वेगळं काहीतरी म्हणजे नेमकं करायचं काय?

By Admin | Updated: August 29, 2014 09:44 IST2014-08-29T09:44:33+5:302014-08-29T09:44:33+5:30

खास उपक्रम करणारी गणेश मंडळं शोधताना ऑक्सिजन टीमला आणखी काय सापडलं?

Do you want to do something different? | वेगळं काहीतरी म्हणजे नेमकं करायचं काय?

वेगळं काहीतरी म्हणजे नेमकं करायचं काय?

>‘समाजप्रबोधनासाठी, सामाजिक ऐक्यासाठी सुरु केला लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव आणि आता आपण त्याचं काय करुन टाकलंय?
कशाचाच धरबंध उरलेला नाही, वारेमाप उधळपट्टी काय, ढॅणढॅण आयटम सॉँगचा मारा काय, डॉल्बी काय नी डीजे काय.
कान बंद करुन घ्यावेसे वाटतात या दिवसात?
उपयोग काय या नुस्त्या कलकलाटाचा.?’
हा असा त्रागा गणेशोत्सवात अनेकजण नेमानं करतात, चिडतात, बोलतात, पण गप्प बसतात.
मग दरवर्षी पुन्हा तेच ते आणि तेच ते.!
विचार करा, छोट्या म्हणजे अगदी गल्लीतल्या बालगणेश मंडळापासून ते बड्याबड्या शेसव्वाशे वर्षांची परंपरा सांगणार्‍या मोठय़ा नामचीन मंडळांपर्यंत सर्वत्र तरुण मुलांची गर्दी असते. त्यांची सळसळती ऊर्जा असते. गणपतीतली ‘एकी’, ते टीम स्पिरीट, ते देहभान विसरून रात्रंदिवस डेकोरेशन करणं, काटकसर करुन, घासाघीस करुन गणपती मंडळासाठी आवश्यक ते सगळं साहित्य जमवणं, पार सत्यनारायणासाठी गुरुजी ‘फिक्स’ करण्यापासून प्रत्येक गोष्टीचं नियोजन करण्यापर्यंत हा सारा इव्हेण्ट तरुण मुलंच तर प्लॅन करत असतात.
पण यापलीकडे जाऊन एक पाऊल नेहमीच्या वतरुळाबाहेर टाकता येईल का?
गणपती बाप्पा आपल्याला अधिक सकस, अधिक अर्थपूर्ण आणि खरोखर आनंददायी असं काही देण्याची बुद्धी देईल का?
आणि मुख्य म्हणजे या सार्‍या महाराष्ट्रात थोडे तरी तरुण मित्र असे आहेत का, जे गणेशोत्सवात टिपीकल चमचा लिंबू स्पर्धा, संगीत खूर्चीपलीकडे जाऊन काहीतरी ‘वेगळा’ उपक्रम करताहेत.
जीव छोटा असेल त्या उपक्रमाचा, आयडियाही छोटीच, नुकतंच सुरू केलं असेल काम, पण करतंय का कुणी काहीतरी असं ज्यातून आपल्या अवतीभोवती बदल घडेल, जरा बरं काम केल्याचं समाधान मिळेल असं काहीतरी.?
राज्यभर आमचे वार्ताहर मित्रमैत्रिणी कामाला लागले.
त्यातून सापडली ही काही मंडळं, ज्यांचं काम तुम्ही या अंकात वाचता आहात.
पण ही मंडळं शोधता शोधता काही गोष्टी सहज लक्षात आल्या.
म्हणून हे एक खास शेअरिंग. 
१) एकतर वेगळं, समाजउपयोगी, सृजनशील, चाकोरी सोडून काहीतरी करु पाहणारी मंडळ अगदी कमीच सापडली. वर्गणी गोळा करायची, नेहमीप्रमाणे डॉल्बी, आयटम सॉँग्ज, धांगडधिंगा, रोषणाईवर वारेमाप खर्च यापलीकडे विचार करणारी मंडळं अगदी थोडीच.
२) तरीही जे असा विचार करतात त्यांचं विशेष कौतुक. या अंकात तुम्हाला भेटणारी अनेक मंडळं मिरवणुका काढत नाहीत, काढल्या तरी त्यात डॉल्बी लावत नाहीत, उशिरापर्यंत लाऊडस्पीकरचे भोंगे वाजवत नाहीत. आपल्या खर्चाच्या एकेक पैशाचा हिशेब ठेवतात. त्यातून उरलेले किंवा जाणीवपूर्वक काही पैसे हे सामाजिक उपक्रमासाठी देतात. प्रसंगी कार्यकर्ते स्वत:च्या खिशातून पैसे टाकतात.
-पण हे चित्र अपवाद म्हणावं असंच.  आपल्या अवतीभोवती जी वंचित माणसं आहेत, त्यांच्यापर्यंत हा पैसा पोहचवावा असं अजूनही अनेक मंडळांना वाटत नाही.
३) अनेक मंडळात तरुण कार्यकर्ते एकत्र येतात. पण एकत्र येऊन करायचं काय हेच आम्हाला सूचत नाही, असं अनेक मंडळाचे कार्यकर्ते सांगतात. काहीतरी भव्यदिव्यच कशाला करायला हवं, जसं अनेक मंडळं छोटे उपक्रम करतात तसं जरी केलं तरी एक चांगली सुरूवात होऊ शकते.
४) वेगळं काही करायचं तर पैसे हवेत असा गैरसमज अनेक मंडळाच्या कार्यकर्त्यात दिसतो. तो फारसा खरा नाही, आहे त्याच पैशात वेगळ्या, साध्या आणि अर्थपूर्ण पद्धतीनं गणेशोत्सव नक्की साजरा करता येऊ शकतो. तो कसा करावा हे कळावं म्हणून तर या अंकात या वेगळ्या मंडळांची एक भेट घडवतोय.
५) ही मंडळं जे करतात, जसं करतात तेच करा असा आग्रह नाही, पण आपल्याला काही चांगलं काम करायचं असेल तर करण्यासाठी हिण्ट आणि प्रेरणा मिळावी, आयडिया यावी म्हणून तर वेगळं काम करणार्‍या कार्यकर्त्यांची एक मैफल या अंकात जमवली.
कशी वाटली?
कसा साजरा केला तुम्ही गणेशोत्सव? 
नक्की कळवा.
-ऑक्सिजन टीम

Web Title: Do you want to do something different?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.