रट्टा मारुन, प्रोजेक्ट विकत आणून पास होणारे इंजिनिअर काय कामाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 07:25 AM2019-09-19T07:25:00+5:302019-09-19T07:25:02+5:30

सुमार दर्जाच्या प्रकाशनाची पुस्तकं परीक्षेच्या आधी तीन दिवस वाचून कसंबसं उत्तीर्ण होणारे भावी अभियंते. काहीजण तर प्रोजेक्टच विकत आणतात. पहाटे 9 ला उठतात, रात्री 1 ला जेवतात. बाकीचे तास मोबाइलवर असतात. त्यांच्याकडून देशात सव्वाशे र्वष टिकतील, पेटंट आणतील, अशा प्रयत्नांची अपेक्षा कोण करील?

engineer but not able? whats the wrong with engineers? | रट्टा मारुन, प्रोजेक्ट विकत आणून पास होणारे इंजिनिअर काय कामाचे?

रट्टा मारुन, प्रोजेक्ट विकत आणून पास होणारे इंजिनिअर काय कामाचे?

googlenewsNext
ठळक मुद्देविश्वेश्वरय्यांच्या गुणांची कास नवीन अभियंत्यांनी धरली तरच देशात चांगले इंजिनिअर्स तयार होतील. नाही तर आला दिवस, झालं सेलिब्रेशन. संपलं, असं होऊ नये!

डॉ. सुनील कुटे

भारतभर अभियंता दिन नुकताच साजरा झाला. भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा हा जन्मदिन. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सर्व अभियंत्यांना प्रेरणा मिळावी व सर विश्वेश्वरय्या यांच्या आदर्शातून आजच्या अभियंत्यांनी वाटचाल करावी या हेतूने हा दिवस साजरा केला जातो.
नुसता दिन साजरा झाला, कवित्व सरलं असं होऊ नये म्हणून जरा शांतपणे काही गोष्टींचा विचार करायला हवा.
सर विश्वेश्वरय्या यांच्या जीवनापासून आजच्या युवा अभियंत्यांना अनेक गोष्टी शिकता येण्यासारख्या आहेत. विशेषतर्‍ बारावीला शिकवणी वर्गात लाखो रुपये मोजून पुढे आपले जीवितकार्य पूर्ण करण्यासाठी अभियांत्रिकी होऊन आपल्या जीवनाची वाटचाल सुरू करू इच्छिणार्‍या युवा अभियंत्यांसाठी! विश्वेश्वरय्यांचे जीवन हा मोठा दीपस्तंभ आहे. या दीपस्तंभाकडे दुर्लक्ष केल्यास या अभियंत्यांची नौका भरकटू शकते.

1.लाइफ स्टाइल कशी?


विश्वेश्वरय्या 101 वर्षे निरोगी आयुष्य जगले. याचे रहस्य म्हणजे त्यांची कार्यक्षमता व नियमितता. त्यांची जेवण्याची, व्यायामाची, झोपण्याची व कामाची वेळ ठरलेली होती. ती त्यांनी शेवटर्पयत पाळली. त्यांचा आहारदेखील संतुलित होता. आजचे अभियंते दिवसभर फास्ट फूड खाण्यात धन्यता मानतात. जेवणाच्या वेळा नियमित नाहीत. रात्री 1 वाजता डीनर घेणारे अनेक अभियंते आहेत. दुपारी 4-5 वाजता लंच घेणारेही अनेक आहेत. त्याशिवाय दिवसभर सतत काही ना काही खाणं सुरू असतं. यामुळे अनेकांची वजनं वाढली आहेत. अनेकांना ऐन तारुण्यात रक्तदाब, मधुमेह व हृदयविकार जडले आहेत. कामाच्या वेळा व उद्दिष्ट पूर्ण करण्याचा ताण यामुळे वेळा पाहता येत नाहीत असं तोकडं समर्थन ते करतात. एखादवेळी हे खरंही असू शकेल; पण ती जर जीवनशैली होणार असेल तर आयुष्यासाठी ते घातक आहे.
आपण युनायटेड नेशन्समध्ये जागतिक पातळीवर योगदिन मंजूर करून घेतला, पण तरुणाई व्यायाम व योगापासून कोसो दूर आहे. दिवसातील 10-10 तास मोबाइलवर व्यस्त असणार्‍या अभियंत्यांना 10 मिनिटेही व्यायामासाठी वेळ नाही ही शोकांतिका आहे. छातीत कळ आल्याशिवाय कळत नाही हे वास्तव असलं तरी त्यासाठी आयुष्य पणाला लावायचं का? हा विचार अभियंत्यांनी करण्याची गरज आहे.
आजच्या तरुण अभियंत्यांचा शिक्षण घेत असतानाचा आळस व त्यांना आलेलं जडत्व हा चिंतेता विषय आहे. काहींना पालकांनी इतकं भरभरून दिलं आहे की त्यांना आयुष्यात मिळविण्याजोगं काही राहिलंच नाही. अनेकांना महाविद्यालयात 10 वाजता पोहोचण्यासाठी, सकाळी 9 वाजता झोपेतून उठविण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक करावी लागते. त्यांनी विश्वेश्वरय्यांची नियमितता अंगी बाळगण्याची कधी नाही एवढी गरज त्यामुळेच आज निर्माण झाली आहे.

