सोशल मीडियातली इमोशनल गुंतवणूक महागात पडतेय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 12:10 PM2020-05-14T12:10:54+5:302020-05-14T13:15:49+5:30

सध्या यू-टय़ूबर्स आणि टिकटॉकर्स यांच्यात जोरदार व्हर्चुअल वॉर सुरू आहे. कोण सर्वश्रेष्ठ हे दाखवण्याची चढाओढ सुरू आहे. त्यांना पाठिंबा देणाऱ्या यूजर्समध्येही भांडणं लागली आहेत. दुसरीकडे फेसबुकवर कुठल्याही पोस्टने भावना दुखावून घेत भयानक भांडणं करणारे, कुणाच्या प्रेमात पडणारे, भला, उसकी लाइक्स मेरी लाइक्स से जादा कैसी म्हणून हळहळत ‘जेलस’ होणारे हे सगळे कोण आहेत? आणि ते इमोशनली इतके का गुंतत चाललेत या माध्यमांत, हे माध्यम आभासी आहे, हे माहिती असूनही !

Emotional Investment in Social Media, is it good for you, check before you comment. | सोशल मीडियातली इमोशनल गुंतवणूक महागात पडतेय ?

सोशल मीडियातली इमोशनल गुंतवणूक महागात पडतेय ?

Next
ठळक मुद्देआपण मनाने समाजमाध्यमात इतके अडकत आणि गुंतत चाललो आहोत की आपल्या भावनांचा त्यातून पुरता चुरा होतोय !

