ये ना, रिमझिम बरसत.
By Admin | Updated: August 1, 2014 11:41 IST2014-08-01T11:41:12+5:302014-08-01T11:41:12+5:30
भिरभिरत्या नजरेनं तुझी वाट पाहणं. त्या वाटेकडे लागलेले डोळे अन् अधीर पाऊसवेडं मन ! तू येणार पुन्हा एकदा.

ये ना, रिमझिम बरसत.
>भिरभिरत्या नजरेनं तुझी वाट पाहणं. त्या वाटेकडे लागलेले डोळे अन् अधीर पाऊसवेडं मन !
तू येणार पुन्हा एकदा.
या जाणिवेनंच मन मोहरून जातं, आठवणीनं फुलपाखरासारखं अलगद भिरभिरू लागतं. तशा तुझ्या-माझ्या आठवणी अगदी खूप-खूप आहेत. आठवायचं म्हटलं तर हिशोब जुळायचा नाही.
खरंच सांग, तुलासुद्धा वाटते का रे एवढी ओढ मला भेटायची? या सृष्टीला रानावनाला, झाडावेलींना नवपालवीला चिंबचिंब भिजविण्याची?
तुझी वाट पाहणारा खट्याळ वारा हळूच कळीला विचारतो, चाहूल ही कुणाची? कळी लाजते अन् झाड हसतं. माझ्या मातीच्या अंगणालाही सुगंधात न्हाऊन निघायचं असतं.
आणि मला मात्र आठवायला लागतं तुझं रिमझिमणारं रूप. अंगणभर साचलेल्या पाण्यात सोडलेल्या कागदी होड्या. तुळशीपुढे ठेवलेल्या सांजदिव्याभोवती साचलेले टप्पोरे पाण्याचे मोती.
ओलेती हवा. रिमझिमणारा पाऊस अन् भिजल्या पाखरांनी पंखावर झेललेल्या पाऊसधारा. ओलं झालेलं त्यांचं घरटं. आणि पहाटे-पहाटे तुझं येणं. भिजलेलं अंगण, झाडवेली अन् पक्षी तुझ्या येण्याचं गीत गातात. दुपारी तू लपंडाव खेळतो तर सांजवेळी निवांतपणे बरसतोस. रात्रभर धसमुसळा कोसळत जातो. कधीकधी तर आठाठ दिवस झडी लावतोस.
खरंच प्रश्न पडतो मला तू थकत नाहीस का?
खेड्यामधल्या कौलारू घरा-घरावरून कोसळत अंगणातून गावातल्या नदीकडे वाहतो. तुलाही ओढ त्या नदीच्या प्रवाहासह सागराकडे जाण्याची.
सुसाट वारा, थयथयाट करणारी वीज आणि तुझा आवेश भीती वाटतेही कधीकधी. आणि वाटतं का, तू असं रूप बदलून बदलून भेटतोस.नवानवाच वाटतोस. आता तर कौलारू घरही हरवत चाललंय. शहरातल्या सिंमेटच्या जंगलात तू येतोस, खिडकीच्या चौकोनातून भेटतोस. आणि मग आठवत राहतात तुझी ही सारी रुपं.
मग अचानक शब्द येतात कागदावर.
पुन्हा-पुन्हा रे तुझ्याचसाठी
गीत आठवते मृदू शिरव्याचे..
असाय ये मग माझ्या अंगणी
रिमझिम बरसत ये..
रिमझिम बरसत ये..
- प्रा. डॉ. प्रियदर्शिनी
देशमुख