परफेक्ट जिन्स कशी शोधाल?
By Admin | Updated: November 20, 2014 17:48 IST2014-11-20T17:48:55+5:302014-11-20T17:48:55+5:30
‘चांगली’ जिन्स घ्यायची तर, आपल्याला नक्की काय माहिती हवं?

परफेक्ट जिन्स कशी शोधाल?
>‘मला ना चांगली जिन्स घ्यायची आहे’
-असं म्हणणारे आणि चांगली, परफेक्ट फिटिंगची जिन्सच मिळत नाहीये अशी तक्रार करणारे तर अनेकजण असतात.
पण मुळात ‘चांगली’ जिन्सची पॅण्ट घ्यायची म्हणजे कोणती आणि कशी पॅण्ट घ्यायची हेच कळत नाही?
‘चांगल्या’ पॅण्टचे निकष काय?
आणि जिन्स काय आपण वर्षाकाठी घेत नाही, चांगली-आवडीची जिन्स अनेकजण वर्षानुवर्षे वापरतात. मात्र अशी ‘चांगली’-‘परफेक्ट’ जिन्स शोधणं हे अत्यंत जिकिरीचं आणि अवघड काम असतं. ते कसं जमावं? त्यासाठीच ही काही सोपी सूत्रं.
उंच-जाड-बुटके-बारीक
-तुम्ही नेमके आहात कसे?
आपण कसं दिसावं हे वाटणं ‘वेगळं’, पण आपण जसे ‘आहोत’ तसं मान्य करणं हे वेगळं. त्यामुळे तुम्ही जसे दिसता आहात, तसे मान्य करा . आत्ता जाड आहोत, बारीक झाल्यावर वापरू असं म्हणत आता जिन्स घेण्याचं काहीच कारण नाही. त्यामुळे तसं करू नका. आपल्या बॉडीटाईप प्रमाणं जिन्स घेणं महत्त्वाचं.
बुटके आहात?
तुम्ही ठेंगणे-ठुसके असाल तर त्या मापाची जिन्स घ्या. काहीजण उगाच मोठी पॅण्ट घेतात आणि मग ती घोट्यापाशी गोळा होते. घड्या दिसतात. तशी जिन्स अजिबात घेऊ नका. ते फार गबाळं दिसतं. त्यापेक्षा योग्य मापाची जिन्स घेतली तर तुमचे पाय लांबसडक दिसतील. हल्ली फॅशनेबल असणार्या स्किनी अर्थात तंग, पायाला चिकटणार्या जिन्सही तुम्ही घेऊ शकता.
उंच आहात?
उंच व्यक्तींनी लॉँग इन-सीम पॅण्ट जरुर घ्याव्यात. एक्स्ट्रा लॉँग लांबीच्या जिन्समुळे तुमचे पाय फॅँटास्टिक लांबसडक दिसू शकतात. लोक तुमच्याकडे पाहतील, ‘जिन्स’कडे नाहीत. स्किनी, तंग, पायाला चिकटणार्या जिन्सही तुम्ही बिनधास्त वापरू शकता.
जाडजुड आहात?
जाडजुड मुलामुलींनी जिन्स घालावी की नाही हा प्रश्न अनेकांना पडतो. तर जरुर घालावी, पण ती घालताना काही नियम नक्की लक्षात ठेवावेत. जाडसर मांड्या असतील फार तर जरा पायघोळ, घोट्यापाशी सैल असणारी, बॉटम मोठं असणारी जिन्स घ्यावी. म्हणजे मग पाय फार जाड आहेत असं वाटणार नाही. स्ट्रेट जिन्स, क्लासिक फिट जिन्स घेणं फार चांगलं. म्हणजे अनावश्यक आकारउकार दिसणार नाहीत. स्ट्रेच जिन्सही घेऊन पहायला हरकत नाही, त्यातही तुम्ही जरा बारीक दिसाल.
ट्रायल अँण्ड नो एरर
घाईगडबडीत जिन्स खरेदी करू नका. ते फुरसतीचं काम आहे.
8 आवडली, ब्रॅण्डेड आहे, आपल्याच साईजची आहे म्हणून घालून न पाहता जिन्स कधीच विकत घेऊ नये. ट्राय करुन पहाणं मस्ट.
8 ती जिन्स घालून चालून पहा. वाका. खाली बसा. खाली वाकून काहीतरी उचला. जर ती कंबरेतून घसरतेय,खाली सरकतेय असं वाटलं तरी कितीही आवडली तरी ती जिन्स अजिबात खरेदी करु नका. अशी ‘घसरणारी’ जिन्स सावरत बसणं फार वाईट दिसतं. बेल्ट लावू, त्यात काय असं म्हणणं तर अजूनच वेडेपणा.
- घट्ट होणारी जिन्स घेऊ नका, वजन कमी करतोय, बारीक झाल्यावर घालू, अजिबात नाही. घ्यायची तर मापाचीच. फार सैल नको, फार घट्ट नको.
- वेगवेगळ्या स्टाईल्सच्या जिन्स घालून पहा. त्यातून आपल्याला कोणती चांगली दिसते हे नक्की कळेल.
- जिन्स खरेदीला जाताना मित्राला, मैत्रिणीला सोबत घेऊन जा. म्हणजे कुठली जिन्स चांगली दिसतेय, हे तो नक्की सांगेल.
- तुमचा पूर्ण फोकस हा फिटिंगवर ठेवा, ब्रॅण्डवर नाही.
जिन्स नव्हे, इन्व्हेस्टमेण्ट!
- परफेक्ट जिन्स मिळणं हे अवघड काम. त्यात जर तुम्हाला हवी तशी परफेक्ट जिन्स मिळालीच तर बजेट थोडं ताणून ती जरुर घ्या. म्हणजे ती चांगली जिन्स तुम्ही नियमित काही वर्षे वापरू शकता. पैसे वसूल होऊ शकतात.
- स्वस्तातल्या, भलत्याच कलरच्या जिन्स घेऊ नका. त्या वापरल्या जात नाहीत, पैसे वाया जातात.
- उत्तम जिन्स म्हणजे ‘लक’, शोधत रहा, सापडेल!
- प्राची खाडे
स्टायलिस्ट आणि पर्सनल शॉपरपरफेक्ट जिन्स