- मुक्ता चैतन्य

जगभर माणसं सोशल मीडियावर दिवसातला किती वेळ घालवतात?
दोन तास चोवीस मिनिटं. 
एका सेकंदाला 83,984 यू-टय़ूब व्हिडीओज बघितले जातात. सर्वसाधारणपणो 40 मिनिटं वेळ प्रत्येक व्यक्ती यू-टय़ूबसाठी देतो. 
मी हा लेख लिहायला सकाळी घेतलाय तोवर पन्नास हजार साइट्स हॅक झालेल्या आहेत. दिवसभराचा आकडा न काढलेलाच बरा. 
दर सेकंदाला 4637 स्काइप कॉल्स होतात. 
लेख लिहिताना 36, 02, 14, 744 एवढे ऍक्टिव्ह  ट्विटर यूजर्स होते. 
दर सेकंदाला हजारच्या आसपास फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड होतात. 
फेसबुकचे लेख लिहिताना लाइव्ह यूजर्सची आकडेवारी घेतली ती 249,68,46,161 एवढी होती. 
आणि व्हॉट्सअॅपवर 70 कोटी ऍक्टिव्ह  यूजर्स 4300 कोटी मेसेजेस रोज एकमेकांना पाठवत असतात. 
वर दिलेली सगळी आकडेवारी लाइव्ह आहे. म्हणजे मी लेख लिहीत असताना त्या वेळेला प्रत्यक्ष असणारी. ही आकडेवारी क्षणाक्षणाला बदलते. प्रत्येकी मिलिसेकंदाला बदलते. 
ही सगळी आकडेवारी इतक्या तपशिलाने देण्याचं कारण आपण किती वेळ ऑनलाइन असतो याचा एक अंदाज यावा.
हे झालं वेळेचं गणित.
आता आपण तिथे जाऊन काय करतो ते बघूया ! आपला वेळ नेमका कशात जातो?
यू-टय़ूबवर आपण अगणित व्हिडीओज बघतो त्यातले किती व्हिडीओ खरोखर आपल्याला वेगळी माहिती देतात? जे असंख्य खानपानाचे व्हिडीओ आपण बघतो त्यातले किती पदार्थ आपण करून बघतो? ट्विटर आणि फेसबुकवर रंगणाऱ्या  चर्चाचं पुढे आपण काय करतो? एखाद्या वादात समजा ट्रोलिंग झालं तर आपण काय करतो? वाद नसतानाही ट्रोल्सनी भिंतीवर येऊन धिंगाणा घातला तर आपण काय करतो? पॉर्न आणि गेमिंगने आपल्या मनावरचा ताण खरंच जातो का? असंख्य प्रश्न आहेत. कारण आपण किती वेळ ऑनलाइन असतो याचा हिशेब आपण मांडतो; पण तो मांडत असताना आपण किती प्रमाणात या आभासी जगात मानसिक गुंतवणूक करत असतो याचा हिशेब मात्न आपण ठेवत नाही. 
ट्रोलिंग झाल्यावर आपल्या मनाला त्नास होत नाही का? चिडचिड होत नाही का? कटकट होत नाही का? एखाद्या पोस्टला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर आपल्या मनात काहीच हलत नाही का? आपण अगदी स्थितप्रज्ञासारखे आपल्या पोस्टकडे बघत असतो का? यू-टय़ूबवर बघितलेल्या एखाद्या व्हिडीओमधल्या डिस्टर्बिग दृश्यांनी आपल्या आत काहीच हलत नाही?  फेसबुक मेसेंजरवर तयार झालेलं एखादं आभासी जगातलं इंटिमेट नातं आपण सहज दुर्लक्षित करू शकतो का?
ऑनलाइन जगतात वावरताना आपण जसे आपले फुटप्रिण्ट्स तयार करत असतो तसंच आपल्या कळत नकळत आपण आपली प्रचंड मानिसक आणि भावनिक ऊर्जाही खर्च करत असतो. आपण गुंततो. भुलतो. या ऑनलाइन जगाला खिळून राहतो. हातातल्या स्मार्टफोनमधला डाटा स्वस्त झाला असला तरी या जगात वावर फुकट नाही. अशी नाही तर तशी आपण किंमत मोजत असतो. काहीवेळा ती आपल्याला भावनिक गुंतवणुकीच्या स्वरूपातही मोजावीच लागते.
**
आता एक जनरल प्रसंग बघूया ! 
आपल्यापैकी अनेकजण सकाळी उठल्या उठल्या काय करतात? तर फोन हातात घेऊन व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि ट्विटरवर जातात. त्यानंतर त्यांचा बाकी दिवस सुरू होतो. 
किंवा (सध्या लॉकडाऊनमुळे आपण घरी आहोत; पण त्यापूर्वी) आपण ऑफिसमधून किंवा कॉलेजातून  संध्याकाळी थकून भागून घरी आलो की काय करता?
तर पायातले काढून सोफ्यावर लोळून परत हातातला मोबाइल काढून त्यात काहीतरी बघायला लागतो. आपण जी काही फीड्स बघत असतो ती प्रचंड महत्त्वाची असतात का? घरी आल्यावर जरा हातपाय धुवून, फ्रेश होऊन इतर गोष्टी करण्यापेक्षाही अधिक गरजेची आणि महत्त्वाची असतात का? 
किंवा आपण हॉटेलमध्ये कुटुंबासोबत, मित्नमैत्रिणींच्या बरोबर जेवायला जातो. अशा आउटिंगचा उद्देशच एकमेकांशी गप्पा मारत रिलॅक्स होणं हा असतो; पण आपण काय करतो? आपण आपल्या मोबाइलमध्ये डोकं घालून बसलेलो असतो. फेसबुकवर काहीतरी बघत असतो. कुठल्यातरी वादात हिरिरीने मत मांडत असतो, उगाच व्हॉट्सअॅप चेक करत असतो नाहीतर मोबाइल गेम्स खेळत असतो. रिलॅक्सेशन आणि गप्पांसाठी असलेल्या वेळात आपण जे काही ऑनलाइन करत असतो ते खरंच तितकं तातडीचं आणि गरजेचं असतं का?
पण तरीही आपण हे सगळं काहीवेळा कळत तर अनेकदा नळकत करत राहतो. या जगाला आपण आभासी म्हणतो, म्हणजेच ते खरं नाहीये असं मानतो; पण आपली भावनिक गुंतवणूक तर खरीखुरीच असते. त्यातून निर्माण होणा:या सुखदु:खाची किंमतही आपण खरीखुरीचं मोजत असतो. तिथे लिहिलेल्या एखाद्या पोस्टमुळे आपल्या भावना दुखावल्या जातात, आपल्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला ठेच पोहोचते. कधीतरी वाचून आपल्याला खूप आनंद होतो. आपल्याला खूप भारी वाटतं. या सगळ्याच  भावना अगदी ख:याच असतात. सध्या यू-टय़ूबर्स आणि  टिकटॉकर्स यांच्यात जोरदार व्हर्चुअल वॉर सुरू आहे. कोण सर्वश्रेष्ठ हे दाखवण्याची चढाओढ सुरू आहे. त्यांना पाठिंबा देणा:या यूजर्समध्येही भांडणं लागली आहेत. आता सांगा, हे सगळं आपली काहीच इमोशनल इन्व्हेस्टमेंट  या माध्यमांत होत नसतील तर घडलं असतं का?
मान्य करा किंवा करू नका, आपल्या डोक्यात एका बाजूला सतत ऑनलाइन जगाचा विचार सुरू असतो.  मग तो फेसबुकवरच्या पोस्टचा असेल नाहीतर यू-टय़ूबवर किंवा टिकटॉकवर बघितलेल्या व्हिडीओचा. व्हॉट्सअॅप तर काय आपल्या मन-मेंदूचा जवळपास भाग बनलंय.
म्हणूनच आता गरज आपली व्हर्चुअल इमोशनल गुंतवणूक सीमित करण्याची. मानसिक पातळीवर विलग होण्याची. एक मोठा श्वास घेऊन आपल्या व्हर्चुअल रिअॅलिटीचा विचार करण्याची. गरज आहे स्वत:ला अनप्लग्ड करण्याची गरज आहे. 

