ड्रायव्हरलेस ट्रक
By Admin | Updated: July 7, 2016 13:10 IST2016-07-07T13:05:16+5:302016-07-07T13:10:51+5:30
अमेरिकेत आता असे ट्रक देशाच्या या टोकापासून त्या टोकार्पयत धावणार आहेत. आणि त्यामुळे 35 लाख लोकांवर बेरोजगारीचं संकट ओढावणार आहे. ऑटोमॅटिक मशीन्स माणसांच्या नोक-या पळवू लागतील अशा नव्या जगाची ही एक झलक आहे.

ड्रायव्हरलेस ट्रक
>- मयूर देवकर
माणूस आणि मशीन यांच्यात सुरू होणा-या एका नव्या युद्धाची सुरुवात
ड्रायव्हरशिवाय ट्रक चालू शकतात का? अमेरिकेत आता असे ट्रक देशाच्या या टोकापासून त्या टोकार्पयत धावणार आहेत. आणि त्यामुळे 35 लाख लोकांवर बेरोजगारीचं संकट ओढावणार आहे.
ऑटोमॅटिक मशीन्स माणसांच्या नोक-या पळवू लागतील अशा नव्या जगाची ही एक झलक आहे.
कुठलंही मशीन, अर्थात यंत्र हे माणसाची मेहनत, कष्ट कमी करण्यासाठी किंवा अवघड काम सोपं आणि जलद करण्यासाठी बनवलं जातं. त्यांची व्याख्यादेखील काहीशी अशीच केली जाते.
परंतु तंत्रज्ञानाच्या सुसाट प्रगतीमुळे माणसाला केवळ मदत म्हणून अवतरलेली ही यंत्र सारी कामं स्वत:च करू लागली आणि या यंत्रंनी माणसांचं कामच काढून घेतलं तर?
तसं होण्याची शक्यता हा काही भविष्यकाळ नाही. हे आजचंच आपल्या वर्तमानातलं वास्तव आहे. ऑटोमॅटिक किंवा स्वयंचलित यंत्रे आपली अनेक कामे त्यांच्या खांद्यावर घेऊन आजही पूर्ण करतातच की! आपल्या सुविधेसाठी ही गोष्ट खूप चांगलीच आहे. मात्र जग आता अशा एका टप्प्यावर पोहचतं आहे की जिथं ही यंत्रे माणसाचं कामच काढून घेतील आणि माणसालाच त्या कामातून हद्दपार करतील! माणसावर त्यामुळे बेरोजगारीचीच नाही तर उपासमारीचीही वेळ येऊ शकते. त्याचंच एक उदाहरण आणि जे सध्या अत्यंत वादग्रस्त ठरलंय ते म्हणजे अमेरिकेत रस्त्यावर उतरलेले स्वयंचलित ट्रक. अर्थात ड्रायव्हरलेस ट्रक.
युरोप आणि अमेरिकेत स्वयंचलित ट्रक्सचा वापर झपाटय़ाने वाढण्याचे संकेत आहेत. नुकतेच युरोप आरपार ओलांडून स्वयंचलित ट्रक्सचा एक ताफा रॉटरडॅम बंदरावर पोहचला. स्वयंचलित तंत्रज्ञानाचे हे अभूतपूर्व यशच मानावे लागेल. तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार या ऑटोमॅटिक यंत्रंमुळे आर्थिक कार्यक्षमतेमध्ये झपाटय़ाने वृद्धी होऊ शकते. त्याचंच एक उदाहरण म्हणजे, लॉस एंजलिस ते न्यूयॉर्क अशी ट्रकद्वारे मालवाहतूक करण्यासाठी साडेचार हजार डॉलर्स (सुमारे तीन लाख रुपये) खर्च येतो. यापैकी 75 टक्के खर्च हा ‘लेबर कॉस्ट’ म्हणजेच ड्रायव्हरचा मेहनताना असतो. म्हणजे स्वयंचलित ट्रक्समुळे या 75 टक्के खर्चाची बचत होणार.
त्यात मानवाच्या कार्यक्षमतेला मर्यादा आहेत. सध्या अमेरिकन कायद्यानुसार चालक आठ तासांच्या विश्रंतीशिवाय 11 तासांपेक्षा जास्त काळ वाहन चालवू नाही शकत. पण चालकरहित ट्रक मात्र 24 तास चालू शकतो. म्हणजे आजघडीला ट्रक मालवाहतुकीवर होणा:या खर्चाच्या केवळ 25 टक्के रकमेत दुप्पट काम पूर्ण केले जाईल.
