आठ वर्षे जुनी एक स्वयम गोष्ट

By Admin | Updated: June 30, 2016 16:43 IST2016-06-30T16:43:16+5:302016-06-30T16:43:16+5:30

फ्लॅशबॅकमध्ये जाऊन पाहिलं, तर आठ वर्षांपूर्वी डोक्यात चमकलेली एक कल्पना, एक जिद्द दिसते. ती इतकी पराकोटीची होती की अनेक नव्याजुन्या हातांनी एक होत त्या कल्पनेला एक वास्तवातली गगनभरारी मिळवून दिली..

The eight-year old self-story | आठ वर्षे जुनी एक स्वयम गोष्ट

आठ वर्षे जुनी एक स्वयम गोष्ट

- राजानंद मोरे


स्वयम. पण हा फक्त उपग्रह नाही तर टीम स्पिरीटचं एक खणखणीत नाणंच. सलग आठ वर्षे एकूण १७६ जणांच्या हातांनी घडविलेला अवकाशातील एक मानवनिर्मित ‘तारा’... 
हा उपग्रह आपण बनवावा हे या तरुण मुलांना कसं सुचलं असेल?
त्या सुचण्याची गोष्टही कमाल आहे.
पुण्यातील कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अर्थात ‘सीओईपी’मध्ये खगोलशास्त्राचं शिक्षण दिलं जात नाही. कॉलेज इंजिनिअरिंगचं, त्यामुळं तिथं शिकणाऱ्या मुलांना खगोल-भूगोल आवडण्याचं किंवा त्या विषयात डायरेक्ट काम करण्याची इच्छा होण्याचं काही कारण नाही. 
पण तरीही इथल्या मुलांनी उपग्रह बनवला तो कसा?
जगभरातील शास्त्रज्ञ अनेकदा उपग्रह बनविण्यासाठी, त्यातील नवनवीन तंत्र विकसित करण्यासाठी वर्षानुवर्षे झगडतात तेव्हा कुठे त्यांना यश मिळतं.. पण सीओईपीच्या या पोरांनी शून्यातून सुरुवात करीत अवकाशात भरारी घेण्याची किमया साधली. कुठून मिळाली असेल त्यांना ही ऊर्जा, टीम स्पिरीट, टीमवर्कचा डोस? एवढा सोपा होता का हा प्रवास?... 
‘आॅक्सिजन’नं ठरवलं, जरा फ्लॅशबॅकमध्येच जायचं, ज्यांच्या डोक्यात ही आयडिया पहिल्यांदा आली त्यांनाच गाठायचं आणि विचारायचं की कसं सुरू झालं हे काम?
त्यासाठी सातआठ वर्षे काळाच्या मागे जावं लागलं.
अभिषेक बाविस्कर.
हा या प्रवासातला मुख्य सूत्रधार. त्याचं झालं असं की, तो २००८ मध्ये आयआयटी मुंबईत इंटर्नशिप करत होता. यावेळी तिथं शिकत असलेले काही विद्यार्थी उपग्रह बनवण्याच्या प्रयत्नात होते. त्यांचं कामही सुरू झालं होतं. या उपग्रहाचं ग्राउंड स्टेशन ‘सीओईपी’मध्ये बनवता येईल का, असं त्या मुलांनी अभिषेकला विचारलं. पण खगोलशास्त्राची कसलीच माहिती नसल्यानं त्यावेळी त्यानं त्यात फारसं स्वारस्य दाखवलं नाही. 
पण हे एक आव्हान म्हणून स्वीकारायला काय हरकत आहे, असा विचारही त्यावेळी मनात चमकून गेला. एकीकडे ही चांगली संधी असताना अभिषेकच्या मनात वेगळाच विचार घोंगावू लागला. आपण जर एखाद्या उपग्रहाचं ग्राउंड स्टेशन बनवू शकतो तर उपग्रह का नाही? म्हणजे आपण उपग्रहच का बनवू नये, हा एक चमकता विचार त्याच्या मनात उजळून गेला.
आणि त्याच्या या कल्पनेतच ‘स्वयम’ची मुहूर्तमेढ रोवली गेली.
खरंतर खगोलशास्त्राची आवड असलेल्या चार-पाच विद्यार्थ्यांनी मग एकत्र येत २००६ मध्येच ‘सीओईपी’मध्ये ‘अ‍ॅस्ट्रोनॉमी क्लब’ची सुरुवात केली होती. खगोलविषयक विविध उपक्रमांचं आयोजन या क्लबमार्फत केलं जायचं. त्यामुळे टप्प्याटप्प्याने विद्यार्थी या क्लबशी जोडले गेले. अभिषेकही या क्लबचा सदस्य होता. उपग्रह बनविण्याची कल्पना त्यानं या क्लबमधील आपल्या सहकाऱ्यांना सांगितली. 
आतापर्यंत आकाश निरीक्षण, व्याख्यानांसह विविध उपक्र मांमध्ये रमलेल्या या क्लबसाठी ही कल्पना जणू स्वप्नच होतं. त्यामुळे सुरुवातीला बरीच खलबतं झाली. पण क्लबचा मूळ इंटरेस्ट हा खगोल असल्यानं उपग्रहाची कल्पना जोर धरू लागली. 
त्यावेळी क्लबचा सदस्य असलेला प्रसन्न कुलकर्णी यानं सांगितलं की, ही कल्पना सर्वांसाठीच नवीन होती. उपग्रहाबाबत कुणालाच काही माहिती नव्हती. तो बनवायचा कसा, त्यासाठी काय काय उपकरणं लागतात याचं काहीच ज्ञान नव्हतं. त्यामुळे हे मोठं आव्हान होतं. पण सर्वांनीच प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. पुढे असलेल्या आव्हानाची प्रत्येकालाच जाणीव होती. पण हा प्रकल्प खूप मोठा आहे, प्रत्येकाला काम करण्याची चांगली संधी मिळणार होती. त्यामुळे सर्वच जण तयार झाले...
इथून उपग्रहाच्या कल्पनेला प्रत्यक्षात येण्यासाठी बळ मिळत गेलं. काम सुरू झालं. मुलं पास होत कॉलेजातून पुढे गेली, दुसरी मुलं आली. हा मधला तब्बल आठ वर्षांचा कालखंड खूपच आव्हानात्मक होता. ‘उपग्रह बनवण्याचं ठरलं. माहिती गोळा करण्याचं काम सुरू झालं. तोपर्यंत ही कल्पना केवळ विद्यार्थ्यांपुरतीच मर्यादित होती. ही कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी संस्थेची मदत आवश्यक होती. त्यानुसार संचालकांकडे मुलं गेली. त्यांनाही ही कल्पना आवडली आणि उपग्रह बनवण्यावर शिक्कामोर्तब झालं. विद्यार्थी स्वत: हा उपग्रह तयार करणार असल्यानं ‘स्वयम’ असं त्याचं नामकरण करण्यात आलं, असं ‘स्वयम’ टीमचा सदस्य राहिलेला निश्चय मात्रे सांगत होता. 
आणि तिथून एका स्वप्नानं बळ धरलं आणि आज आठ वर्षांनंतर मुलांनी बनवलेला उपग्रह इस्त्रोमार्फत आकाशात झेपावला. आता त्याच्या संदेशवहनाचं काम सुरू होईल..
एक स्वप्न जिद्दीनं कसं आकारास आलं याची ही खऱ्या भरारीची गोष्ट..


