दोस्ताला जगवणारी दोस्ती
By Admin | Updated: August 4, 2016 16:09 IST2016-08-04T16:09:47+5:302016-08-04T16:09:47+5:30
तुषार आणि योगेश. दोन जिवाभावाचे दोस्त. त्यांची दोस्ती अशी की, एका दोस्तानं दुसऱ्याला जगण्याचा आधार दिला. त्या सच्च्या दोस्तीची गोष्ट येत्या फ्रेण्डशिप डे निमित्त..

दोस्ताला जगवणारी दोस्ती
>- भक्ती सोमण
(लेखिका ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्ती उपसंपादक आहेत)
तुषार आणि योगेश.
दोन जिवाभावाचे दोस्त.
त्यांची दोस्ती अशी की,
एका दोस्तानं दुसऱ्याला
जगण्याचा आधार दिला.
त्या सच्च्या दोस्तीची गोष्ट
येत्या फ्रेण्डशिप डे निमित्त..
९३ सालचा बॉम्बस्फोट. त्यानं अनेकांच्या आयुष्यात उलथापालथ घडवली. त्यात एक घर होतं तुषार देशमुखच. तुषारची आई प्रीती देशमुख मुंबईच्या पेरड रोडस्थित एका कंपनीत कॅण्टिन चालवत असतं. त्यादिवशी बस पकडून घरी येत असताना बस सॅँचुरी बाजार स्टॉपवर थांबली. एक टॅक्सी बसच्या पुढे थांबली होती. त्याच टॅक्सीतून क्षणार्धात स्फोट झाला आणि होत्याचं नव्हतं झालं. त्या स्फोटात तुषारची आई गेली. तो आणि त्याचे वडील पूर्ण कोलमडून गेले. दरम्यान, आईला जाऊन वर्षही होत नाही तोवर वडिलांनी दुसरं लग्न केलं. मात्र त्या नव्या आईला स्वीकारणं तुषारसाठी सोपी गोष्ट नव्हती. नवी आई इतरांसाठी डबे करून विकायची. त्यासाठी तुषार मदत करत असे. नंतर घरकाम, भांडी घासणं, कपडे धुणं ही कामंही तुषारलाच ती करायला लावे. त्यात पोटभर अन्न मिळत नसे. या सगळ्या त्रासाची वडिलांना कल्पनाच नव्हती. तुषार दहावीत होता. तेव्हा त्याचे आजोेबा आजारी होते. आजोबांचे सगळं काम त्यालाच करावं लागे. आणि ते करून तो कनोज शर्मा या मित्राकडे अभ्यासाला जात असे. एकदा त्याच्याकडेच तुषारला चक्कर आली. त्यावेळी कनोजच्या वडिलांनी डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी याच्या पोटात अन्नच नाही, असं सांगितलं. शर्मा कुटुंबीयांना तुषारच्या आई-वडिलांना बोलावून सारं सांगितलं, समजावलं. पण त्याचा काही फार उपयोग झाला नाही.
पुढे कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्यासाठी लागणारी फी त्यानं घरोघरी लोणची, पापड मसाले विकून जमा केली. कीर्ती कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि त्याची भेट योगेश म्हात्रेशी झाली. ही भेट पुढे आयुष्यभरासाठी साथ आणि घर देणार आहे याची त्यावेळी त्या दोघांनाही पुसटशी कल्पनाही नसावी. एकीकडे घरी अडचणी वाढत चालल्या होत्या. तर योगेशबरोबर चांगली मैत्री होत होती. काही दिवसांतच प्राचार्यांनाही तुषारच्या घरच्या परिस्थितीची कल्पना आली. तो कधीकधी कॉलेजच्या कॅण्टिनमध्ये झोपत असे. हे पाहून प्राचार्यांनी त्याला हॉस्टेलमध्ये राहण्यास सांगितले. या काळात योगेशच्या घरीही तुषारचे येणे-जाणे वाढले. कॉलेजच्या सर्व एक्टिव्हिटीजमध्येही दोघं एकत्र असायचे. तेव्हापासून संवादाच्या पातळीवर त्यांची मैत्री बहरायला लागली होती. योगेशच्या आई नीना आणि वडील दिलीप म्हात्रे यांच्याशीही खूप छान सूर जुळले. कधी तुषार अभ्यासाच्या निमित्ताने राहणार असेल तर, त्याच्या आवडीचे पदार्थ नीना बनवू लागल्या. त्याच्या पापड, लोणची, मसाल्याच्या, पन्ह्याच्या पिशव्याही त्यांच्या घरी ठेवल्या जायच्या. त्या घरात पोटच्या पोरासारखी माया मिळू लागली.
बारावीनंतर एक दिवस योगेशनचे आपण कायमचं तुषारला आपल्याकडे आणायचं का, असं आई-बाबांना विचारले. त्यांनीही कुठलेही आढेवेढे घेतले नाहीत. समाज, आपले इतर कुटुंब काय म्हणेल, याचा कुठलाही विचार त्यांनी केला नाही. तुषार नेसत्या कपड्यानिशी योगेशच्या घरी राहायला आला. आणि योगेश, कुंदन या आपल्या मुलांप्रमाणेच आता तुषारही आपला तिसरा मुलगा आहे, हे योगेशच्या आई-बाबांनी स्वीकारलं.
