शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

धपाक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 3:00 AM

आज सकाळीच शाळेत येताना, मी आणि पंकजनं घरून गोधडी शिवायचा दोरा आणि रिकामी आगपेटी आणलीये. ही साधनसामग्री आम्ही समोरच्या डबक्यातील बेडकांना पकडण्यासाठी वापरणार आहोत. पाऊस आला म्हणजे हे करायलाच हवं..

- दीपक पाटीलकाल पाऊस पडला, मातीचा सुगंध आणि सोबतीला कटिंग चहा, खूप नॉस्टॅलॅजिक व्हायला झालं. मराठी शाळेतील पाऊस आठवला...मी वर्गात दाराजवळ बसलोय, बाहेर पाऊस पडतोय... गुरुजी फळ्यावर दोन अंकी वजाबाकी शिकवत आहेत. पावसाचा आवाज सोडला तर शाळेचे संपूर्ण आवार शांत आहे. फक्त ब तुकडीतून मराठीची कविता गाण्याचा आवाज येतोय, बहुतेक वाणीबार्इंचा तास असावा. दारातून बाहेर पाहिले तर पाऊस सारखा कोसळतोय. शाळेचे पटांगण पाण्याच्या डबक्यानी भरलंय.आज सकाळीच शाळेत येताना, मी आणि पंकजनं घरून गोधडी शिवायचा दोरा आणि रिकामी आगपेटी आणलीये. ही साधनसामग्री आम्ही समोरच्या डबक्यातील बेडकांना पकडण्यासाठी वापरणार आहोत. पाऊस जसा जोरात कोसळायला लागला, तसा ब तुकडीतील पोरांचा आवाज अजून वाढायला लागलाय, ‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे...’ सगळे एकाच सुरात गातायत...खरंच, गेल्या आठ दिवसांपासून पाऊस पडतोय आणि एवढ्यातच साक्र ीचे सर्व ग्राउण्ड्स हिरवेगार झालेत. अगदी नदीकाठचा शनि मंदिराचा पार, आमची गल्ली, न्यू इंग्लिश स्कूलकडचा रस्ता, सर्वत्र हिरवळ दिसतेय. या पावसात किती जादू आहे नाही...?मी, आमच्या मागच्या अंगणात फुलांची रोपं लावली आहेत, दोन महिने झाले, दररोज पाणी टाकूनही एवढी वाढली नाहीत आणि पावसाच्या या आठच दिवसात किती हिरवीगार दिसायला लागली आहेत. अगदी हिरवे हिरवेगार गालिचे या कवितेसारखे...धपाक...पाठीवर कसल्यातरी वेदना झाल्यासारखे. मागून कुणाचा तरी ओरडण्याचा आवाज, बघतो तर गुरुजी...! मग, गुरु जींनी सांगितलं... ