how middle class youth jumps to crime world. | पिंटय़ा ते भाई - पोरांची टाळकी कुठून बिघडतात?
पिंटय़ा ते भाई - पोरांची टाळकी कुठून बिघडतात?

ठळक मुद्देहाणामारी, लहानशा चोर्‍या, घरातही किरकोळ चोर्‍या, चोरलेल्या वस्तूंची विक्री हे करताना पालकांचा, नातेवाइकांचा, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल असा एक धाकही उरलेला नाही.

श्याम बागुल

 ‘तू न मुझको चाहो तो कोई बात नहीं, किसी और को चाहोंगी तो मुश्कील होगा’ अशा धमकीवजा प्रेमाच्या शब्दात प्रेमिकेला आपल्या कह्यात ठेवू पाहणार्‍या ‘दिल ही तो  है’ या चित्रपटातील गीत जवळपास पाच दशकांपूर्वीचे. राज कपूरने नूतनला अप्रत्यक्षपणे गाण्यातून दिलेली धमकी आज 50 वर्षानंतर आजच्या गुन्हेगार प्रेमवीरांकडून खरी करून दाखवली जात आहे. त्यातूनच हिंगणघाटसारख्या घटना लागोपाठ महाराष्ट्रात घडू लागल्या आहेत. त्यातून आता कायद्याचा धाक संपला असा सरळधोपट अर्थ काढून समाज पोलिसांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभा करतोय. दुसरीकडे समाजच आपली जबाबदारी, कर्तव्य मात्र झटकताना दिसतो.
मुळात गुन्हेगारांचा जन्मही याच समाजात होतो. पोलीस दफ्तरी नोंदवलेल्या अनेक घटना आता असे पुराव्यानिशी सांगतात की, सुशिक्षित, मध्यमवर्गीय, सुसंस्कारी कुटुंबातील तरुणच नाही, तर किशोरवयीन मुलांचाही गुन्हेगारी कृत्यातील सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. नववी, दहावीपासूनच आता तरुणांना महाविद्यालयीन जगाची स्वप्न पडतात. त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी ते दहावीपासूनच जी रंगीत तालीम सुरू करतात त्याकडे कुटुंबाचं दुर्लक्ष होतं आणि त्यांच्यातील बेदरकारपणा वाढीस लागतो. गल्लीच्या कोपर्‍यावर टोळके घेऊन बसणार्‍या या किशोरवयीन तरुणांचा जसा जसा संपर्क वाढतो, तशा त्यांच्या कार्यकक्षा अधिक वाढतात. गल्लीच्या कोपर्‍यावरून लगतच्या चौकात व तेथून पुढे सुरक्षित अड्डय़ांवर त्यांची ऊठबस वाढीस लागते. तिथं त्याचं नामकरण ‘भाई, दादा, अण्णा, नाना असे केले जाते. सात-आठ जणांचे टोळके स्वतर्‍भोवती कायम राहील याची पुरेपूर काळजी घेणारा हा स्वयंघोषित ‘भाई’ कधीतरी प्रतिस्पध्र्याशी दोन हात करण्यासाठीही भिडायला लागतो. त्यातून खूप मोठी हाणामारी होते असे नाही; पण स्वतर्‍चे बळ आजमावण्याबरोबरच, आपल्यापाठीमागे कोणाकोणाचे आशीर्वाद आहेत, आपण कोणत्या गॅँगशी संबंधित आहोत हे प्रतिस्पध्र्याला दाखविण्याची संधी त्याला मिळते. प्रभागातील राजकीय पुढारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधीचा आपल्यावर राजकीय वरदहस्त असावा असेही वाटू लागते. अशा तरुणांचा वापर करण्यासाठी तत्पर असलेल्या राजकारण्यांकडून त्याला योग्य तो प्रतिसादही दिला जातो. 
हे सारे आपल्या मुलासोबत कधी घडते हे पालकांना कळतंही नाही. तोवर तिकडे त्यांचा घरात अगदी लहानसा ‘पिंटय़ा’ असलेला पोरगा बाहेरच्या जगात ‘भाई’ म्हणून ओळखला जाऊ  लागतो. काही पालकांना तर हे सारेही फार गोड वाटते. त्याच्या आजूबाजूला फिरणारे टोळके, राजकीय व्यक्तींकडून होणारे बोलावणे, रस्त्याने जाता-येताना पडणारे नमस्कार काही पालकांनाही कौतुकाचे व प्रतिष्ठेचे वाटू लागतात. अशातच एखादा किरकोळ मारहाणीचा गुन्हा त्याच्या हातून घडला व पोलिसांनी रात्रभर कोठडीत डांबून ठेवल्यानंतर त्याची दुसर्‍या दिवशी जर सुटका केली तर ‘भाई’च्या प्रतिष्ठेला आणखी एक स्टार लागतो. मात्र हा स्टार लागताना त्याच्या मनात पोलीस, कायदा, न्याय, सामाजिक दबाव या सार्‍या गोष्टींविषयी लहानपणापासून असलेली भीती नष्ट होते. अशा भीतीतूनच पुढे मग कशासाठी काहीही करायला तो तयार होतो, हे त्याच्या गुन्हेगारी प्रगतीचे खरे सत्य.
साधारण याच मार्गाने आता मध्यमवर्गीय, कनिष्ठ, सुखवस्तू घरातली आणि सुजाण म्हणवणार्‍या पालकांची मुलेही गुन्हेगारी जगातला प्रवास करू लागली आहेत. हाणामारी, लहानशा चोर्‍या, घरातही किरकोळ चोर्‍या, चोरलेल्या वस्तूंची विक्री हे करताना पालकांचा, नातेवाइकांचा, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल असा एक धाकही उरलेला नाही. जे आवडले ते आपल्याला मिळालेच पाहिजे असा पैसे फेकून गोष्टी उपभोगण्याच्या वृत्तीने तेच सारे वाटणे मुलींविषयीही दिसून येते. जी मुलगी आवडली म्हणून ‘ती’ आपलीच झाली पाहिजे असा अट्टाहास वाढत चालला आहे. आणि ते नाहीच झाले तर त्या मुलीला त्रास देणे अश्लील हावभाव, विनयभंग, अश्लील शेरेबाजी, नको त्या ठिकाणी स्पर्श,  प्रसंगी जबरदस्ती असेही उद्योग सर्रास केले जातात.  


( लेखक लोकमतच्या नाशिक आवृत्तीत मुख्य उपसंपादक असून, त्यांना गुन्हेवार्ताकनाचा प्रदीर्घ अनुभव आहे.)
 

Web Title: how middle class youth jumps to crime world.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.