ग्रेटा थनबर्ग जगभरातल्या नेत्यांना ठणकावून विचारतेय, मी रस्त्यावर का उतरले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 07:59 AM2019-12-19T07:59:00+5:302019-12-19T08:00:14+5:30

पत्रकार मला विचारतात, जागतिक हवामान बदलाबाबत तू मांडतेस ते प्रश्न योग्य आहेत; पण त्यावर उपाय काय? - ते मी कसे सांगू? आणि का सांगू?

Greta Thunberg calls on leaders around the world, why did I hit the road? | ग्रेटा थनबर्ग जगभरातल्या नेत्यांना ठणकावून विचारतेय, मी रस्त्यावर का उतरले?

ग्रेटा थनबर्ग जगभरातल्या नेत्यांना ठणकावून विचारतेय, मी रस्त्यावर का उतरले?

googlenewsNext
ठळक मुद्देआय आस्क यू टू स्टॅँड ऑन द राइट साइड ऑफ द हिस्ट्री!

- ग्रेटा थनबर्ग- अनुवाद : अपर्णा वेलणकर

क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिग हे शब्द मला पहिल्यांदा समजले, तेव्हा मी आठ वर्षाची होते. माणसाने आपल्या स्वार्थासाठी निसर्गाला ओरबाडणं सुरू केलं, ाणि म्हणून सगळं हवामानच बदलून जाण्याची भीषण परिस्थिती ओढवली आहे; असं मला शाळेत सांगितलं गेलं. तेव्हापासून अनेक प्रश्न मला पडायला लागले.
पृथ्वीच्या पोटातलं तेल, कोळसा उपसून ते इंधन म्हणून जाळण्यानं आपण वातावरणाची एवढी मोठी हानी करतो आहोत, हे सिद्ध झालेलं आहे; तर मग अजूनही आपण ते का करतो? अशा इंधनांचा वापर आपण थांबवलेला का नाही? आजही रोज जंगलं तुटतात, त्यावर बंधनं का नाहीत? बंदी का नाही? सामान्य माणसांना काहीच कसं माहीत नाही? त्यांना कुणी का सांगत नाही? जगात एवढे बडे नेते आहेत; त्यातलं कुणीच काही करत का नाही?
- या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली नाहीत, म्हणून मीच बोलायचं ठरवलं.
आणि फक्त मीच नाही, जगातली आम्ही सगळी मुलं मिळून मोठय़ा माणसांना काही प्रश्न विचारायला रस्त्यावर उतरलो.
 क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिग या विषयातली मी काही तज्ज्ञ नाही; पण काही महत्त्वाचे मुद्दे मी समजावून घेतले आहेत. त्याबद्दल मी सांगू शकते.
आज आपण निसर्गाशी जसे वागतो आहोत, तसेच वागत राहिलो, तर 2030 सालार्पयत आपण ‘पॉइंट ऑफ नो रिटर्न’ला पोहोचू. म्हणजे असा टप्पा की जिथून परतीचा मार्ग बंद होईल. आपण ज्या चुका केल्या आहेत, त्या सुधारायची, निस्तरण्याची संधी आपल्याला मिळणार नाही; कारण तोवर आपण निसर्गातल्या परिसंस्था ‘सुधारता न येण्याजोग्या अवस्थेत’ नेऊन ठेवलेल्या असतील.
आयपीसीसी ही जगभरातल्या देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेली  महत्त्वाची संस्था आहे. आयपीसीचा ताजा अहवाल म्हणतो, पृथ्वीच्या तापमानात होणारी वाढ दीड अंशाच्या आत राखण्याची शक्यता 67 टक्के एवढी असायला हवी असेल, तर 1 जानेवारी 2018 या दिवशी आपल्या ‘ग्लोबल कार्बन बजेट’मध्ये 420 गिगाटन्स एवढा कार्बन डायऑक्साइड शिल्लक आहे. सोप्या शब्दात, तापमान वाढ दीड अंशाच्या आत राहण्याची शक्यता जिवंत राहायला हवी असेल, तर आपण सगळे देश मिळून 420 गिगाटन्स एवढय़ाच वजनाचा कार्बन डायऑक्साईड उत्सजिर्त करू शकतो. त्याहून जास्त नाही. कारण आपल्या कार्बन खात्यात आपण आधीच बरीच उधळमाधळ करून ठेवलेली आहे. सध्या आपण दरवर्षी सरासरी 42 गिगाटन्स एवढा कर्बवायू उत्सजिर्त करतो.
ताज्या आकडेवारीनुसार ग्लोबल कार्बन बजेट आत्ताच 360 गिगाटन्सवर आलेलं आहे.
- तर,आता करा हिशेब!
आत्ता आपण जे वागतो आहोत, त्यात काहीच बदल केला नाही तर येत्या आठ ते साडेआठ वर्षात आपण आपलं सगळं  ‘कार्बन बजेट’ संपवून बसलेलो असू. म्हणजेच आपण या पृथ्वीला ‘पॉइंट ऑफ नो रिटर्न’च्या कडय़ावर नेऊन ठेवू. एकदा तिथं पोहोचलो की मग आपल्या हाती काहीही उरणार नाही.
अजून आठ र्वष.. म्हणजे, मी तेव्हा जेमतेम चोवीस वर्षाची असेन. म्हणजे र्अध आयुष्यही जगले नसेन मी!
मग मला सांगा, इतकी आणीबाणीची परिस्थिती असताना आणि वयाच्या पंचविशीनंतर मला श्वास तरी घेता येईल की नाही याची खात्री वाटत नसताना मी माझ्या उत्तम भवितव्यासाठी शाळेत जाऊन अभ्यास करावा असा आग्रह मोठय़ा माणसांनी का बरं धरावा? त्यांना तो अधिकार तरी आहे का?
- माझ्याबरोबर असलेल्या सगळ्या मुलांचं हेच म्हणणं आहे! आमच्या भविष्याची पुरती वाट लावण्यात मोठी माणसं इतकी गुंतलेली असताना आणि कुणीच आपलं वर्तन बदलायला तयार नसताना आम्ही मुलांनी मात्र झापडं लावून गप्प बसावं आणि शाळा-कॉलेजात मुकाटय़ानं शिकत राहावं, हा मूर्खपणा नाही का?
- म्हणूनच आम्ही आठवडय़ातला एक दिवस- दर शुक्रवारी शाळा-कॉलेजात जाणार नाही, अशी घोषणा केली आहे. आम्ही जगभरातली मुलं उभारत असलेल्या या आंदोलनाचं नाव आहे र्‍ फ्रायडेज फॉर फ्यूचर!

