Doing Nothing is an art! लॉकडाउनच्या काळात 'ही ' कला शिकून घ्या ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 06:29 PM2020-04-09T18:29:25+5:302020-04-09T18:40:13+5:30

आता लॉकडाउनच्या काळात शेकडो गोष्टींची यादी तयार करून हे शिक, ते सजव, ते बनव, हा पदार्थ, तो व्यायाम असं सगळं करायचं तुमच्या मनात असेल. त्यापैकी होत काहीच नाही आणि सोशल मीडियात वेळ वाया जातो म्हणून तुम्ही वैतागत असाल आणि काहीच न करता दमतही असाल! तर त्यासाठी हा एक उपाय करून पहा.

Doing nothing is an art! try this art in corona-virus lock down time. | Doing Nothing is an art! लॉकडाउनच्या काळात 'ही ' कला शिकून घ्या ! 

Doing Nothing is an art! लॉकडाउनच्या काळात 'ही ' कला शिकून घ्या ! 

Next
ठळक मुद्देDoing Nothing कमाल आपल्याला आपल्या आयुष्यात जमायला हवी!लक्षात ठेवा, जो कुछ नहीं करते, वो कमाल करते है!

प्राची पाठक

‘अरे, काय आळशासारखा बसलाय?’ ‘इतका वेळ आहे, तर कर काहीतरी’, ‘वेळ असा निघून जात आहे. नंतर नसेल असा वेळ.’
‘हीच वेळ आहे काहीतरी करून दाखवायची’. सध्या घरोघर अशी एक ना अनेक वाक्यं तरंगत आहेत. कधी ती वाक्यं नुसतीच भिरभिरतात, आणि उडवून लावता येतात. कधी कधी मात्र अगदी मिसाइलसारखी ती अंगावर येतात. तिथं डिफेन्स संपतो.
आणि बोलणी खावी लागतात. वेळेचा सदुपयोग या विषयावर मोठं भाषण, त्यातून भांडण आणि कायमच कसे तुम्ही आळशी आहात, फुकट खाता हा समारोप होतो. तात्पुरता विषय संपतो. मात्र ते सेशन संपताना काही टिप्सही मिळतात.
एक टू डू लिस्ट बनवा आणि त्यानुसार प्लॅनिंग करत काम करत जा..
अभ्यासाचं प्लॅनिंग करा, नोकरी शोधायचं प्लॅनिंग करा, पैसे कमवायला लागल्यावर ते गुंतवायचं प्लॅनिंग करा, 
जोडीदार शोधायचं प्लॅनिंग करा, रोज काय नाश्त्याला बनवायचं त्याचं प्लॅनिंग करा, व्यायामाचं प्लँनिंग करा.. 
प्लॅनिंग करा, प्लॅनिंग करा.. 
असे खूप मॅनेजमेंट फंडे आपल्यावरती धाडधाड आदळत असतात. 
त्या त्या परिस्थितीत हे सर्व फंडे योग्य असले, तरी कसलंही प्लॅनिंग न करणं किंवा नसणं हेदेखील एखादं प्लॅनिंग असू शकतं, याची मजा घ्यायलाच आपण विसरून जातोय का? 
मला वेळ आहे, पण मी काहीही करणार नाही, असं आपण ठामपणो ठरवतो का?
मिळालेल्या वेळामध्ये कधीतरी ‘मी काहीही करणार नाही’ याची मजा अनुभवून बघायची संधी आपल्याला घेता येते का? 
त्याबद्दल कधी विचार करणार आपण?
सध्या कोरोनाच्या लॉकडाउन काळात काय काय करता येईल, याची खूप मोठी जंत्रीच लोकांनी लावली आहे. 
काही जण खूप इनोव्हेटिव्ह गोष्टी करतही असतील, ज्या गोष्टींना पूर्वी कधीच वेळ देता आला नव्हता. कोणी उगाच फोनच्या डाय:या काढून गेल्या पाच-दहा वर्षात कोणाला फोन केले नव्हते, अशांना फोनही करत असतील. 
हे सगळं आपापल्या जागी ठीकच आहे. 
पण साधारणपणो आपल्याला दिवसभरात मिळणारा वेळ नेमका जातो कसा, त्याच्याकडे तुम्ही डोळसपणो बघितलं आहे का?