2. कार्यमग्न आहात?


कार्यमग्नता हा विश्वेश्वरय्यांचा गुण वाखाणण्याजोगा होता. ते सतत कार्यमग्न असत. वयाच्या 94व्या वर्षी भारतरत्न पुरस्कार मिळाला तेव्हाही ते साइटवर जात असत. आज जपानमध्ये लाखो लोकांचे वय 100 वर्षाहून अधिक आहे. याचे रहस्य ज्या शब्दात दडले आहे तो म्हणजे ‘इकिगाई’. ईकिगाई म्हणजे सतत कार्यमग्न असण्यातून मिळणारा आनंद. आजच्या तरुण अभियंत्यांचा आळस, जडत्व व त्यांना आलेली स्थिरता पाहता ते शंभर तर सोडाच चाळिशीलाच बाद होत आहेत. याचं दुसरं कारण त्यांच्या ‘स्क्रीनटाइम’मध्ये अडकण्यातही दडलं आहे. अनेक तरुण अभियंते जडत्वामुळे बी. ई. उत्तीर्ण होऊनही घरीच राहतात. वय वर्षे तीस काम नाही, नोकरी नाही, लग्न नाही. याचं कारण काम करण्याचा स्टॅमिना नाही. तास-दोन तासात थकवा येणं, निरुत्साही असणं, काहीच न करण्याच्या अवस्थेत वर्षोनुवर्षे घालविणे ही अवस्था पाहिली की विश्वेश्वरय्यांची कार्यक्षमता 101 वयातही उठून दिसते.


3. नावीन्याची आस?


अभियांत्रिकी शिक्षणात नावीन्यता व सृजनशीलतेला खूप महत्त्व असते. सतत नवीन नवीन संकल्पना, नवे संशोधन, नवे प्रकल्प ही या शिक्षणातील अविभाज्य बाब आहे. विश्वेश्वरय्यांनी ह्या नावीन्यतेची कास धरली. धरणांवर बसविणारे स्वयंचलित दरवाजे त्यांनी केवळ नावीन्यपूर्ण डिझाइनने बनवून धरणांवर बसविलेच नाही, तर त्याचे बौद्धिक स्वामित्व हक्क (पेटंट)सुद्धा घेतले. आजचे हजारो तरुण अभियंते त्यांचे अंतिम वर्षाचे प्रकल्प पैसे देऊन विकत घेताना बघितले की नावीन्यतेचा विषय हद्दपारच होतो.
खरं तर प्रत्येक अभियांत्रिकी महाविद्यालये ही समाजातील शेकडो प्रश्न सोडविणारी, नावीन्यपूर्ण उत्तरे देणारी केंद्रे बनली पाहिजेत. पण, काही मोजकी व गुणवत्ता जोपासणारी महाविद्यालये सोडली तर अनेक ठिकाणी तरुण अभियंते पैसे देऊन प्रकल्प विकत घेतात. त्यामुळे देशपातळीवरही संशोधन, त्याचा दर्जा व त्यातून निर्माण होणारे पेटंट यावर मर्यादा आल्या आहेत. शंभर वर्षापूर्वी पेटंट घेणार्‍या विश्वेश्वरय्यांचे संशोधन त्यामुळे उठून दिसते. खरं तर काही तरुण विद्याथ्र्यानी आपल्या अभियांत्रिकी ज्ञानाने छोटे उपग्रह बनविणे, समाजोपयोगी मोबाइल अ‍ॅप्स बनविणे, आपल्या प्रकल्पांच्या संशोधनाचे पेटंट घेणे ही कामे अतिशय नावीन्यपूर्णपणे यशस्वीरीत्या केली आहेत; पण त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. कॉपी करणे, बाजारातून प्रकल्प विकत घेणे इ. प्रमाण तुलनेने इतके मोठे आहे की परिस्थिती चिंताजनक आहे. खूप कमी अभियांत्रिकी महाविद्यालये अशा ‘इनोव्हेशन हब’ व त्यांच्या निर्मितीसाठी धडपडताना व दर्जा वाढविताना दिसतात. अनेक महाविद्यालयांत अशी संस्कृती निर्माणच न होता ‘अभियंता दिन’ मात्र धूमधडाक्यात साजरे होतात.


