हताश टेनिस सम्राट

By Admin | Updated: July 13, 2016 18:55 IST2016-07-13T18:49:00+5:302016-07-13T18:55:14+5:30

आधुनिक टेनिसविश्वाचा तो सम्राट... तब्बल १७ ग्रँडस्लॅम विजेतेपदांची माळ गुंफून त्याने नव्या अध्याय लिहिला...

Desperate Tennis Emperor | हताश टेनिस सम्राट

हताश टेनिस सम्राट

>- रोहित नाईक
आधुनिक टेनिसविश्वाचा तो सम्राट... तब्बल १७ ग्रँडस्लॅम विजेतेपदांची माळ गुंफून त्याने नव्या अध्याय लिहिला... 
मात्र दिवसभर तळपणारा सुर्यही संध्याकाळी मावळतोच, त्याप्रमाणेच या टेनिस सम्राटाचे तेजही मावळायला लागले. इतके की, गेल्या चार वर्षांत या सम्राटाला एकही ग्रँडस्लॅम पटकावता आले नाही...
हा दुदैवी सम्राट म्हणजे स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर.
२००३ साली पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम विजेतेपद म्हणून विम्बल्डन पटकावल्यानंतर प्रत्येक स्पर्धेत फेडररची ओळख जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणूनच होत होती, इतका त्याचा धडाका. विम्बल्डन म्हणजे फेडररचा जणू बालेकिल्लाच. येथे त्याने सलग सलग ५ वर्ष बाजी मारताना एकूण ७ वेळा जेतेपद उंचावले. मात्र २०१२ साली याच जेतेपदासह १७ विजेतेपदांचा ‘ग्रँड’ विक्रम नोंदवल्यानंतर फेडररच्या विजयी रथाला ब्रेक लागला.
सर्बियाचा नोव्हाक जोकोविच, ब्रिटनचा अ‍ॅण्डी मरे या नव्या प्रतिस्पर्ध्यांसह पारंपरिक प्रतिस्पर्धी स्पेनचा राफेल नदाल यांचा एकाचवेळी सामना करावा लागल्याने कधी नव्हे तो फेडररचा कस लागू लागला. त्यात पाठीच्या आणि गुडघ्याच्या दुखापतीने डोके वर काढल्याने त्याच्या खेळावरही मोठा परिणाम झाला. तरीही त्याच्याविरुध्द कोणताही खेळाडू गाफिल राहण्याची चूक करीत नव्हता. खालावलेल्या कामगिरीमुळ अनेकांनी त्याला निवृत्तीचा सल्लाही दिला.
परंतु, स्वत:ची क्षमता पुरेपुर जाणून असल्याने फेडररने कोणालाही थेट उत्तर न देता आपल्या रॅकेटनेच उत्तर दिले. ग्रँडस्लॅम नाही, पण एटीपी जेतेपद पटकावण्याची मालिका त्याने कायम राखली होती. तरीही, ग्रँडस्लॅमची कमतरता त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. नुकताच झालेल्या विम्बल्डनमधील जोकोविच आणि आपलाच देशबांधव स्टॅन वावरिंका यांचा झालेला धक्कादायक पराभव, त्यात नदालने दुखापतीमुळे घेतलेली माघार यामुळे फेडररला विजेतेपदाची सुवर्णसंधी असल्याची सर्वांनाच खात्री होती.
मात्र, पुन्हा एकदा मोक्याच्यावेळी दुखापत उफाळून आली आणि तुलनेत युवा असलेल्या राओनिकच्या वेगवान खेळाची बरोबरी करण्यात अपयशी ठरल्याने फेडररची झोळी चार वर्षांनीही रिकामीच राहिली. आता पुन्हा एकदा त्याच्या निवृत्तीची चर्चा रंगेल आणि फेडरर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल.
 परंतु, लढवय्या असलेला फेडरर निश्चित माघार घेणार नाही. उलट पुन्हा एकदा फिनिक्स भरारी घेऊन आपले सम्राज्य निर्माण करेल अशी खात्री त्याच्या चाहत्यांना आहे. अखेरपर्यंत लढण्याची त्याची वृत्तीच त्याला दिग्गज ठरवते. त्यामुळेच १८ जेतेपदांचा जादुई अंक तो नक्की गाठणार, फक्त गरज आहे ती परफेक्ट टायमिंगची.

Web Title: Desperate Tennis Emperor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.