ही बचत आणखी विशेष ठरते जेव्हा इंधन बचतीचा लाभ समोर येतो. इंधन कार्यक्षमतेचा सर्वाधिक वापर करण्यासाठी 72 किमी प्रतितास एवढा वेग कायम ठेवणो आवश्यक असते. स्वयंचलित तंत्रज्ञानामुळे हा वेग काटेकोर पाळणो शक्य होईल. उत्पादनाची किंमत ही वाहतुकीचा खर्च गृहीत धरून ठरवलेली असते. स्वयंचलित ट्रक्समुळे वाहतुकीच्या खर्चात, इंधनात आणि वेळेत बचत होणार म्हटल्यावर उत्पादनाची किंमतसुद्धा कमी होऊ शकते.
त्यामुळे ग्राहकांचे भविष्य उज्ज्वल आहे असे म्हणायला काही हरकत नाही. हे तंत्रज्ञान आणखी विकसित झाल्यावर जेव्हा त्याचा शंभर टक्के व्यावसायिक उपयोग सुरू होईल तेव्हा सुरक्षेसंबंधी त्याची मोठी मदत होणार आहे. अमेरिकेत यावर्षी ट्रक अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या ही मागच्या 45 वर्षात देशांतर्गत विमान अपघातात मृत्यू झालेल्या लोकांपेक्षा जास्त आहे. तसेच वर्षभरात 835 ट्रकचालकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. अमेरिकेत इतर कोणत्याच क्षेत्रत काम करणा:या लोकांचे कामावर एवढय़ा मोठय़ा प्रमाणात मृत्यू झालेले नाहीत.
रोजगारावर गदा
स्वयंचलित ट्रक्सचे आर्थिक फायदे दुर्लक्षित करता येण्याजोगे जरी नसले तरी त्यांच्यामुळे काही गंभीर तोटेदेखील होणार आहेत. 35 लाख ड्रायव्हर्सचं कामच जाईल आणि ते बेरोजगार होण्याची शक्यता या ड्रायव्हरलेस ट्रकमुळे निर्माण झाली आहे. शिवाय याचा फटका केवळ ट्रक ड्रायव्हर्सना नाही तर पेट्रोलपंप, ढाबे, लॉज आणि इतर हायवे व्यावसायिकांना बसणार आहेत. अमेरिकेतील 29 राज्यांत
ट्रक ड्रायव्हिंग हा प्रमुख रोजगार आहे. त्यामुळे त्याच्याशी निगडित लाखो लोकांना स्वयंचलित तंत्रज्ञानामुळे बेरोजगार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेत तीस हजार ट्रकचालकांचा तुटवडा असतानाही कंपन्या आजच काम करत असलेल्या चालकांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी आहेत. ज्याप्रकारे जगभरात ‘उबेर’ या टॅक्सी कंपनीविरोधात आंदोलने चालू आहेत त्याचप्रकारे अनेक ट्रक चालक संघटना व कामगार संघटना स्वयंचलित ट्रक्सच्या विरोधात उतरताना दिसताहेत. मात्र एक नक्की, आता ऑटोमायङोशनच्या एका वेगळ्या तांत्रिक जगात आपण शिरतो आहोत आणि त्यामुळे मशीन्सच माणसांपुढे आव्हान बनून उभी राहाणार आहेत.
भारतात काय होईल?
निदान अजून तरी भारतामध्ये स्वयंचलित ट्रक्सचा वापर होत नाही आणि अजून किमान काही वर्षे तरी होणार नाही. पण ज्याप्रमाणो पूर्वी संगणक आणि इतर यंत्र माणसांचा रोजगार हिसकावून घेईल, अशी भीती व्यक्त केली जायची तसेच काहीसे वातावरण आपल्याकडेही स्वयंचलित ट्रक्सबद्दल असेल यात काही शंका नाही. एक नक्की ऑटोमेशन तंत्रज्ञान हे भविष्य आहे. तुम्ही केवळ ते दूर लोटू शकता, टाळू शकत नाही.