निम्मी वर्गणी गरजूंना
By Admin | Updated: August 29, 2014 10:11 IST2014-08-29T10:11:16+5:302014-08-29T10:11:16+5:30
सांगलीचा वखारभाग म्हणजे एकेकाळची व्यापारी पेठ. गुजराती आणि राजस्थानी मंडळींचा हा भाग. ५४ वर्षांपूर्वी म्हणजे १९६१ मध्ये वखारभाग, मार्केट यार्डमधील व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी गणेशोत्सव सुरू केला. मंडळाचं नावही ठरलं,

निम्मी वर्गणी गरजूंना
लक्ष्मीनारायण मंडळ,
सांगली
सांगलीचा वखारभाग म्हणजे एकेकाळची व्यापारी पेठ. गुजराती आणि राजस्थानी मंडळींचा हा भाग.
५४ वर्षांपूर्वी म्हणजे १९६१ मध्ये वखारभाग, मार्केट यार्डमधील व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी गणेशोत्सव सुरू केला. मंडळाचं नावही ठरलं,
‘श्री लक्ष्मीनारायण’. पौराणिक, भव्य, हलत्या देखाव्यांसाठी या मंडळाची जिल्हाभरासह शेजारच्या कर्नाटकातही ख्याती. मात्र आजपासून पंचवीस वर्षांपूर्वीच या मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवासाठी जमा होणार्या वर्गणीतून निम्मी वर्गणी केवळ सामाजिक उपक्रमांवर खर्च करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून अगदी नेमानं दरवर्षी दोन ते तीन लाख रुपयांची पुंजी गरजू रुग्णांच्या उपचारासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यासठी बाजूला काढून ठेवली जाते.
पूर्वी मंडळाच्या मिरवणुकीवर हजारो रुपये खर्च होत. त्यावेळी बंकटलाल मालू, हेमंत काबरा, श्रीकांत र्मदा, मनोहर सारडा, लक्ष्मीकांत मालपाणी या तेव्हाच्या ‘तरुण तुर्कां’ची बैठक झाली. त्यांनी मिरवणूक, गुलाल, आतषबाजीला फाटा दिला आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करायची शपथच घेतली!
शासकीय रुग्णालय, शहरातील खासगी रुग्णालयांना गरजू रुग्णांवर उपचार आणि शस्त्रक्रिया यासाठी धनादेश देण्यात येतो. साधारण दीड लाख रुपयांची मदत केली जाते. मदत कोणाला द्यायची, याचा शोध जाणकार कार्यकर्ते घेतात. दुसरीकडं वस्तीतल्या पालिकांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात येतं.
मंडळाच्या नावावरील ठेवींच्या व्याजापोटी ५0 हजार रुपये गोळा होतात. उर्वरित वर्गणी कार्यकर्त्यांच्या खिशातून दिली जाते. महत्वाचं म्हणजे डॉल्बी, मिरवणूक, गुलाल, चुरमुर्यांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी याला मंडळानं कायम फाटा दिलाय. मंडळाचं आज स्वत:चं ‘माहेश्वरी भवन’ नावाचं मंगल कार्यालय आहे, सामाजिक कार्यासाठी ते निम्म्या भाड्यात उपलब्ध करून दिलं जातं.
- श्रीनिवास नागे