काय करतो आपण दिवसभर? सध्या जीवन मरणाची गोष्ट म्हणजे कोरोना व्हायरसच्या साथीचे अपडेट्स सतत घेत राहणं. त्याबद्दल समोर असतील, नसतील त्या सर्वाशी चर्चा करत बसणं. ही चर्चा होत नाही तोवर नवीन अपडेट आलेले असतात. परत आपण त्या ट्रॅपमध्ये गुरफटून जातो. तोवर आपल्या व्हॉट्सअॅपमध्ये अनेक फॉरवर्ड येऊन पडलेले असतात. अनेक लिंक लोकांनी पाठवलेल्या असतात. एकीकडे टीव्ही सुरू असतो. त्यावर ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज करत बटबटीत आरडाओरड चालू असते. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर कोण महाशय काय म्हणाले, लॉकडाउन काळात त्यांनी आपल्या घरी बसून काय काय भारी केलं, याबद्दल माहिती घेत असतो. वाचत असतो. ते किती भारी करतात यार, आपल्यालाच असं जमत नाही, हे फुकटचं टेन्शन वरतून. म्हणजे दिवसातला बराच वेळ आपण केवळ माहितीमध्ये गुरफटून गेलेलो असतो. ही माहिती क्षणाक्षणाला बदलत असल्याने आपल्याला ती कुठे तोडायची आणि  कुठे आपण स्वत:ला त्या माहितीपासून वेगळं करून घ्यायचं, याची सीमारेषा नीटशी दिसत नसते. तोवर कोणाचे व्हॉट्सअॅप कॉल, कोणाचे फोन, कोणाचे व्हीडीओ कॉल असं सगळं साइड बाय साइड सुरूच असतं. त्यातच आपल्या दैनंदिन गोष्टी आपण करत असतो. दिवसाच्या अखेरीस विशेष काहीही न करता आपला सगळा वेळ असाच चालला जातो. मग आपल्याला ‘काहीतरी करूया’, असं टेन्शन येतं. प्रत्यक्ष ठोस असं काहीही न करता सुद्धा आपण शरीर, मनाने थकून गेलेलो असतो. एकाच पद्धतीने आपला मोबाइल हातात घेतल्याने आणि तो ऑपरेट केल्याने आपले हाताचे आणि मानेचे-पाठीचे स्नायू थकून गेलेले असतात. माहितीचा भडिमार होऊन डोकं भणभणून गेलेलं असतं. त्यामुळे, मुद्दाम ठरवून असं आपण काही केलं नाही, तरी हातचा सगळा वेळ तर निघून जातोच. परंतु, उगाचच ओढवून घेतलेला थकवा आणि वातावरणातली अनिश्चितता आपल्याला व्यापून टाकते. प्रत्यक्ष काहीही न करता दिवस दिवस उलटतात आणि आपण या ब्रेकमध्ये फ्रेश होण्याच्या ऐवजी काहीही न करताच पुरते थकून गेलेलो असतो. म्हणूनच आपल्याला जर ‘काहीही न करायचं’ ठरवायचं असेल, तर खरं तर त्याचं नीट प्लॅनिंग करण्याची गरज आहे. नाहीतर इतका मोठा ब्रेक घेऊनसुद्धा ब्रेकपासून ब्रेक हवा, म्हणून वेगळा ब्रेक घ्यायची वेळ येईल! ब्रेकमधलं फ्रेश वाटणं आपल्याला अनुभवायलाच मिळणार नाही. उलट त्यात आपण आणखीनच पिचले जाऊ. मग कसा सोडवायचा हा पेच?
सोडवता येऊ शकतं, त्यासाठी ‘डुइंग नथिंग’ हा फॉम्र्युला वापरा.
ते प्लॅन करा. म्हणतात ना, जो कुछ नहीं करते, वो कमाल करते है!
ती कमाल आपण आपल्या आयुष्यातही करूच शकतो!

काहीच करायचं नाही, पण कसं?

1. सगळ्यात पहिल्यांदा आपण दिवसातला किती वेळ फोनच्या आहारी गेलेले असतो, वेगवेगळे अपडेट्स आणि फॉरवर्ड्स वाचण्यात घालवत असतो, ते स्वत:ला नीटच विचारायचं. 
‘डुइंग नथिंग’चं प्लॅनिंग करण्यासाठी आधी हा उगाचच व्यापून टाकणारा वेळ पूर्ण आपल्या आटोक्यात आणायला शिकायचं.  दिवसातून पन्नास वेळा आपण अपडेट चेक करणार असू, तर ते कमीत कमी तीस वेळा, वीस वेळा, चार वेळा आपण चेक करू, हे बघायचं. हळूहळू एखादा दिवस या सर्व अपडेटपासून पूर्ण सुट्टी घेता येईल का, इथवर आपण पोहोचू. 

