आपण अनलॉक व्हावं म्हणून..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 08:00 AM2021-02-18T08:00:00+5:302021-02-18T08:00:07+5:30

जेव्हा दमन होतं तेव्हा संवाद आणि शांततापूर्ण संघर्षाची अवजारं बाहेर निघतात. हुकूमशाहीच्या तटबंद्या फोडून तरूण कोरू पाहतात नव्या जगाची शिल्प. परस्परांवरचं प्रेम आणि सत्यावरचा विश्वास हेच त्यांचं टुलकिट.

To do for unlock ourselves | आपण अनलॉक व्हावं म्हणून..

आपण अनलॉक व्हावं म्हणून..

Next

-राही श्रु. ग.

आपण लॉकडाऊनमध्ये आहोत की ‘अनलॉक’ झालोय? हा हिवाळा आहे की पावसाळा? पोस्टट्रथ जगात खरं खोटं कळेनासं होऊन जातं सारं! आता नुकताच प्रजासत्ताक दिन झाला . प्रजेच्या हातात सत्ता आली की लोक ‘नागरिक’ होतात . मग ते देशाचे पालक बनतात. ‘राजा करे सो कायदा’ म्हणत हांजी हांजी करणं सोडून ते जबाबदारी घेतात. प्रेमाने पण कणखरपणे देशाला वाढवण्याची. चुकेल तेव्हा कान पकडण्याची. चूक सुधारण्याचा मार्ग दाखवण्याची. तो धडपडेल तेव्हा त्याला आवश्यक ती अवजारं हाती देण्याची.

… आम्ही असंच समजत होतो इथे लोकशाही होती त्या काळी. जेव्हा भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं, धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि सामाजिक न्याय या मूल्यांचं ‘टुलकिट’ देशद्रोही ठरलं नव्हतं, तेव्हा. मुस्लिम, शीख, लहान, मोठे, शेतकरी, आदिवासी, कलाकार, लेखक अशा सगळ्यांनाही आपण भारतीय नागरिक समजत होतो ना, त्या काळाची गोष्ट आहे. आठवतंय?

एकदा अशीच एकवीस वर्षांची एक मुलगी तिच्या विद्यापीठात पत्रकं वाटत होती. ‘सरकारची ही धोरणं अन्यायकारक आहेत असं दिसतंय. त्या धोरणांचे संभाव्य परिणाम हे असू शकतात. या धोरणांचा शांततापूर्ण विरोध करण्यासाठी नागरिकांनी हे करावं,’ अशा आशयाची ही पत्रकं होती. हुकूमशाहीमध्ये व्यक्तीची, नागरिकाची जागा काय हे शोधायचा ती प्रयत्न करत होती. ही पत्रकं पडली राज्याच्या पोलिसांच्या हाती. सरकारला आणि सरकारातल्या पक्षाला विरोध करणाऱ्यांना थेट संपवून टाकायचं एवढ्या एकमेव अजेंड्यावर पोलीस घर न घर पिंजून काढत होते. तेव्हा ही पत्रकं म्हणजे ‘सरकार उलथवून टाकण्याचा कट’ आहे, हे त्यांनी जाहीर करून टाकलं. देशद्रोहाच्या आरोपावर तिला अटक झाली आणि अवघ्या चार दिवसात तिचा गिलोटीनवर खून करण्यात आला. या मुलीचं नाव आहे सोफी शॉल. नाझी सरकारच्या धोरणांचा शांततामय विरोध करण्यासाठी ‘टुलकिट’ देणाऱ्या एकवीस वर्षांच्या सोफीला १९४३ च्या फेब्रुवारीत गेस्टापोंनी मारून टाकलं. “आम्ही जे लिहिलं आहे, आम्ही जे म्हणतो आहोत तिच भावना आज अनेकांची आहे. एवढंच की प्रत्येक जण ते म्हणायची हिंमत करू शकत नाही…” सोफीने न्यायालयातल्या आपल्या बचावात सांगितलं होतं.

