How will face the bodyline attack by Australian bowller's | बॉडीलाइन अंगाराचा सामना कसा करणार?

बॉडीलाइन अंगाराचा सामना कसा करणार?

-अभिजित पानसे

१९३२ ची इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया ॲशेस सिरीज ही बॉडीलाइन सिरीज म्हणून कुप्रसिद्ध आहे. त्या मालिकेने तत्कालीन क्रिकेट जगताला हादरवून सोडले होते. या मालिकेत इंग्लंडच्या कॅप्टन डग्लस जॉर्डनने आपल्या वेगवान बॉलरला ऑस्ट्रेलियाच्या बॅटस्‌मनच्या शरीरावर मारा करायची सूचना दिली होती. या मालिकेत बाउन्सरचा घातक मारा इंग्लंडच्या लारवूड आणि वोस यांनी केला. ऑस्ट्रेलियाचे बॅटस्‌मन जखमी होत राहिले. इंग्लंडने मालिका जिंकली. यानंतर इंग्लंडच्या कॅप्टन डग्लस जॉर्डनची निंदा झाली; पण इंग्लंडचा उद्देश पूर्ण झाला होता. ते मालिका जिंकले होते. १९७५ साली भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेली मालिका खुनी रक्तबंबाळ करणारी मालिका समजली जाते. बिशनसिंग बेदीच्या नेतृत्वाखाली भारतीय टीम वेस्ट इंडिजला गेली होती. कॅप्टन लॉइडने आपल्या भेदक व घातक वेगवान बॉलरना भारतीय बॅटस्‌मनला केवळ जखमी करण्याच्या उद्देशाने बॉलिंग करायला सांगितले होते. वेगवान मायकेल होल्डिंगने ‘राउंड द विकेट’ येऊन एकेका भारतीय बॅटस्‌मनला जखमी केले. त्याकाळी बाउन्सरचा नियम नव्हता. सहाही बॉल बाउन्सर टाकायची मुभा बॉलरना होती. सुनील गावसकर यांनी चिडून अम्पायरला वेस्ट इंडिजच्या या नकारात्मक बॉलिंगबद्दल अपील केले. ‘आम्हाला जिवंत परत भारतात जायचे आहे!’ गावसकर अम्पायरला म्हणाले; पण यावर तेव्हाच्या वेस्ट इंडिजच्या लोकल अम्पायरने फक्त गावसकर यांच्याकडे पाहून स्मित हास्य केले आणि खेळ सुरू ठेवायला सांगितले.

पुढे क्रिकेटचे नियम बदलले; पण सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेली मालिका ही या दोन सिरीजची आठवण करून देत आहे. बॉर्डर-गावसकर मालिका ही आधुनिक काळातील बॉडीलाइन सिरीज म्हणून ओळखली जायला हवी असे वाटते. ऑस्ट्रेलियाच्या बॉलरनी यावेळी कुठलाही मुलाहिजा न बाळगता अत्यंत निष्ठुरतेने, क्रूरतेने बॉलिंग केली आहे.

पॅट कमिन्स, स्टार्क, हेजलवूड, ग्रीन या सर्व सहा फुटांहून उंच असलेल्या वेगवान बॉलरनी भारतीय बॅटस्‌मनवर जहाल वेगवान मारा केला आहे. निर्विवादपणे ऑस्ट्रेलियन बॉलरचा हा कंपू सर्वश्रेष्ठ आहे आणि तो कळपाने शिकार करतोय. कुठलीही दयामाया न दाखविता ते वेगवान बाउन्सरचा मारा भारतीय बॅटस्‌मनवर करीत आहेत. भारतीय बॅटस्‌मन जखमी होत मालिकेबाहेर होत आहेत.