गेले काही महिने मी युरोपमध्ये आणि जगभरातल्या आणखी काही देशांमध्ये फिरते आहे.
पत्रकार मला विचारतात, जागतिक हवामान बदलाबाबत तू मांडतेस ते प्रश्न योग्य आहेत; पण त्यावर उपाय काय?
- ते मी कसे सांगू? आणि का सांगू?
मोठी माणसं म्हणतात की, इतक्या मोठय़ा प्रमाणावर कार्बन उत्सजर्नाला आळा घालणं अशक्य आहे. पर्यावरणवादी सांगतात ती पर्यायी जीवनशैली स्वीकारणं अशक्य आहे.
- पण मग चंद्रावर जाणं तरी कुठे ‘शक्य’ होतं?
  ‘अशक्य’ वाटणार्‍या अनेक गोष्टी माणसानं साध्य केल्याच आहेत की आजवर! कधीच सुटणं शक्य नाही असं वाटणारी अनेक कोडी सोडवली आहेत. अनेक दुर्धर आजारांवर मात करण्याचं तंत्र शोधून काढलं आहे. यंत्रालाही ‘विचार’ करायला शिकवलं आहे.
मग पर्यावरण रक्षणाच्या वाटेतच एवढे पण आणि परंतु का?
- कारण त्यामध्ये जगातल्या आर्थिक महासत्तांचं आणि बडय़ा कंपन्यांचं अर्थकारण लपलेलं आहे. एरव्ही महत्त्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी असलेली मोठी माणसं पर्यावरणाचा विषय आला, की सर्रास खोटं बोलतात, कारण कुणालाही आत्ता आपल्या खिशाला कातरी लागलेली चालणार नाही.
मोठय़ा माणसांच्या जगात महत्त्वाचा आहे तो फक्त पैसा. गुंतवलेल्या पैशावर मिळणारा नफा. हे संकट फक्त पैसाच महत्त्वाचा मानणार्‍या बडय़ा कंपन्यांनी, भांडवलदारांनी आणि जगावर राज्य करण्याच्या महत्त्वाकांक्षेनं पछाडलेल्या महासत्तांनी ओढवून घेतलेलं आहे. निसर्गाला ओरबाडलं ते ह्या लोकांनी! त्यातून आपले खिसे भरले ते ह्या लोकांनी!! स्वतर्‍साठी अवाढव्य पैसा, संपत्ती कमावताना ह्या सगळ्यांनी गरीब देशांना, गरीब लोकांना लुबाडलं आहे. त्यांना उपाशी ठेवून त्यांच्या वाटचे नैसर्गिक स्नेत आपणच ओरबाडून संपवले आहेत.
आम्ही मुलं अशी मागणी करतो आहोत की, या लोकांनी, या कंपन्यांनी, या देशांनी आणखी नफा, आणखी पैसा कमावण्याचा हव्यास निदान आतातरी सोडावा आणि आपले ‘क्लायमेट गोल’ निश्चित करावेत. पृथ्वीवरून होणारं कार्बन उत्सजर्न रोखण्यात आपला संपूर्ण वाटा ताबडतोब उचलावा. 
हे संकट किती गंभीर आहे, याची कल्पना असलेली जाणती माणसं  गेली पंचवीस र्वष संयुक्त राष्ट्रांच्या ‘क्लायमेट कॉन्फरन्सेस’च्या दारात उभी राहून जगभरातल्या नेत्यांना विनवण्या करीत आली आहेत. निर्णय घ्या, कृती करा अशा विनंत्या करत, आग्रह धरत आली आहेत.
- त्याचा काहीही उपयोग झालेला नाही, कारण कार्बन उत्सजर्न कमी होणं सोडाच; उलट ते वाढतच गेलं आहे.
म्हणून मी राजकीय नेत्यांना काहीही सांगायला जाणार नाही.
त्याऐवजी मी माध्यमांना सांगेन की या ‘संकटा’चा उल्लेख ‘संकट’ म्हणूनच करायला सुरुवात करा.


