घाटंजीची अंजली

By Admin | Updated: January 29, 2015 15:59 IST2015-01-29T15:59:50+5:302015-01-29T15:59:50+5:30

आदिवासी गावातल्या एका मुलीनं तयार केलेल्या यंत्राचं कौतुक खुद्द डॉ. कलाम करतात; त्या मुलीच्या प्रयोगाची गोष्ट.

Ghatanjee Anjali | घाटंजीची अंजली

घाटंजीची अंजली

>मुंबईत मागच्या महिन्यात पार पडलेली भारतीय विज्ञान परिषद. केवढे वाद आणि केवढय़ा चर्चा त्यानिमित्तानं घडल्या, आजही वाद-प्रतिवाद सुरूच आहेत. मात्र त्या वादांपलीकडची ही एक खरीखुरी आशदायी गोष्ट.
मुक्काम खापरी, तालुका घाटंजी, जिल्हा यवतमाळ. हा पत्ता आणि भारतीय विज्ञान परिषद यांचा काहीतरी परस्पर संबंध असू शकेल अशी कल्पना तरी करू का आपण?
पण तो संबंध आहे ! आदिवासीबहुल असलेल्या या खापरी गावात राहणार्‍या अंजली संजय गोडे नावाच्या मुलीशी या विज्ञान परिषदेचा थेट संबंध आहे. कारण दहावीत शिकणार्‍या अंजलीनं तयार केलेल्या ‘स्वयंचलित फवारणी यंत्रा’ची खास दखल राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. या प्रयोगाचा समावेश विज्ञान परिषदेत करण्यात आला. अंजली घाटंजी या तालुक्याच्या गावी माध्यमिक कन्या शाळेत शिकते. शेतकर्‍याची मुलगी. वडिलांना शेती करताना येणार्‍या अडचणी अंजली रोज पाहते. आपले वडील  पाठीवर १५ ते २0 किलोचं ओझं घेऊन पिकांवर कीटकनाशक फवारणी करतात हे तर तिनं नेहमीच पाहिलेलं. हे ओझं कमी करायचं तर काय करता येईल, असा प्रश्न अंजलीला पडला. तिनं बरंच डोकं खपवलं.  आणि  तिला घरात असलेली आईची शिलाई मशीन दिसली. त्यातून तिला आयडिया सापडली. हे असं चाक फिरवून आपण काही यंत्र तयार करू शकतो का, असा शोध तिनं घेतला आणि त्यातून चक्क एक स्वयंचलित फवारणी यंत्रच जन्माला आलं. 
अंजलीचे वडील संजय गोडे सांगतात, ‘अंजली असं काहीतरी यंत्र तयार करतेय हे ऐकलं की सुरुवातीला लोकं आम्हाला हसायचे. पण तिच्या शाळेतले शिक्षक अतुल ठाकरे तिला मार्गदर्शन करत होते. आपली मुलगी काहीतरी चांगलं करतेय यावर आमचा विश्‍वास होता. तिनं यंत्र तर तयार केलंच, पण आपली मुलगी महान शास्त्रज्ञ माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्यासह उभी राहते, याचा आनंद शब्दात सांगणंच अवघड आहे.!’
- विठ्ठल कांबळे, 
घाटंजी, जि. यवतमाळ  
 
 
‘‘ज्यांना भेटण्याचं स्वप्न होतं, ते  डॉ. कलाम, कैलास सत्यार्थी मला शाबासकी देतील, असं कधी स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. आपल्या डोक्यातली कल्पना आणि घरच्यांचं, शाळेचं मार्गदर्शन, त्यांचा माझ्यावरचा विश्‍वास यामुळे मी एक ‘यंत्र’ तयार करू शकले, मस्त वाटतंय!. ’’ 
-अंजली गोडे
 
 
पेटंटची संधी
देशभरातील बाल संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून नॅशनल इनोव्हेशन फाउण्डेशनद्वारा इग्नाईट हा उपक्रम राबवला जातो. बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या संशोधनासाठी माहिती पाठवावी लागते. संशोधन नवीन असल्याचे सिद्ध झाल्यास त्याचे पेटंटही मिळवून दिले जाते.
 
 ‘स्वयंचलित फवारणी यंत्र’
नेमकं कसं काम करतं?
हे स्वयंचलित फवारणी यंत्र सायकलवर चालतं. अवघ्या तीन ते चार हजार रुपयांत ते तयार झालं. ना कुठलं इंधन, ना वीज, तरी यंत्र चालू शकतं. एकच व्यक्ती सायकल चालवत सार्‍या शेतात फवारणी करू शकतो. त्यामुळे मनुष्यबळही वाचतं. होतं काय की, फवारणी रसायनाचा डबा लावला जातो. ज्याला नोझल्स असतात. फवारणीचे नोझल मागील बाजूस असल्याने विषारी द्रावण अंगावर पडण्याची भीती नसते.  सायकलच्या पायडलद्वारे दाब निर्माण करून या वेगवेगळ्या नोझलद्वारे उभ्या किंवा आडव्या पद्धतीने दोन ते १४ फुटापर्यंत फवारणी करता येऊ शकते.
 
 

Web Title: Ghatanjee Anjali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.