मातीशी असलेली नाळ तोडून ‘हिरो’ कसे बनाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 07:50 AM2019-11-21T07:50:00+5:302019-11-21T07:50:01+5:30

इंग्लिश मीडिअम पाहिजे, ब्रॅण्डेड गॉगल पायजे, शूजना चिखल नाय लागला पायजे, हे सगळं आईबापाच्या पैशावर मिळवता येईल! पण पुढं काय? टिकाल कसं नव्या जगात?

go back to your roots, for the answers. | मातीशी असलेली नाळ तोडून ‘हिरो’ कसे बनाल?

मातीशी असलेली नाळ तोडून ‘हिरो’ कसे बनाल?

Next
ठळक मुद्देकाळ्या आईला त्यांनी सांभाळलं, तिनं त्यांना भरभरून दिलं. अस्सल हीरो असा घडतो.

- मिलिंद थत्ते

मागच्या पिढीत अशी फॅशन होती की, मुलाखतीला जाताना किंवा नोकरीच्या ठिकाणी जाताना सूट-बूट-टाय घालून जायचं. आताच्या पिढीत अशी फॅशन ग्रामीण भागात आलीय की गावोगावच्या शाळेतील मुले गळ्यात टाय लावून शाळेत जातायत. याउलट जे देश पूर्वी टायवाले होते, त्यांनी आता ते सोडलंय.
आयआयटीसारख्या एखाद्या लयभारी क्रीम विद्यापीठात गेलात तर असं दिसेल की बहुसंख्य विद्यार्थी गोल गळ्याचे गबाळे टीशर्ट आणि पाऊण पॅण्ट (कापरी का काय म्हन्त्यात ते) घालून हिंडत असतात. काही प्रोफेश्वरही अशा वेशात किंवा खादीचा झब्बा किंवा साधी शर्टपॅण्ट घालून असतात. एकही माणूस सूट-बूट-टाय घालून दिसत नाही. इंग्रजांची नक्कल करायला आमच्या पूर्वीच्या पिढय़ांनी हा टायचा फास गळ्यात घालून घेतला होता. आपल्यासारख्या गरम हवामानाच्या देशात अंगाला चिकटणारे घट्ट निबर कपडे घालणं हे मूर्खपणाचं आहे. हे हळूहळू बुद्धिमान लोकांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी या नकला करणं सोडून दिलं. आम्ही गावातली मानसं मात्न आताच त्या खड्डय़ात पडलोय !
दोस्तहो, हा खड्डा फक्त टायचा नाही, आपण करत असलेल्या सर्वच नकलांचा आहे. 
आपले सगळे लक्ष इंटरनेटवरून दिसणार्‍या एका काल्पनिक जगात अडकलं आहे. आपल्या हाताशी काय आहे, आपली मुळं कुठे रुजली आहेत हे न पाहता आपण नुसत्या नकला करतो आहोत.
हे म्हणजे सिंहाच्या छाव्याने मेंढय़ांच्या कळपात राहून मेंमें करण्यासारखं आहे. आम्हाला इंग्लिश मीडिअम पाहिजे, ब्रॅण्डेड गॉगल पायजे, शूजना चिखल नाय लागला पायजे, हे सगळं आईबापाच्या पैशावर मिळवता येईल !
पण त्यानंतर काय?
इंग्लिश बोलता येईल; पण त्याचा जगायला उपयोग शून्य!
ज्याने आपली मुळं ओळखली, तो जग कितीही कसंही बदललं तरी टिकू शकतो. आपण ज्या गावात राहतो, तिथली माती-पाणी-जंगल आणि तिथल्या माणसांची त्याबद्दलची समज - ही आपली मुळं आहेत. ही कधी आपल्याला सोडून जाणार नाहीत. त्यांना आपण संपत्ती मानतो की कचरा? यावर आपलं भविष्य ठरणार आहे.
ज्ञानेश्वर बोडके यांचं नाव ऐकलंय तुम्ही? पदवीधर झाल्यावर नोकरी करताना ज्ञानेश्वरभाऊंच्या लक्षात आलं की, या नोकरीत आपण खुरडणार. त्यांनी पुन्हा शेतीकडे वळायचं ठरवलं. आपली माती-पाणी-माणसं ओळखली आणि ठरवलं की शेतकर्‍याला एका एकरातून रोज एक हजार रुपये मिळाले पाहिजे. भाजीपाल्याची सेंद्रिय शेती करणार्‍या शेतकर्‍यांचा अभिनव फार्मर क्लब त्यातून उभा राहिला. ज्ञानेश्वरभाऊ आताही मोडकंतोडकंच इंग्लिश बोलतात; पण त्यांच्या क्लबचा घसघशीत नफा त्यांच्यामागे उभा असतो. त्यांच्या शब्दाशब्दातून ओसंडणारा आत्मविश्वास त्यांची मुळे घट्ट असल्यातून येतो. लहानपणी टाय लावून इंग्लिश शिकायला ते गेले नव्हते. कुणी तरी आपल्याला पोसेल अशा आशेवर ते राहिले नाहीत. मातीत उभे राहिले. काळ्या आईला त्यांनी सांभाळलं, तिनं त्यांना भरभरून दिलं. अस्सल हीरो असा घडतो.


 

Web Title: go back to your roots, for the answers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.