोणीही उद्योग करायला धजत नाही. कारण डोक्यात कुठल्याच नव्या कल्पना नाहीत. इथं शाळेत शिकताना वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षीच कल्पकतेला गळा घोटून ठार मारलं जातं. ‘आम्ही बरोबर ठरवली ती उत्तरं दे, तुझं डोकं वापरू नको’ हेच तर आम्हाला शिक्षण व्यवस्था शिकवते.
मग आपण आपला विचार करून आपला मार्ग शोधायचा असतो हेच आम्ही शिकत नाही. बाकी जे काही पुस्तकी शिकतो, ते शिकतोच म्हणायचं.
मग डिग्री मिळाली की जो तो मोठमोठय़ा शहरात जाऊन जॉब शोधायला लागतो. पण तेही अवघड. तिथं खेडय़ापाडय़ातली मुलं मागे पडतात. स्थानिक-शहरी-परप्रांतीय-इंग्लिश मीडियमवाली हायफाय या सा:या कालव्यात त्यांना काही उमगत नाही.
मग अशा परिस्थितीत छोटय़ा कंपनीकडे वळावं लागतं. तिथंही परिस्थिती तीच. पण एखाद्या कंपनीत मिळते नोकरी. मात्र अट एकच, आपली तयारी ठेवायची पडेल ते काम करायचं. पण पडेल ते काम करायचं याचा नेमका अर्थ काय, तर तुमचं शिक्षण काही का असेना, मालक सांगेल ते काम करायचं. कंपनीच्या मालकाचे चेक बॅँकेत जमा करायचे, त्याच्या नातेवाइकाला आणायला/सोडायला जायचं, त्याच्या घरचा भाजीपाला आणायचा.
ही असली कामं करताहेत अगदी इंजिनिअर आणि एमबीए झालेलेही. त्यापेक्षा सरकारी नोकरीत शिपायांना चांगला पगार मिळतो. एवढं इंजिनिअर होऊन अनेकजण महिना आठदहा हजार कमवताहेत. त्यापेक्षा सरकारी नोकरी मिळाली, सातवा वेतन आयोग लागू झाला तर तिथली शिपायाची नोकरीही चांगले पैसे कमावून देईन असं तरुणांना वाटलं तर काय चूक?
नाहीतर बाकीची अवस्था काय तर कुठल्या तरी कंपनीत चिकटायचं. कंपनी मोठी आणि चांगली असेल तर बरी प्रगती होते, नाहीतर वर्षाअखेर पाच-सातशे रुपये जेमतेम पगारवाढ मिळते. मग सांगा, जेमतेम आठ हजार रुपये पगारात इंजिनिअर होण्यासाठी घेतलेलं शैक्षणिक कर्ज तरी फिटू शकतं का? मग घरी पैसे पाठवायची तर बातच सोडा. त्यात घरचे मागं लागतात की झाला ना आता इंजिनिअर मग लग्न करून टाक. पण जिथं स्वत:चं भागू शकत नाही तिथं बायकोची जबाबदारी कशी घ्यायची? त्यात नोकरी परमनण्ट नाही, डोक्यावर कायम टांगती तलवार असतेच की कुठल्याही क्षणी नोकरीवरून काढून टाकतील.
या सा:याचा किती वैताग होतोय, डोक्याला किती ताप होतोय हे कुणाला सांगणार?
कधी कधी वाटतं, स्वत:चा उद्योग सुरू करावा. यशस्वी उद्योजकांच्या बातम्याही पेपराबिपरात येतात. मग वाटतं, आपल्यालाही जमेल. पण विजेचे आणि जागेचे भाव, बॅँकांची कर्ज उपलब्ध करून देण्यातली अनास्था, हेलपाटे, धक्के, अपमान हे सारं सहन करत नस्ते उद्योग करण्यापेक्षा नाकासमोर नोकरी धरलेली बरी, असंच वाटू लागतं.
अशा अवस्थेत एकच उपाय आशेचा वाटतो, तो म्हणजे सरकारी नोकरी. वाटतं, शिपायाची तर शिपायाची, सरकारी, कायमस्वरूपी, सुटय़ा असणारी, ब:या पगाराची नोकरी असलेली बरी!
भले जाणते लोक म्हणतात कीे, स्थिरता आणि पगारासाठी देशातील तरुणाईने असा विचार करणं योग्य नाही. अशाने देशाचा काहीही विकास होऊ शकत नाही. पण एका गोष्टीचा विचार करा, ज्याच्या घरची परिस्थिती बेताची आहे अशा लोकांनी काय करायचं? आपल्या शहराजवळ नवे उद्योग येतात, पण स्थानिकांना डावलून बाहेरून भरती होतेय हे दिसतं तेव्हा काय करायचं?
आणि मग वाटतं की, ज्या शिक्षणामुळे रोजगार मिळू शकत नाही किंवा दोन वेळची भाकरी मिळवणं जमत नाही अशा शिक्षणाचा काय उपयोग?
मग डिग्य्रांची प्रतिष्ठा डोक्यावर मिरवण्यापेक्षा मिळेल ती नोकरी करावी, त्यात कमीपणा का माना?
पण असं जर तरुण मुलांना वाटत असेल तर यात दोष कुणाचा? लाखो रुपये खर्च करून शिक्षण घेणा:या इंजिनिअर होऊ म्हणणा:यांचा? मुलाला इंजिनिअर करून चांगल्या दिवसांची वाट पाहणा:या आईवडिलांचा? की दिवसरात्न एक करून पीएचडीची स्वप्नं पाहणा:यांचा? की या शिक्षण व्यवस्थेचा? की देशाला नुसतीच स्वप्नं आणि आश्वासनं देणा:या सरकारांचा?
मी उत्तर शोधतोय, कारण मी एक 26 वर्षाचा बेरोजगार इंजिनिअर आहे. ज्याच्या ना अनुभवाचा उपयोग आहे, ना चार वर्षे जीव तोडून घेतलेल्या परिश्रमाचा. मग अशा परिस्थितीत जर मीही चपराशी पदासाठी अर्ज केला तर काय चुकलं माझं?
- विद्रोही