एका वेगळ्याच टीमवर्कची गोष्ट
अ‍ॅस्ट्रोनॉमी क्लबमध्ये विद्यार्थी एकत्रितपणे काम करीत होते. त्यामुळे ‘टीम वर्क’ त्यांच्यासाठी तसं नवीन नव्हतं. उपग्रहाची कल्पना पुढे आल्यानंतर त्यासाठी संपूर्ण टीमनं काम करणं अपेक्षित होतं. त्यानुसार ही टीम उत्साहानं तयार झाली. पण यापुढचं एक मोठं आव्हान होतं ते म्हणजे सध्याच्या टीममधील विद्यार्थी उत्तीर्ण होऊन संस्थेतून बाहेर पडल्यानंतर पुढे काय?
पण या विद्यार्थ्यांनी एक रोड मॅपच तयार करून ठेवला, जेणेकरून नव्यानं येणाऱ्या विद्यार्थ्यांना काम करताना काही अडचण येणार नव्हती. त्यामुळेच टीममधील सदस्य बदलत राहिले तरी टीम वर्क, टीम स्पिरीट तेच होतं.. आणि भरारीच घेत राहिलं!

१७६ हातांची कमाल

पुण्यातल्या इंजिनिअरिंग कॉलेजातल्या मुलांनी उपग्रह बनवला तो इस्त्रोनं अवकाशात सोडला’
ही बातमी तुम्ही ऐकली-वाचलीही असेल. 
देशातला दुसऱ्या क्र मांकाचा सर्वात लहान उपग्रह त्यांनी बनवला. त्याचं वजन केवळ ९९० ग्रॅम आहे. खरं तर टीम वर्कचंही हे एक उत्तम उदाहरण आहे. 
२००८ च्या अखेरीस त्यावेळी इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या अभिषेक बाविस्कर, प्रिया गणदास, निश्चय मात्रे आणि मोहित कर्वे या चौघांची ‘स्वयम’ ही मूळ कल्पना. सुरु वातीला त्यांनी इंटरनेटचा आधार घेतला. शिक्षक, तज्ज्ञ, संशोधक, शास्त्रज्ञ यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या. इतर सहकारी मित्रमैत्रिणींची मदत होऊ लागली. उपग्रह बनवायचा म्हणजे साधी गोष्ट नाही, याचं भान ठेवून त्यांनी प्रत्येक बाब बारकाईनं पाहायला सुरु वात केली. आपल्या विद्यार्थ्यांचे हे प्रयत्न पाहून कॉलेज प्रशासनाचीही उत्सुकता वाढली. उपग्रह बनवण्याची कल्पना कॉलेजमधे सर्वांसाठीच नवीन होती. पण विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांना कॉलेजमध्ये सर्वांनीच बळ दिलं. २००९ मध्ये याला अधिकृत मान्यता दिली गेली. आता हे एक मिशन बनलं. ‘स्वयम’च्या निर्मितीला टप्प्या- टप्प्याने वेग येऊ लागला. खर्च, उपलब्ध साधनांचा विचार करून उपग्रह लहान असावा असे पक्के झाले होते. त्यामुळे लांबी, रु ंदी आणि उंची जवळपास १० सेंमी.पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली. यासाठी लागणारी बहुतेक उपकरणं विद्यार्थ्यांनी इथंच बनवली. काही साहित्य बाजारातून आणावं लागलं. काम एवढं सोपं नव्हतं. पण अनेक हातांनी ते उचलून धरलं आणि हे स्वप्न साकार झालं.
‘स्वयम’ची चर्चा जागतिक स्तरावर होत आहे, पुढेही होत राहील. त्याचं आयुष्य एक वर्ष असलं तरी केवळ कॉलेजमधील १७६ विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या एकीच्या बळानं एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकारास आला. आणि आठ वर्षांचा हा प्रवास अन्य अनेक तरुण इंजिनिअर्सना प्रेरणा देत राहील...

 
rajanand.more@gmail.com

Web Title: The eight-year old self-story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.