पर्यावरणाचा दोस्त; अमर देशपांडे
By अोंकार करंबेळकर | Updated: May 10, 2018 14:59 IST2018-05-10T14:59:20+5:302018-05-10T14:59:20+5:30
निसर्गाची आवड आणि त्यातलं करिअर यांची सांगड घालत अमर देशपांडे आपल्या अवतीभोवतीच्या जगात पर्यावरण पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय..

पर्यावरणाचा दोस्त; अमर देशपांडे
मुलुंडमध्ये मानवी वस्तीत बिबट्या घुसला, नाशिकमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, चंद्रपूरमध्ये दिवसाढवळ्या वाघाचे दर्शन अशा बातम्या टीव्हीवर ब्रेकिंग म्हणून झळकतात..
पाण्याच्या शोधात किंवा भक्ष्याच्या शोधात हे प्राणी चुकले आणि शहरात आले की, माणसं त्यांना घेरतात आणि आधीच संकटात असलेल्या प्राण्यांच्या अडचणीत वाढ होते. बिबट्या किंवा इतर एखादा प्राणी विहिरीत पडला, कोठे दिसला की कोणत्याही नियमांना जुमानता लोकांची गर्दी होते आणि वनखाते, पोलीस यांना त्यांची गर्दी आवरण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागते. बऱ्याचदा या झटापटीत तेथे अडकलेल्या प्राण्याचा जीवही जातो.
मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आसपासच्या प्रदेशात बिबट्या येणं हे फारसं नवं राहिलेलं नव्हतं. इथेही हेच व्हायचं. मात्र मुंबईकर्स फॉर एसजीएनपी नावाची मोहीम मात्र हे चित्र बदलण्यासाठी उभी ठाकली. काही स्वयंसेवक आणि पर्यावरणमित्र या चळवळीत सामील झाले यामध्ये मुंबईतील एक पर्यावरण अभ्यासक सामील झाला तो म्हणजे लक्ष्मीकांत (अमर) देशपांडे. मुंबईकर्स फॉर एसजीनपीच्या माध्यमातून वन खाते आणि पोलीस यांच्या समन्वयासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी अमर आणि त्याच्या मित्रांवर होती. एखाद्या भागात बिबट्या किंवा कोणताही प्राणी दिसला की स्थानिक रहिवासी घाबरून सर्वात आधी पोलिसांना फोन करतात. नागरिकांच्या सुरक्षेची आणि सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिसांवर असल्यामुळे त्यांनाही सर्व सूत्रे हातात घ्यावी लागतात. त्यामुळे मानव आणि प्राणी यांच्या संघर्षाच्या काळात काय केले पाहिजे, पोलीस कोणत्या अधिकारांचा वापर करू शकतात, त्यांच्या भूमिकेचा वनखात्याला कशी मदत होऊ शकते याबाबत पोलिसांना मदत करण्याची इच्छा आहे असे सांगताच पोलीस खात्यानेही त्यांना संमती दिली. त्यानंतर अमर आणि त्याच्या सहकाºयांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आसपासच्या भागातील सर्व पोलीस ठाणी शोधून काढली, त्यामधील सर्व कर्मचाºयांना अशी आणीबाणीची स्थिती कशी हाताळायची, वन खात्याशी समन्वय कसा ठेवायचा याची माहिती दिली. यामुळे पुढील अनेक घटनांच्या वेळेस परिस्थिती सुधारण्यात सर्वांनाच यश आले, अपघातही टाळता आले. अशा अनेक उपक्रमांमध्ये अमरने सहभाग घेतला आहे.