2.अमुक अपडेट तेव्हाच्या तेव्हा आपल्याला मिळाले नाहीत, तर आपल्या आयुष्यात इतकी कुठे आग लागलेली नसते, हे आपल्याला कळायला लागेल. आपण काहीही ग्रेट मिसआउट करत नाही, ते आपण समजू शकू. इतकीच हौस असेल, तर कालांतराने ती माहिती आपल्याला कुठे ना कुठे मिळणारच असते. ती तेव्हाच्या तेव्हा लगेच घेऊन आपल्याला कुठल्या स्पर्धा परीक्षेत देशात पहिलं यायचं नसतं! तर, जरा बेतानेच..

3. पुढची गोष्ट म्हणजे एरवी आपण ब्रेकसाठी हे शिकू, ते करू असं जे प्लॅन केलेलं असतं, त्यालाही एखाद दिवस पूर्ण बाजूला ठेवायचं. अमुकच वेळी उठायचं, अमुकच वेळी तमुकच करायचं, अशा सगळ्या प्रेशर्समधून आपल्या शरीराला, मनाला सुट्टी द्यायची. कोणतंही टेन्शन न घेता निवांत लोळत पडायचं. ते लोळतांना पुस्तक तरी वाच रे, असाही ताण घ्यायचा नाही. फोन पूर्ण बाजूला ठेवून द्यायचा. स्वत:शी बोलून बघायचं. आपली कंपनी आपल्याला आवडते का, ते तपासायचं. हे ही केलंच पाहिजे असं नाही. पण निवांत बसलेल्या मनात काय काय येतंय, याचं आपलं आपण साक्षीदार व्हायचं.

4.  एरवी केवळ आणि निव्वळ टाइमपास करत, चकाटय़ा पिटत दिवस दिवस घालवणा:यांना हे लागू नाही. आपण असलेल्या वेळात काहीतरी करू या, अशी धडपड करणा:या, स्वत:ला अपडेट करणा:या, आपल्या शरीराची, मनाची काळजी घेणा:या तरु ण मंडळींना हे लागू आहे. त्यामुळे, ‘डुइंग नथिंग’ हे आपल्याला लागू पडतं की नाही, ते आधी प्रामाणिकपणो स्वत:ला विचारायचं. हीसुद्धा आपल्या जीवनशैलीची एक टेस्ट होऊन जाईल! पुन्हा, वरवर तर लोक आपल्याला टोमणो मारतात की तुम्ही काहीच करत नाही. रुढार्थाने काहीही न करताच आपण आतून किती थकलेलो आहोत, याची जाणीव आपल्याला होईल. आपल्यालादेखील बरंच काही करायचं आहे, पण नीटशी दिशा सापडत नाही, म्हणून आपण वरवर पाहता रिकामे दिसतो. पण आतून आपण स्वत:लाच किती कोसत असतो त्या रिकामपणाबद्दल, याची जाणीव आपल्याला होईल. त्यात कधी संधीचा अभाव असतो. आपला असा पूर्ण दोष नसतो. अशा वेळी स्वत:ला माफ करत डुइंग समथिंग स्लोली असा आपला प्रवास व्हायलादेखील डोळसपणो बघितलेली सध्याची ‘डुइंग नथिंग’ फेज मदतच करेल. त्यातून आयुष्य आकाराला येईल. उभं राहील.

5. म्हणूनच काहीतरी कर, काहीतरी कर याचा एकदम लोड घ्यायचा नाही. हळूहळू गोष्टी करत जायचं. सुधारणा करायच्या. नवीन शिकत जायचं. पण नवीन काय, नवीन काय या स्पर्धेत अडकायचं नाही. ते सर्व करत असताना एखाद दिवस काहीही न करणंदेखील प्लॅन करून, वेळ काढून घडवून आणायचं..
मग आपल्याला कळेल, काहीही न करणंसुद्धा इतकं सहज सोपं नाही. पण ते जमलं तर त्यातून मिळणारी मानसिक ऊर्जा खूप काही करण्यासाठी आपल्याला बळही देईल आणि एक दिशाही दाखवेल. 



( लेखिका मानसरोग तज्ज्ञ आणि पर्यावरणासह सूक्ष्म जीवशास्त्रच्या अभ्यासक आहेत.)
 

Web Title: Doing nothing is an art! try this art in corona-virus lock down time.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.