दिलवाले दुल्हनिया आणि सोळावं.
By Admin | Updated: December 11, 2014 20:33 IST2014-12-11T20:33:08+5:302014-12-11T20:33:57+5:30
तुझे देखा तो ये जाना सनम..’ ही डीडीएलजेतील मेंडोलीनवरची फेमस धून वाजली की, राजच्या आठवणीनं कासाविस होत कानावर हात ठेवणार्या सीमरनसारखीच होते,

दिलवाले दुल्हनिया आणि सोळावं.
>मेघना ढोके, meghna.dhoke@lokmat.com -
तुझे देखा तो ये जाना सनम..’ ही डीडीएलजेतील मेंडोलीनवरची फेमस धून वाजली की, राजच्या आठवणीनं कासाविस होत कानावर हात ठेवणार्या सीमरनसारखीच होते, आजही अवस्था.
आजही कानात ती धून वाजते, मोहरीच्या शेतात धावत जाणारी सिमरन दिसते, स्वीस काऊबेल गळ्यात घालून फिरणारी गाय दिसते, आणि दोन्ही हात पसरून सीमरनला सामोरा जाणारा राज आजही डोळ्यासमोर जस्साच्या तस्सा उभा राहतो.
पण म्हणून ‘डीडीएलजे’वाल्या राज आणि सिमरनची ती गोष्ट फक्त त्या दोघांची नाही.
‘घरवाले देखते रह जाऐंगे’ असं कॉन्फिडण्टली म्हणत (त्यांच्या परवानगीनं, बाकीच्यांच्या नाकावर टिच्चून) आपली दुल्हनिया घेऊन राज त्याच्या पॉप्सबरोबर लंडनला निघून गेला, तेव्हा हॅपी एण्डिंग होत धावत्या ट्रेनबरोबर राज-सिमरनची गोष्ट संपली. पण ती तिथं संपली नाही, हेच खरंतर डीडीएलजेचं यश ! कारण त्यांची गोष्ट तेव्हाही फक्त त्यांची नव्हतीच..
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेगे’ असं लांबलचक नाव असणार्या या सिनेमात असं काय आहे की, आज सुमारे १९ वर्षांनंतर त्याच्या आठवणीनं जीव कातर व्हावा. आपलं तरुण होत जाणारं, प्रेमात पडणारं, भांडणारं, स्वप्न पाहणारं मन, पुन्हा त्याच ‘रोमॅण्टिसिझम’नं थुईथुई मोर होत वयाच्या त्याच अर्धउमलत्या अडनिड्या टप्प्यावर निघून जावं.
मला आठवतं, डीडीएलजे रीलिज झाला तेव्हा मी फक्त सोळा वर्षांची होते. दहावीचं र्मयादित शाळकरी माप ओलांडून कॉलेजच्या मस्त खुल्या जगात पाऊल ठेवलं होतं.
दहावीच्या परीक्षेच्या शेवटच्या दिवशी ‘रोजा’ पाहिला होता, दिल है छोटासा छोटीसी आशा म्हणत आसमानो में उडने की, चांद तारोंको छुने के सपने तेव्हाच मनात जागा करू लागले होते. आपल्या देशात काहीतरी अस्वस्थ चाललंय, दहशतवाद आणि दंगलीमुळं सारं बदलतंय हे तेव्हा नुकतंच कळायला लागलं होतं. तसं फार काही कळत नव्हतं, पण बाबरी मशीद पडली, मुंबई पेटली, बॉम्बस्फोट झाले, राज्यात पहिल्यांदा सत्ताबदल झालाय हे सारं पेपरबिपर वाचून कळत होतं.
दरम्यान, घरी टीव्हीही आला होताच.