क्रिकेटमध्ये बॉलरसाठी एक अलिखित करार असतो की, ते एकमेकांवर बाउन्सर टाकणार नाही. मुद्दाम ठरवून एकमेकांना जखमी करणार नाही. कारण ते एकाच ‘बिरादरी’चे असतात. त्यामुळे वेगवान बॉलर विरुद्ध टीमचा वेगवान बॉलर जेव्हा बॅटिंगसाठी येतो तेव्हा तो त्याच्यावर मुद्दाम बाउन्सरचा हमला करीत नाही.

यावेळी मात्र ऑस्ट्रेलियाच्या बॉलरने मोहम्मद शमीवर बाउन्सर टाकून त्याचा हात तोडला. भारताचा प्रमुख बॉलर शमी मालिकेतून बाहेर झाला.

दुसरी कसोटी भारताने जिंकल्यावर टीम ऑस्ट्रेलिया चवताळली, बिथरली. तिसऱ्या कसोटीत या वेगवान त्रयीने स्लेजिंग व शरीरावर भेदक मारा सुरू केला. तिसऱ्या कसोटीत पहिल्या इनिंगमध्ये हेजलवूडने रिषभ पंतवर टाकलेल्या बाउन्सरने त्याचे कोपर दुखावले. तो वेदनेने विव्हळत बाजूला गेला आणि बसला. अशावेळी बहुतेकवेळा विरुद्ध टीमचे आजूबाजूचे खेळाडू जखमी बॅटस्‌मनची विचारपूस करतात; पण जवळच असलेला विकेट किपर कॅप्टन टीम पेनने विचारपूस केली ना स्लिपमधील इतर खेळाडूंनी. नॉन स्ट्राइकवरील बॅटस्‌मन पंतजवळ गेला, तोवर फिजिओ आला व त्याला तात्पुरते उपचार देण्यात आले. दहा मिनिटांनी पुन्हा खेळ सुरू झाल्यावर हेजलवूडने उपचार घेतलेल्या रिषभ पंतवर पुन्हा बाउन्सरच टाकला. ऑस्ट्रेलियन बॉलरची ही क्रूरता यावेळी दिसून येत आहे. याच इनिंगमध्ये रवींद्र जडेजावर बाउन्सर टाकून त्याचा अंगठा डिसलोकेट झाला. पुजाराला जखमी करण्याचा प्रयत्न झाला. बुद्धीने अत्यंत हुशार असलेल्या रविचंद्रन अश्विनवर बाउन्सर टाकून त्याच्या बरगड्या तुटतात का, अशी भीती वाटत होती. अश्विनने सर्व बाउन्सर आपल्या अंगावर झेलले. नक्कीच त्याच्या शरीरावर काळे-निळे डाग पडले असणार. याखेरीज हॅमस्ट्रिंग फाटलेला हनुमा विहारी व अश्विन रन घेत नसतानादेखील दोनेकवेळा त्यांच्यावर बॉल थ्रो करण्यात आले. पहिल्या इनिंगमध्ये वेगवान बॉलर सिराज व जसप्रीत बुमराहवर स्टार्कने बाउन्सरचा हमला केला.

ही आधुनिक क्रिकेटमधील निर्विवादपणे कुप्रसिद्ध बॉडीलाइन सिरीज वाटतेय. शिवाय अम्पायरदेखील ऑस्ट्रेलियाचेच आहेत.

उद्यापासून तिसरी व निर्णायक कसोटी ब्रिस्बेन येथे सुरू होत आहे. वेगवान बॉलरचाच येथे दबदबा असतो. अशा स्थितीत भारताकडे बुमराह, शमी, यादव नाहीत. या कसोटीत आणखी किती बॅटस्‌मन जखमी होतात, माहीत नाही; पण तरी भारतीय खेळाडू हिमतीने मुकाबला करतील, अशी आशा आहेच.

मात्र बॉडीलाइन आणि स्लेजिंगसाठी हा दौरा गाजणार, हे नक्की.

( अभिजित ब्लाॅगर आहे.)

Web Title: How will face the bodyline attack by Australian bowller's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.