...म्हणजे इमोशनल डिपेण्डन्स वाढतो आहे का आपला समाजमाध्यमांवरचा?


1. जिथे आपल्या जवळच्या माणसांमध्येही आपण मनाने अनेकदा इतके गुंतत नाही जितके आपण ऑनलाइन जगातल्या वेगवेगळ्या  स्पेसेस मध्ये गुंतलेले असतो. आपण सध्या सतत सोशल डिस्टन्सिंगबद्दल बोलत असतो; पण या सगळ्यात आपण व्हर्चुअल सायकॉलॉजिकल डिस्टन्सिंगचा विचार केलेला आहे का?
2. मुळात आताच्या कठीण काळात असो की नॉर्मल आयुष्यात सायकॉलॉजिकल डिस्टन्सिंगचा विचारच आपण केलेला नाहीये. आपण व्यक्तींवर, वस्तूंवर, घटनांवर आणि आता ऑनलाइन जगतावर निरनिराळ्या कारणांसाठी इतके अवलंबून असतो की, या सगळ्यात स्वत:ला हरवून बसतो. व्हर्चुअल जगात वावरताना मला नेमकं काय हवंय, माङयार्पयत जे पोहोचतंय ते मला हवंय का, त्याचा विचार करत मी माङया मेंदूची आणि भावनांची शक्ती खर्च करायची आहे का, माङया पुढय़ात जे मनोरंजन आणून टाकलं जातंय त्यानं माझं मनोरंजन होतंय का? ज्या वादांमध्ये मी सहभागी होतोय ते वाद मुळात गरजेचे आहेत का की ती निव्वळ माङया इगोची तात्पुरती गरज आहे या कशाचाही विचार बरेचदा आपण करत नाही. प्रचंड गोष्टी मन-मेंदूत साठवत राहतो ज्याची आपल्याला खरं तर अजिबातच गरज नसते. दिवसरात्न सतत काहीतरी बघत राहणं, माहिती गोळा करत राहणं, मनोरंजन करून घेत राहणं ही आपली इतकी मोठी गरज आहे का हाही प्रश्न आपण स्वत:ला विचारण्याची गरज आहे. 

3. मोबाइल आणि व्हर्चुअल डिपेण्डन्सी ही सुरु वात असते एका व्यसनाची आणि एका कधीही कधीही न संपणाऱ्या भुकेची. किकची. सतत ऑनलाइन आणि व्हर्चुअली कनेक्टड राहण्याची प्रचंड गरज एखाद्या डिजिटल ड्रगसारखी असते. जितकं जास्त वापरू तितकी गरज वाढत जाते. वाढतच राहते. 


4. सध्या जगाला सोशल डिस्टन्सिंगबरोबर सायकॉलॉजिकल डिस्टन्सिंगची गरज आहे. गुंतवणूक तितकीच असावी ज्याचे रिटर्न्‍स चांगले मिळतील. भावनांचंही तसंच आहे. डिजिटल स्पेसमध्ये आपण कुठे आणि कशासाठी भावनांची गुंतवणूक करतोय हे नक्की माहीत असायला हवं. लाईक आणि लव्हच्या मोहात भरकटून जाणायचे दिवस कधीच संपले आहेत. सायबर स्पेस फक्त आपले फुटप्रिण्ट्स जपत नाही तर आपल्या भावनांना आकार देण्याचं, त्यांना एका विशिष्ट पद्धतीने विकसित करण्याचंही काम करतेय. जे जे आपल्याला त्या वेळी गरजेचं आणि अत्यावश्यक वाटतं ते तसं आपल्याला दाखवलं जातं म्हणून आपल्याला ते आवश्यक वाटतं. प्रत्यक्षात ती आपली गरज असतेच असं नाही.


(लेखिका मुक्त पत्रकार, सोशल मीडिया अभ्यासक आहेत.) 
 

Web Title: Emotional Investment in Social Media, is it good for you, check before you comment.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.