मी जगभरातल्या सामान्य माणसांना सांगेन की, आपल्या राजकीय नेत्यांनी आपल्याला अंधारात ठेवलेलं आहे; हे समजून घ्या. त्यांना जाब विचारायला सुरुवात करा.
.गेली अनेक र्वष चालत आला, तो मूर्खपणा तसाच चालू ठेवण्याइतका वेळ आता माणसाच्या हाती उरलेला नाही.
- आम्ही मुलं फक्त हे एवढंच सांगायला रस्त्यावर उतरलो आहोत. काही मोठय़ा माणसांना आमचा एवढा राग का येतो, कोण जाणे! काही राजकीय नेते, बडे उद्योगपती, बडय़ा कंपन्या आणि काही पत्रकारही आमच्यावर टीका करतात. ही मुलं उद्धट आहेत, असं म्हणतात. आमच्यावर ओरडतात. आमची चेष्टा करतात. आम्हाला धमक्यासुद्धा देतात.
जीवाश्म आणि खनिज इंधन यावर उभा असणारा आजच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा उद्या आम्हा मुलांच्या जिवावर उठणार आहे, हे तुम्हा मोठय़ा माणसांना कळत नाही का? आजच्या ‘विकासा’ची मोठी किंमत आम्हा मुलांना ‘उद्या’ चुकवावी लागणार आहे, हे तुम्हाला पटत नाही का?
जर मी वयाच्या 100 वर्षार्पयत जगले, तर 2103 साली मी जीवंत असेन.
.पण  2050 सालानंतर पृथ्वीवर मानववंश जीवंत राहू शकेल असं वातावरण उरेल की नाही; याची चिंता शास्त्रज्ञांना आजच लागलेली आहे. 
.. म्हणजे 100 र्वष सोडाच, मी वयाची पन्नाशीसुद्धा कदाचित गाठू शकणार नाही.
.. म्हणजे माझ्या वाटय़ाचं निम्मं आयुष्य गेलं! 
 आमच्या हक्काचं आयुष्य उद्या आम्हाला कदाचित मिळणार नाही, कारण आमचे आजी-आजोबा, आई-वडील ‘आज’ बदलायला तयार नाहीत!
आम्ही मुलं रस्त्यावर उतरलो आहोत ती जागतिक नेत्यांकडे आमच्या भविष्याची भीक मागण्यासाठी नव्हे, सारी मोठी माणसं लहान मुलांसारखी वागत असताना आम्ही मुलांनाच आता शहाण्यासारखं वागण्यावाचून पर्याय राहिलेला नाही म्हणून!

या जगातल्या सगळ्या बडय़ा नेत्यांना, उद्योगपतींना, श्रीमंत भांडवलदारांना माझं आवाहन आहे.. मी चुकीचं बोलतेय असं तुम्हाला वाटत असेल, तर तसं सिद्ध करा.
सत्याची बाजू घ्या.
आय आस्क यू टू स्टॅँड ऑन द राइट साइड ऑफ द हिस्ट्री!
पृथ्वीची तापमानवाढ दीड अंशाच्या आत राखली जावी यासाठी जे शक्य आहे ते सगळं करा. तुमच्या उत्पादनाची पद्धत बदला. व्यवसायाची रीत बदला. राजकारणाची दिशा बदला. सरकारांचे निर्णय बदला.
आय डोन्ट वॉन्ट युवर होप. आय डोन्ट वॉन्ट टू बी होपफुल. आय वॉन्ट यू टू बी पॅनिक!
मला रोज भीती वाटते. मला सतत भीती वाटते. ती तुम्हालाही वाटली पाहिजे.
भीती वाटली, म्हणजे तरी तुम्ही कृती कराल.
आपल्या घराला आग लागली, तर आपण काहीही न करता स्वस्थ बसून राहू का?
उठा.
आपल्या सगळ्यांच्या घराला खरंच आग लागली आहे!



(जगभरातील मुलांना प्रेरणा देऊन आंदोलनात उतरण्यास भाग पाडलेली पर्यावरणवादी कार्यकर्ती.)
...............

(स्वान्ते थनबर्ग (ग्रेटाचे वडील), फ्रायडेज फॉर फ्युचर, डॅनियल डोनल (ग्लोबल स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन काउन्सिल) आणि एम्मा ब्रोक्स (ब्रिटिश लेखिका, मुक्त पत्रकार)यांच्या सहकार्याने प्राप्त झालेला मूळ लेख  ‘दीपोत्सव’ या लोकमतच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला. त्या लेखाचे हे संक्षिप्त, संपादित रूप) 

 


 

Web Title: Greta Thunberg calls on leaders around the world, why did I hit the road?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.