.तुम्हाला ‘ऐकू’ येतं?
By Admin | Updated: November 20, 2014 18:16 IST2014-11-20T18:16:38+5:302014-11-20T18:16:38+5:30
विचारला प्रश्न की, दे उत्तर ! हे म्हणजे मुलाखत नव्हे!

.तुम्हाला ‘ऐकू’ येतं?
मुलाखत म्हणजे काय तर एकजण प्रश्न विचारतो आणि उमेदवार त्याची उत्तरे देतो, असा आपला समज असतो. तसं वाटणं स्वाभाविकही आहे. परंतु तुमच्या उत्तरातूनच नवीन प्रश्नांचा जन्म होत असतो. त्यामुळे मुलाखत म्हणजे निखळ प्रश्नोत्तरं नसतात.
ते दोन व्यक्तीमधलं संभाषण असतं. जेव्हा तुम्ही मुलाखतीला संभाषणाचं स्वरूप देता, तेव्हाच ती मुलाखत प्रभावी होते आणि तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात.
समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, मुड, घटना आणि व्यक्तिमत्त्व क्षणार्धात ओळखून जो संवाद साधतो तो खरा संभाषण चतुर. काही उमेदवार असे संभाषण चतुर असतात.
आपल्याला असं संभाषण चतुर नाही का होता येणार? येईल ना! त्यासाठी आपल्याला कम्युनिकेशन स्किल शिकावं लागेल. ते शिकायचं तर कुठल्याही संभाषणातला एक महत्त्वाचा एक घटक आधी शिकून घ्यायला हवा. तो म्हणजे ‘ऐकण्याची कला’.
संभाषणात प्रथम ‘ऐकण्याची’ तयारी ठेवा. समोरच्या व्यक्तीच्या प्रश्नात, व्यक्तिमत्त्वात रस दाखवा. तो जे म्हणतोय ते संपूर्ण तन्मयतेने ऐकण्याचा प्रयत्न करा. त्याला दाखवायला हवं की, तो जे बोलतोय त्याची आपण दखल घेतोय. तसा उत्साह आपल्या चेहर्यावर दिसायला हवा.
आणि मग आत्मविश्वासानं बोला. हा आत्मविश्वास चेहर्यावर दिसायला हवा. बोलताना सामान्यज्ञान, कॉमनसेन्स, मॅनर्स आणि एटीकेट्स यांचं भान ठेवा. आणि महत्त्वाचं म्हणजे देहबोलीचा प्रभावी वापर करा.
आपण काय बोलतोय तेही ऐका. कारण तुमच्या उत्तरांतूनच दुसरा प्रश्न येतो आणि त्याचंही उत्तर तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे.
त्यामुळं प्रश्न समजून घ्या, समजला नसेल तर परत विचारा. अर्थ समजला नसेल तर, ‘सर जरा पुन्हा थोडं विस्तारानं सांगता का? असं न भिता विचारणं केव्हाही चांगलं. संभाषण करताना समोरच्या व्यक्तीच्या र्मयादाही लक्षात घ्या. त्याची त्यावेळची मानसिक परिस्थिती समजून घ्या. मोकळेपणानं आणि महत्त्वाचं म्हणजे नैसर्गिकपणे वागा. उगीच आव आणू नका.
बर्याच मुलांना इंग्रजी शब्दांचे उच्चार चांगले जमत नाहीत. त्यावर एक काम करा. थोडी प्रॅक्टीस करा. वाचत रहा. संभाषण स्पष्ट ठेवा, विनम्रतेनं बोला.
संभाषण कौशल्य ही काही फक्त मुलाखतीपुरती गोष्ट नाही. तो आपल्या जीवनातील महत्त्वाचा घटक आहे. कौशल्य म्हणून ते विकसित करता यायला हवं.
तुम्ही जी उत्तरं देताय, जे बोलताय त्यात मुलाखतकर्त्याला तुमच्या उच्चारात इंटरेस्ट वाटला पाहिजे. तसं मोकळं, मनापासून बोला.
बर्याचदा उमेदवार आत्मविश्वासानं बोलायची सुरुवात करतात. मात्र एखाद्या कठीण प्रश्नांवर गडबडतात. असं का होतं? तुम्ही मित्राशी किंवा कुणा मोठय़ा व्यक्तींसोबत चर्चा करता किंवा संभाषण करता, तेव्हा कितीही कठीण प्रश्न आला तरी तुम्ही तो हॅण्डल करताच ना. त्याचं उत्तर माहीत नसेल तर तसं सांगता किंवा तुम्हाला जे योग्य वाटतं ते बोलता. मुलाखतीतही हेच तंत्र वापरा.
आणि हे तंत्र शिकणं म्हणजेच संभाषण कौशल्य कमवणं. जगाच्या प्रयोगशाळेत हे असे प्रयोग करणं, हे एक प्रकारचं शिक्षणच.
ते शिका, मुलाखतीपलीकडे जाऊन.!
- विनोद बिडवाईक