भिजून विरलेलं नातं..
By Admin | Updated: August 1, 2014 11:40 IST2014-08-01T11:40:28+5:302014-08-01T11:40:28+5:30
नेमका दिवस आठवत नाही. पण सकाळपासून रिमझिम सुरू होती. आदल्या दिवशी आमचं कडाक्याचं भांडण झालं होतं. प्रचंड उदास आणि अस्वस्थ होतो.

भिजून विरलेलं नातं..
>नेमका दिवस आठवत नाही. पण सकाळपासून रिमझिम सुरू होती. आदल्या दिवशी आमचं कडाक्याचं भांडण झालं होतं. प्रचंड उदास आणि अस्वस्थ होतो. तिला फोन केला तर तिचीही तशीच गत होती. तिला म्हणलो भेटायचंय तुला ती पण लगेच हो म्हणाली. नेहमीच्या आईस्क्रीम पार्लरवर गेलो. ती आली. पण पार्लर बंद होतं. आमच्यामधील शांतता भयाण. तिला म्हणलो, ‘चल लाँग ड्राइव्हला जाऊ.’ ती पण तयार झाली. तिच्या स्कूटीवर मी पुढे आणि ती मागे. ती माझ्यामागे बरंच अंतर ठेवून बसली होती. ते आमच्या नात्यामध्ये पडत चाललेलं अंतर होतं. फिरताना हळूहळू बोलायला लागलो आणि पावसात भांडण विरघळून गेलं. भर पावसात रस्त्यावर आमचीच गाडी. पेट्रोल संपेपर्यंत खूप फिरलो.
पावसाला त्यावेळी खूप धन्यवाद दिले. आधीच आवडणारा पाऊस त्यावेळी जिगरी दोस्त वाटू लागला. आमच्या नात्याला नवसंजीवनी मिळाली होती.
पण आता परिस्थिती बदलली आहे. त्यानंतर आमचं ब्रेकअप झालंच. त्यालाही आता दोन वर्षं झाली आहेत. ती कुठं आहे मला माहीत नाही. तिच्या आठवणी मी खोलवर पुरून टाकल्या आहेत. पण हा पाऊस आला की त्या आठवणी उफाळून येतात. कधीकाळी जिगरी असलेला पाऊस जानी दुश्मन वाटायला लागतो. पाऊस आला की मनात उदासी भरते. पावसाबरोबर डोळेही अखंड बरसू लागतात. तोंड लपवून मी खूप रडतो.
आता पावसात भिजणं टाळतो. पाऊस आला की दारं-खिडक्या लावून अस्वस्थपणे एकांतात बसून रहातो. पाऊस पडलाच नाही तर बरं असं वाटतं. निदान माझ्या परिसरात तरी त्यानं पडूच नये, अशी भाबडी आशा करतो.
पण पावसात आजही एकच प्रश्न छळतो, या पावसासोबतच तिलाही माझी आठवण येत असेल का?
- किरणकुमार, पुणे