4. मल्टिडिसिप्लिनरी आहात?


विश्वेश्वरय्यांनी जरी स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली, तरी ‘मल्टिडिसिप्लिनरी ज्ञान’ ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली. त्यांनी पोलाद, साबण इ. चे कारखाने काढले. बँकांची निर्मिती केली. सिंचनाचे प्रश्न सोडविले. वाहतूक क्षेत्रात क्रांती केली. रेल्वेचे प्रकल्प उभारलेत. आजच्या युवा अभियंत्यांनाही इथून पुढे अशा आंतरशाखीय ज्ञानाची गरज भासणार आहे. उजव्या डोळ्याचा तज्ज्ञ व डाव्या डोळ्याचा तज्ज्ञ ही ‘सुपर स्पेशालिटी’ संकल्पना वैद्यकीय क्षेत्रात एकवेळ निभावून जाईल, पण अभियांत्रिकी क्षेत्रात मात्र विविध शाखांमध्ये एकाचवेळी प्रावीण्य मिळविण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे. सुमार दर्जाच्या प्रकाशनाची पुस्तकं परीक्षेच्या आधी तीन दिवस वाचून कसंबसं उत्तीर्ण होणारे भावी अभियंते काळाच्या ओघात आंतरशाखीय तर सोडाच, पण आपल्याही शाखेत उभे राहू शकणार नाहीत. आजच अशा प्रकारच्या पुस्तकांतून उत्तीर्ण झालेले ‘मार्क्‍सवादी’ अभियंते या देशाच्या बेरोजगारीची फौज वाढवित आहेत.


5. कामावर निष्ठा आहे?


कामावरील निष्ठा, प्रामाणिकपणा व शिस्त हे विश्वेश्वरय्या यांचे उल्लेखनीय गुण होते. संपूर्ण आयुष्यात त्यांनी कधीही भ्रष्टाचार केला नाही. म्हैसूरचे दिवाणपद त्यांना बहाल करण्यात आले तेव्हा त्यांनी प्रथम सर्व नातेवाईक व मित्र यांना घरी बोलाविले व माझ्याकडे तुम्ही कुणीही बेकायदेशीर व नियमबाह्य कामे घेऊन येणार नाही असा शब्द देत असाल तरच मी हे पद स्वीकारीन असा आपला निर्णय सांगितला. हा शब्द घेऊनच त्यांनी दिवाणपद स्वीकारले. सध्या अधूनमधून लाचलुचपत खात्याच्या पडणार्‍या धाडी, त्यात पकडलेले अभियंते व त्यांच्या घरातील नोटा मोजायला दोन दोन दिवस सुरू असलेली नोटा मोजणारी यंत्रे आणि त्याशिवाय असलेली बेनामी संपत्ती पाहिली म्हणजे हल्लीच्या चिखलात विश्वेश्वरय्यांचे कमळ अजूनच खुलून दिसते.
विश्वेश्वरय्यांनी निर्माण केलेले प्रकल्प आज शंभर ते सव्वाशे वर्षानंतरही कुठल्याही देखभाल दुरुस्तीशिवाय पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. कामाच्या दर्जाबद्दल त्यांनी कधीही तडजोड केली नाही. आज या अभियंत्यांचा अभ्यासच दुय्यम दर्जाच्या पुस्तकातून होतो. अनेक दुय्यम दर्जाच्या महाविद्यालयांतून, दुय्यम दर्जाच्या प्राध्यापकांकडूनच शिकलेले हे अभियंते त्याच दर्जाची कामे करतात. कॉपी करून उत्तीर्ण झालेले अभियंते देशात सव्वाशे र्वष टिकतील असे प्रकल्प कसे उभारतील? त्यामुळेच दर्जाहीन कामे होतात.
अभियंता दिन साजरा करीत असताना नियमितता, कार्यमग्नता, नावीन्यता, सृजनशीलता, आंतरशाखीय ज्ञानोपासना, कामावरील निष्ठा, प्रामाणिकपणा, शिस्त व दर्जा टिकविण्याची धडपड या विश्वेश्वरय्यांच्या गुणांची कास नवीन अभियंत्यांनी धरली तरच देशात चांगले इंजिनिअर्स तयार होतील. नाही तर आला दिवस, झालं सेलिब्रेशन. संपलं, असं होऊ नये!


(अधिष्ठाता, क. का. वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्था)

Web Title: engineer but not able? whats the wrong with engineers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.