भावनांच्या लंगडय़ा कुबडय़ा
By Admin | Updated: February 26, 2015 21:02 IST2015-02-26T21:02:57+5:302015-02-26T21:02:57+5:30
इंग्रजीत बोललं, इंग्रजीतले ट्रेण्डी शब्द उच्चारले तरच आपल्या भावना पोचतात. बोलण्यात पंच येतो. त्यातही तरुण मुलांवर ज्यांचं गारुड ते सिनेकलाकार आणि मालिकावाल्यांचं.

भावनांच्या लंगडय़ा कुबडय़ा
कूल-सॉरी-चिल-थॅँक्स
आपण आपल्या भावना आपल्या भाषेतल्या चपखल शब्दात नाहीच का व्यक्त करू शकत?
आजकाल शाळा-कॉलेजमधील तरुणाईला वाटतं की, इंग्रजीत बोललं, इंग्रजीतले ट्रेण्डी शब्द उच्चारले तरच आपल्या भावना पोचतात. बोलण्यात पंच येतो. त्यातही तरुण मुलांवर ज्यांचं गारुड ते सिनेकलाकार आणि मालिकावाल्यांचं. तिथे तर मराठीचा अवमान पदोपदी केला जातो, आणि म्हणूनही पुढची पिढीसुद्धा त्यांचेच अनुकरण करीत वाट्टेल तसं बोलते. विविध मालिकांमधून होणारे संवाद, निवेदन, यांची भाषा टुकार दर्जाची. अत्यंत ओंगळवाणं मराठी बोलण्यात यांचा हात कोणी धरणार नाही. त्यावर मात करतात ते विविध कार्यक्रमांचे परीक्षक. जेव्हा तुम्हाला तिथे परीक्षक म्हणून बोलावलेले असते, तेव्हा तुमची जबाबदारी तसूभर अधिक असं मानायला हवं. पण कसे बोलतात हे लोक? की मुद्दामच करतात असं वाटतं? परीक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यावर वाटतं की, कौतुक करावं ते फक्त इंग्रजीमधून. मराठीत कौतुकास्पद शब्द नाहीत की काय?
व्वा! शाब्बास! छान! मस्त! सुंदर! अप्रतिम! झकास! चोकस! तोडीसतोड! जबरदस्त! सडेतोड! भिडला अभिनय! भारावून गेलो! प्रभावित झालो! शुभेच्छा तुला! वेडं करून सोडलं सगळ्यांना! उज्ज्वल भविष्य आहे तुझं! आणखीन सराव कर मग बघ कुठे जाशील ते! ही तर सुरुवात आहे, कधी अडचण आली तर सांग, आम्ही आहोत!
पण नाही. फक्त माइंड ब्लोईंग, सुपर्ब हेच शब्द पुन्हा पुन्हा ते वापरतात.
हे असं का होतं? दोन मराठी माणसे मराठीत का बोलत नाहीत? मी मराठी आहे हे काय वेगळं सांगावं लागतं, तेसुद्धा पुण्यासारख्या शहरात? मराठी रिक्षावालासुद्धा विचारतो, ‘‘आन्टी किधर जानेका है?’’
मराठी आहात मराठीच बोला. मराठी माणसालाच इतर भाषांमधून बोलायचं पुळका येतो. पण तेदेखील धड नसतं. भाषा ही प्रवाही असते, ती बदलणार हे खरं असलं तरी बदल हा नेहमी चांगला असावा, लंगडा नको. उतरती कळा आणणारा तर अजिबात नको. किती घसरगुंडी होऊ द्यायची आपल्या भाषेची?
उदाहरण म्हणून आता हे अंकल आणि आण्टी शब्द पाहूयात.
आण्टी म्हणजे एखादी स्त्री. वय वर्षे 25 ते 75. कोणीही तिला एकच संबोधनानं उल्लेखायचं. हाक मारायची.
पण बघा मराठीत त्याला किती सुंदर प्रतिशब्द आहेत.
‘‘ताई, आक्का, माई, दीदी, धाकली, मधली, थोरली, मावशी, मामी, आत्या, काकू, इन्ना, जाऊबाई, वन्स, नणंद, बाई, आजी, नानी, दादी, पणजी, ताईसाहेब, वाहिनी, सखे, मैत्रीण, अगं, कारभारीण, आईसाहेब, वहिनीसाहेब’’
हे तर अगदी रोजच्या वापरातले आहेत. तसेच पुरु षांना केवळ अंकल या नावाने बोलवायचे. त्याला पर्यायी मराठी शब्द दादा, बाबा, काका, मामा, तात्या, अप्पा, पाव्हनं, आहो, मालक, शेठ, साहेब, राव, पंत, मामंजी, गाववालं, टोपीवालं, मधल्या, थोरल्या, धाकल्या, पणजोबा, आहो वगैरे.
शिवाय ‘ए ताई, ए दादा’ आणि अहो ताई, अहो दादा’ यात केव्हढा मोठा फरक आहे. लगेच त्या ताई-दादाचे वय लक्षात येते. बोलणारा त्यांच्यापेक्षा वयाने, मानाने लहान आहे हे जाणवतं. दुस:याबद्दल आदरयुक्त भावनेने बोलताना अहो हा शब्द वापरायची पद्धत मराठीत आहे. आणखीन एक अतिशय प्रचलित शब्द आहे टेन्शन. काही होऊ देत, ‘टेन्शन आलं, टेन्शन घेऊ नकोस’ ही तर आजची सर्वत्र प्रचलित भाषा आहे. टेन्शनमध्ये मराठीतील किती वेगवेगळ्या भावनांच्या छटा आहेत ते बघा तरी !