योगेशकडे राहिला आल्यानंतर काही महिन्यातच या दोघांनी मिळून बिझनेस करायचा असं ठरवलं. त्यासाठी तुषारकडे पैसे नसतानाही व्यवसायात योगेशबरोबर तुषारची समान पार्टनरशीप असली पाहिजे, असा आग्रह योगेश आणि त्याच्या आईने धरला. मधल्या काळात मंदीमुळे हे आॅफिस बंद करण्याची वेळ आली होती. पैशांची अत्यंत आवश्यकता होती. त्यावेळी तुषार, योगेशने परिस्थितीची जाणीव करून दिल्यावर कुठलाही विचार न करता योगेशच्या आईने दागिन्यांचा डबा तुषारच्या हाती दिला.
तुषारला घराच्या समस्येपासून बाहेर पडायला बराच काळ गेला. तेव्हा त्याला टेन्शनमुळे हायब्लडप्रेशरचा खूप त्रास झाला, अॅडमिट करावं लागलं. सहा दिवस हॉस्पिटलमध्ये दिवस-रात्र योगेश आणि त्याचे आई-वडील सोबत होते. स्वत:च्या आई-वडिलांपेक्षा जास्त काळजी त्यांनी तुषारची घेतली. या घटनेनंतर त्यांचं नातं आणखी दृढ झालं. तुषारचं हॉटेल काढण्यासाठीही योगेशनं त्याला केलेली मदत, धावपळ आणि दिलेली साथ खूप महत्त्वाची ठरली.
या दोघांची इतक्या वर्षांची मैत्री. पण त्यात भांडणं लावण्याचे प्रयत्नही झाले. पण त्याला भीक न घालता त्यांचं नातं अधिक घट्ट होत गेलं आहे. त्यांच्या दोस्तीतही इतर दोस्तांसारखे वाद होत असले तरी ते तेवढ्यापुरते. दोस्ती मात्र जिवाभावाची आणि जिवाला जीव देण्याची आहे. आणि अधिक घट्ट होते आहे.
योगेश तुषारबद्दल अत्यंत भावनिक आहे. आजही तुषारबद्दल काहीतरी सांग असं म्हटलं तर तो बोलूच शकत नाही. दुसऱ्याला त्याच्या डोळ्यातले अश्रू दिसत नाहीत, पण या मित्रासाठी आपण ऐवढं काही केले आहे, अशी किंचितशी भावनाही योगेशच्या वागण्या-बोलण्यातच काय पण नजरेतही चुकून कधी दिसत नाही. दिसतो तो केवळ तुषारप्रती आदर आणि त्याचं चांगले व्हावं ही सच्ची भावना!
मैत्री कायमच
योगेशच्या आई-वडिलांनी मला मोठा मुलगाच मानलंय. तसंच योगेश मला वेळेप्रसंगी भावाप्रमाणेच दर्जा देतो. याचं कारण घरातला कोणताही निर्णय आम्ही एकत्र मिळून घेतो. भावाचा दर्जा असला तरी आमच्या मैत्रीचं नातं घट्ट आहे.
- तुषार देशमुख
त्याचं भलचं व्हावं.
तुषार आज शेफ म्हणून नावारूपाला आल्याचा खूप आनंद आहे. त्याने आजवर खूप भोगले आहे. त्यामुळे त्याला आनंद देण्याचा प्रयत्नच माझा व माझ्या कुटुंबाचा असतो.
- योगेश म्हात्रे
१) म्हात्रेंच्या रेशनकार्डावर तुषारचं नाव
एफवाय नंतर तुषार आणि योगेशला एकत्र व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी तुषारचं रेशनकार्ड, वास्तव्याचा दाखला हवा होता. योगेशकडे राहात असल्यानं तुषारला या महत्त्वाच्या गोष्टी देण्यात तुषारच्या आईनं नकार दिला. खूप विनंती करूनही देत नाही म्हटल्यावर तुषारने पोलिसांची मदत घेतली. पुढं तुषारच्या आईने त्याचं रेशनकार्डावरचं नावच काढून टाकलं. कागदोपत्री आपल्या अस्तित्वाचे पुरावे गोळा करणाऱ्या तुषारची घालमेल योगेशनं पाहिली आणि तेव्हाच आपल्या रेशनकार्डावर तुषारचं नाव घालायचं असं आई-वडिलांना सांगून ते अंमलातही आणलं. आता म्हात्रे कुटुंबीयांच्या रेशनकार्डावर तुषार देशमुखचंही नाव आहे.
२) मानसोपचारतज्ज्ञांनीही मैत्रीला दिले जास्त मार्क
सतत येणाऱ्या सततच्या अडचणींमुळे आपले अस्तित्व ते काय, असा प्रश्न तुषारला पडला. त्यामुळे मानसिकरीत्या तुषार खूपच कोलमडला होता. त्याला मानसोपचाराची गरज होती. डॉ. शुभांगी पारकर यांच्याकडे ट्रिटमेंट चालू होती. त्यावेळी डॉक्टरांनी घरातल्या सर्वांबरोबर योगेशलाही तुषारविषयी बोलायला बोलावलं होतं. त्यावेळी घरातल्यांची तुषारबाबतची सर्व उत्तरे नकारात्मक तर योगेशची ठाम आणि पॉझिटिव्ह होती. त्यावरून तुषारला पुन्हा उभं राहायचं असेल तर केवळ योगेश हा मित्रच त्याला यातून बाहेर काढू शकतो, असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला होता. ते आता तंतोतंत खरं ठरले आहे.