सत्तर साल बाद बाकी जग किती बदललं माहीत नाही, पण माध्यमांची दुनिया कुठच्या कुठे गेली. नव्या सहस्त्रकात तर ‘सोशल मीडिया’ नावाच्या नव्या प्रदेशाने माध्यमांच्या वापरातच क्रांती आणली. ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टा आणि टिकटॉकने हाती स्मार्टफोन असलेल्या प्रत्येकाला या जगाचं नागरिकत्व देऊन टाकलं आणि प्रत्येकजण झाला मीडिया. या क्रांतीने अभिव्यक्तीचं लोकशाहीकरण केलं आणि कितीतरी नवे आवाज तिथे भेटू लागले… पण ही नवी जागा आपल्याला फुकट मिळाली आहे म्हणून आनंद साजरा करता करता अचानक लक्षात आलं, की इथे आपण स्वतःलाच विकतोय की काय! प्रत्येक माणूस बनला डेटा पॉईंटसचा एक रेडिमेड समूह आणि सोशल मीडिया पुरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी अलगद माहितीची ही एकेक खाण फुकट हडप केली. बड्या उद्योगपतींपाठोपाठ नेतेमंडळींनी सट्टे लावले आणि हा प्रदेश झपकन काबीज केला. डोनाल्ड ट्रंप आणि नरेंद्र मोदी हे दोन नेते निवडणूक जिंकले, त्यामध्ये या सोशल मीडियाचा मोठा हात होता. निवडणूक जिंकण्याचं हे टुलकिट एकदा हाती लागलं आणि सत्ताधारी पक्षांनी हत्यारांना धार लावायला सुरूवात केली. पद्धतशीरपणे सोशल मीडियावर ट्रोल आर्मी बांधली. सरकारला प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकाला शिव्या देऊन, धमकावून, हल्ले करणं हेच या आर्मीचं काम होतं.

 

…पण सोशल मीडियाचा हा प्रदेश त्यांच्या केव्हाच हाताबाहेर गेला होता. सत्ता आणि पैसा ओतूनही प्रत्येकाला गप्प करणं अशक्य होऊन बसलं होतं. २०१० मध्ये अरब देशांमधल्या सरकारांच्या दमनकारी वागणुकीविरुद्ध लोकांनी पहिल्यांदा आवाज उठवला तो याच सोशल मीडियावर. चीनच्या दादागिरीविरुद्ध हॉकॉंगमध्ये प्रचंड आंदोलन उभं राहिलं, त्यातही सोशल मीडियाचा मोठा हात होता. सुदानच्या खार्तूममध्ये बावीस वर्षांची आला सलाह हजारोंच्या गर्दीमध्ये कारच्या टपावरून क्रांतीच्या घोषणा देऊ लागली आणि सोशल मीडियावरून जगभरात पोचली. लोकशाही आणि सार्वजनिक स्वातंत्र्यासाठी चाललेल्या सुदानमधल्या आंदोलनाचं प्रतीक होऊन गेलेली आला म्हणाली, “बंदुकीच्या गोळीने नाही, तुमच्या मुकपणानं जीव जातो आहे” आणि देशोदेशीचे नागरिक तिच्या पाठीमागे उभे राहिले. ‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’ म्हणत रस्त्यावर आलेल्या तरूणांनी अमेरिकन पोलिसांच्या क्रूर वागणुकीची, सरकारच्या असंवेदनशीलतेची फिर्याद सोशल मीडियावर मागितली आणि ठिकठिकाणी लोक रस्त्यावर येऊ लागले.

प्रत्येक ठिकाणी सरकारं म्हटली आमच्या ‘अंतर्गत मामल्या’ची अशी चर्चा करायची हिंमत कशी होते या तरूणांची? पण सोशल मीडियावर दोन देशांमधल्या सीमा विरघळून जातात आणि तरूण मनाला बंधनं अडकवू शकत नाहीत. जेव्हा दमन होतं तेव्हा संवाद आणि सर्जक शांततापूर्ण संघर्षाची अवजारं बाहेर निघतात आणि हुकूमशाहीच्या तटबंद्या फोडून तरूण कोरू पाहतात नव्या जगाची शिल्प.

खऱ्याखोट्याच्या पल्याड गेलेल्या स्किझोफ्रेनिक गोंधळात परस्परांवरचं प्रेम आणि सत्यावरचा विश्वास हेच टुलकिट पुन्हा एकदा हाती येतं आणि लवकरच आपण अनलॉक होऊ, खात्री वाटते.

( राही सहाय्यक प्राध्यापक  आहे.)

rahee.ananya@gmail.com

Web Title: To do for unlock ourselves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.