काळजी, चिंता, ताण, तणाव, ताणतणाव, वेदना, त्रस, हुरहुर, औत्सुक्य, उत्सुकता, विरह व्यक्त करणारी मनाची हुरहुर आहे, दुरावा म्हणून वेदना आहे, कसे होईल म्हणून काळजी आहे. प्रत्येक भावना वेगळी असते, तिला व्यक्त करताना चपखल शब्द वापरला तर ती उत्तम त:हेने समोरच्याला भिडते.
तरुण मुलं नेहमी वापरतात ते काही शब्द आणि त्यांचे पर्याय आपण पाहू.
आणि मग तुमचं तुम्ही ठरवा की आपल्या भाषेत बोलायचं की नाही!
आणि बोललं तर किती समृद्धपणो आपण आपल्या भावना व्यक्त करू शकू.
एकदा मातृभाषेत बोलायला लागलं ना, की जे उमटतं ते पोटातून मनापासून येतं. प्रयत्न तर करून पहा.!
कूल आणि चिल?
कधी वादावादी झाली, कोणाचे काही बिनसले, तर काय म्हणायचं ‘बी कूल’, ‘चिल’; की लगेच चिडणारी, दुखावलेली व्यक्ती कूल कूल, गारीगार होते.
आलाय असा अनुभव एकाला तरी? जेव्हा कधी बिनसते, तेव्हा कोणाला तरी जखम झालेली असते, वाईट वाटलेले असते, अपमान, कमीपणा सहन केल्याने अस्वस्थता येते.
आणि त्याला समजावताना मुलं काय म्हणतात तर, ‘कूल किंवा चिल’. सहज विचार करा, तसं समजावण्यासाठी आपल्या मराठीमध्ये किती तरी शब्द, छोटी छोटी वाक्यं आहेत. मनातला ओलावा आपल्या बोलण्यात यावा असं वाटत असेल तर पर्यायी मराठी शब्द फक्त गंमत म्हणून एकदा मोठय़ानं उच्चारून बघा.
‘बास’, ‘पुरे झालं’, ‘पुढे नाही’, ‘थोडक्यात आवर’, ‘चालायचंच’, ‘सोडून दे’, ‘अरे जाऊ दे’, ‘सोड ना’, ‘होते रे असे’, ‘नको मनाला लावून घेऊस’, ‘किती त्रस करून घेणार’, ‘मला रडायला येईल आता’, ‘मी बघेन तुझं सारं’, ‘मग तर झालं’, ‘चल टपरीवर’, ‘चहा घेणार’, ‘समजत नाही रे’, ‘सगळीकडे असेच असते’, ‘तू मनाला लावून घेऊ नकोस’, ‘ती वेडी आहेत’, ‘कोणाचं किती लावून घ्यायचं’, ‘असंच असतं रे बाबा’.
****
सॉरी
सॉरी हा एक शब्द उच्चारला की सर्व गुन्हे माफ. त्या गुन्ह्याची, वागण्याची त:हा, गंभीरपणा, नुकसान, यातना, परिणाम काहीही कितीही भयंकर असले तरी फक्त ‘सॉरी’ म्हटले की त्यावर पाणी सोडायचे. जणू चुका करणा:याची सगळी पापे धुतली गेली. जितका सहजतेने श्वास घेतला जातो, तितक्या किंबहुना त्याहीपेक्षा ‘सॉरी’ म्हणून चुकेची कबुली दिली जाते. त्यात अपराधभाव असतोच असं नाही. अतिशय निर्थकपणो वापरत असलेला शब्द. गुळगुळीत, उच्चारून बोलून दुर्लक्षित होणारा शब्द. त्याला ना बोच राहिली, ना बोलणा:याला काही पाचपोच. खुलासा शून्य, बोचणी वरवर अधांतरी.
पण समजा या सॉरीऐवजी एखादी चूक झाल्यावर ‘मी चुकले’, ‘नको होतं मी असे करायला’, ‘असा कसा मी वागलो’, ‘माफ कर’, ‘फार मोठा गुन्हा झाला माङया हातून’ असे जरा स्पष्ट बोलता आले तर? पण असं काही बोलायचं तर त्यात मन ओतावं लागतं. खरंच चुकेबद्दल मनाला चुटपूट असेल, तर जितक्या मनापासून चुकीची कबुली दिली जाईल, तितकी ती दुस:याला स्पर्शून जाईल, हेलावून सोडेल. ‘झाले असेल चुकून असे काहीतरी’, ‘जाऊ दे’, ‘पुन्हा असे करू नकोस’, ‘मला खूप त्रस झाला’ अशा शब्दांमध्ये माफी पण दिली जाते.
पण नवं गणित फक्त सॉरी आणि ओके या दोन शब्दांपुरतं. त्यात भावना असतातच असं कसं म्हणता येईल? सॉरी, थॅँक्स, प्लीज हे शब्द घासून गुळगुळीत झालेले आहेत, आणि ते तसेच सरधोपट वापरत सुटलो तर त्यातून आपल्याला अभिप्रेत अर्थबोध कसा होईल?