रोज दुपारी डेलीसोप पाहण्यासाठीच कॉलेजातून घरी धावत यावं लागायचं. शांती आणि स्वाभिमान नावाच्या मालिकांनी वेड लावलं होतं. आणि ते कमीच म्हणून मुंबईतल्या मध्यमवर्गीय घरातला सचिन तेंडुलकर नावाचा एक मुलगा पैसा अािण प्रसिद्धीच्या शिखरांवर चढत आपल्या डोळ्यांदेखत पुढे-पुढे जात होता. ‘अभ्यास करा, इकॉनॉमी खुली होतेय, ग्लोबलायझेशन होतंय, गुणवत्ता नसेल ना तर कुत्रं विचारणार नाही यापुढे’ असं येता-जाता घरातली, मोठी झालेली, बड्या खासगी नोकर्या धरणारी मावसकाके. भावंडं सांगू लागली होती. तसंही त्याकाळी पेपरात रोज कुणाच्या ना कुणाच्या यशाची बातमी यायची. गुणवत्ता असेल तर पैसा आणि प्रसिद्धी लांब नाही, आपण ठरवलं तर आपण काय वाट्टेल ते करू शकतो, असं वयाच्या सोळाव्या वर्षी कॉन्फिडण्टली वाटावं असेच ते दिवस होते. मध्यमवर्गीय सचिन तर ग्रेट होत चालला होताच, पण तिकडे साउथवाला प्रभूदेवा, फक्त २१ वर्षांचा; एका गाण्याच्या कोरिओग्राफीसाठी ५0 लाख रुपये घेतो असं कळत होतं.
विश्वनाथन आनंद कॉस्पॉरोव्हला हरवून जगज्जेता झाला होता. मधु सप्रे अािण मिलिंद सोमणची ती अजगरासह बुटांची जाहिरात वाद घालत होती. पण तरी आम्हा पोरींमध्ये मधु सप्रेच्या डेअरिंगचं जाम अप्रूप होतं. एकूण माहौलच चमत्कारांचा होता. इतका की, त्या चमत्कारात गणपतीबाप्पासुद्धा एक दिवस दूध प्यायला लागला आणि आम्ही मित्रमैत्रिणी मंदिरा-मंदिरांत जाऊन दूधपिता गणपती पाहू लागलो.
लाइफ असं मॅजिकलच असतं, मस्त रोमॅण्टिक असतं असं पक्कं वाटायला लागणारे दिवस आले होते, त्यात ‘हम आपके है कौन’ सारख्या सिनेमांनी तेव्हाच प्रेमळ-सुंदर-प्यारवाल्या जगाचं एक स्वप्न देऊनच टाकलं होतं. तो सिनेमा थिएटरात दहा-दहा वेळा पाहताना वाटत होतं, आपली फॅमिलीपण अशी पाहिजे होती !
..मन असं मॅजिकल, अतिरोमॅण्टिक झालेलं असताना, आपण काय वाट्टेल ते कमवूू शकतो, केअरफ्री जगू शकतो असं ठाम मत बनत असताना, जुनं-कळकट, ‘अंथरूण पाहून पाय पसरा’छाप मध्यमवर्गीय नीतिनियमांचं जगणं बोअर होत असतानाच डीडीएलजे आला ! २४ वर्षांच्या आदित्य चोप्रा नावाच्या एका अबोल मुलाच्या कल्पनेतून जिवंत झाले, राज आणि सिमरन. आणि त्या दोघांनी त्याकाळच्या तरुण मनांना जे सांगितलं, ते पूर्वी कुणी सांगितलंच नसावं इतकं वेगळं होतं. त्या सिनेमात शेवटच्या क्षणी अमरीश पुरी ऊर्फ बलदेव सिंग सिमरनचा घट्ट पकडलेला हात सोडत म्हणतात, ‘जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी’.
ते वाक्य सिमरनसाठी नाही, आपल्याचसाठी आहे, असं त्याकाळी किती जणांना आणि किती जणींना वाटलं होतं.
वाटलं होतं, पळत सुटावं तिच्यासारखं..
आपल्या ‘त्या’ राजसाठी, आपल्या स्वप्नांसाठी,
आपली जिंदगी जगून घेण्यासाठी..
हे जिंदगी जगून घेण्याचं, रोमान्सची सारी गणितंच बदलून टाकण्याचं, जिंदगी जगण्याचे तरीके वेगळेही असू शकतात, त्यासाठी शॉेर्टकट न शोधण्याचं, एक वेगळंच तंत्र राज आणि सिमरननं त्यांच्याही नकळत त्यावेळच्या तरुण मुलामुलींना देऊन टाकलं.
तारुण्याच्या ऐन उंबरठय़ावर उभं असताना भेटलेले हे राज मलहोत्रा आणि सिमरन सिंग म्हणूनच आजही आयुष्यातून वजा होत नाहीत. त्यांची गोष्ट फक्त त्यांची उरत नाही.
त्याकाळच्या, तेव्हा नुकत्या तरुण होत असलेल्या अनेक राज आणि सिमरनची ही गोष्ट आहे.
तेव्हाही होती.आजही आहे.!