शहरांमध्ये राहात असले तरी लोक कुंडीत झाड लावून का होईना आपलं निसर्गप्रेम जपण्याची आवड जोपासत असतात. अमर याबाबतीत जरा जास्तच नशीबवान होता. मुंबईत राहूनही त्याला घराच्या आजूबाजूस मोठं आवार मोकळं मिळालं होतं. त्यामुळे तिथं झाडं लावायची, भाजी लावायची, कुत्र्याचे पिलू सापडले तर घरी आण, कधी खेकडा, पक्ष्याचं पिलू आण असले उद्योग त्याने सुरू केले. या सगळ्याला घरातून विरोध होताच पण अमरचा ओढा निसर्ग आणि पर्यावरणाकडे आहे हे लक्षात आलं. बारावी झाल्यावर त्यानं प्राणिशास्त्रात बी.एस्सी. केलं आणि नंतर पुणे विद्यापीठामध्ये पर्यावरणशास्त्रात एम.एस्सी. करण्यासाठी तो पुण्याला गेला. तो काळ आपल्याकडील विद्यापीठांमधील पर्यावरणशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू होण्याचा अगदी सुरुवातीचा काळ होता. त्यामुळे या विषयात पुढे कसे करिअर करता येईल याबाबत फारशी माहिती मुलांमध्ये नसे. एम.एस्सी.नंतर अमरने पर्यावरणाशी संबंधित इतर अभ्यासक्रम सुरूच ठेवले आणि एकेक संधी त्याच्यासाठी उपलब्ध होत गेली. पुण्यामध्ये असताना पुणे शहरातील पाणथळ जागा, लोकसंख्या, भूजल साठे, जैवविविधता, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा व्यवस्थापन याची व्यवस्थित माहिती गोळा करण्याच्या प्रकल्पावर काम केल्यामुळे त्याची पुढील कामांसाठी तयारी झाली होती. २००८ साली त्याची इंग्लंडमध्ये डार्विन स्कॉलरशिपसाठी निवड झाली. त्यानंतर त्याला सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन, स्वीडिश इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सी, युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट आॅफ अॅडव्हान्स्ड स्टडिज, कॉन्फेडरेसन आॅफ इंडियन इंडस्ट्रिज अशा विविध संस्थांनी आयोजित केलेल्या उपक्रमांमध्ये, प्रशिक्षणांमध्ये सहभागी होता आलं.
काही वर्षांपूर्वी भारतामध्ये वांग्याचे बीटी बियाणे यावे यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. पण त्याचा सरसकट वापर सुरू करण्याऐवजी लोकांकडून तसेच शेतकरी, ग्राहक संघटना, कायदेतज्ज्ञ, डॉक्टर्स, बियाणांच्या भारतीय कंपन्या व पर्यावरण अभ्यासगटांकडून माहिती मिळवावी यासाठी तत्कालीन केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी प्रयत्न केले. ही माहिती गोळा करण्यासाठी मदत करणाºया संस्थांमध्ये अमरच्या संस्थेचाही मोठा वाटा होता. या प्रयत्नांतून मिळालेल्या धक्कादायक माहितीमुळे जयराम रमेश यांनी आपले मत बदलून, प्रचंड आंतरराष्ट्रीय दबाव असूनही बीटी बियाणे वापरणे भारतात लागू न करण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांपूर्वी सर्व महाविद्यालयांमध्ये पर्यावरण शिकवणे अत्यावश्यक करण्यात आले. मात्र हा विषय शिकविण्यासाठी तज्ज्ञ किंवा त्याची पूर्ण माहिती असणारे शिक्षक महाविद्यालयांकडे नव्हते. बहुतांश शिक्षकांनी त्यांच्या शिक्षणाच्या काळामध्ये हा विषय अभ्यासला नव्हता. त्यामुळे पर्यावरण शिकविणाºया शिक्षकासांठी अभ्यासक्रमाची व प्रशिक्षणाची जबाबदारीही अमरने सांभाळली. राज्य सरकारच्या बारावीच्या पर्यावरण अभ्यासासाठी लेखन करण्याचीही संधी त्याला मिळाली. त्याने ग्रीन टीचर्स या पदविका अभ्यासक्रमाचा समन्वयक म्हणूनही काम केले आहे.
सध्या अमर मुंबईतील विक्रोळी येथे गोदरेजच्या वेटलॅण्ड मॅनेजमेंट अॅण्ड सस्टेनबिलिटी केंद्रामध्ये कार्यरत आहे. या परिसरामध्ये मुंबईतील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल आहे. या जंगलामध्ये कोल्हेही आढळून आले आहेत. येथे येणारे प्राणी, पक्षी, मासे या सर्वांची नोंद या केंद्रामध्ये ठेवली जाते. शाळां-महाविद्यालयांमधील मुलांना तेथे भेटीसाठी नेले जाते. तसेच शाळांमध्ये प्रदर्शन भरविण्यासाठी साहित्यही उपलब्ध करून दिले जाते. आता तर अमर आणि त्याच्या सहकाºयांच्या प्रयत्नांमधून मॅन्ग्रोव्हची माहिती देणारं अॅपही तयार करण्यात आलंय. जगातील ५० देशांतील लोकांनी त्यावरून माहिती मिळवायला सुरुवात केली आहे. पर्यावरण हा विषय तुम्हाला रोजगाराची संधी मिळवून कसा देतो तसेच आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याचा कसा प्रयत्न केला जाऊ शकतो याचं अमर उत्तम उदाहरण आहे.
onkark2@gmail.com