बहिरे की ढिम्म?

By Admin | Updated: September 24, 2015 15:02 IST2015-09-24T15:02:48+5:302015-09-24T15:02:48+5:30

सेलिब्रेशन बनता है, हे मान्य; पण त्यात तारतम्य नको का?

Dumb dumb? | बहिरे की ढिम्म?

बहिरे की ढिम्म?

 
ही ईमेल लिहावी की नाही याचा मी बरेच दिवस विचार करत होतो.
आपण फारच नतद्रष्ट कॅटॅगरीतले ठरू अशी भीती होतीच.
पण तरी लिहितोय.
मी लातूरजवळच्या खेडय़ातला.
आता पुण्यात असतो.
इथं केवढा गणपतीउत्सव. केवढा खर्च. केवढा तो तामझाम. परवा एका इंटरव्ह्यूसाठी मुंबईला गेलो. सोबत दोस्त होते. गणपती पाहायला चल म्हणाले, तर गेलो. तिथं तर डोळे दिपून गेले. काय तो लालबागचा राजा आणि सिद्धिविनायकाचा पैसा, काय ते वैभव.
त्याच दिवसांत टीव्हीवर पाहतच होतो, नाशिकच्या कुंभाची केवढी ती हौस. त्यापायी खर्च झालेला पैसा..
आपण गरीब देशात राहतोय असं कोण म्हणोल?
केवढी ही श्रीमंती?
पण त्या श्रीमंतीलाच का दोष द्या? आमच्या मराठवाडय़ातही मध्यमवर्गीय नोकरदार माणसांच्या घरात सणउत्सव वैभवात सुरूच आहेत की.
गरिबाचं कोणाला पडलंय?
मी म्हणत नाही सगळ्या पैशांची दुष्काळग्रस्तांना मदत करा. फुकट मिळालेला पैसा पुरत नाही हे आमच्या गावखेडय़ात सगळ्यांना कळतं.
त्यामुळे नुस्त्या आर्थिक मदतीला काही अर्थ नाही.
पण मुळात प्रश्न समजून घेऊन तो सोडवण्यासाठी काही मदत करता येईल का, याचा विचार तरुण मंडळांनी नको का करायला?
नेहमीच काय तो धांगडधिंगा. सेलिब्रेशन बनता है, हे मान्य; पण त्यात तारतम्य नको का?
त्याच पैशातून दुष्काळी भागातल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला तर?
पिण्याच्या पाण्यासह काही सुधार योजनांना पैसा दिला तर?
गरीब शेतक:यांना बी-बियाण्यांना पैसे मदत म्हणून देता आले तर?
असे कितीतरी पर्याय आहेत.
पण आपल्याला करायची इच्छा असेल तर.?
आपल्याला इच्छाच होत नाही असं आहे, की आपल्या संवेदनाच पुरत्या शहरी झाल्या आहेत?
मी विचारतोय हे प्रश्न स्वत:ला, कारण मीही आता शहरीच झालोय.
थोडासा बहिरा, थोडासा ढिम्म आणि बथ्थडही!
- आशुतोष
 

Web Title: Dumb dumb?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.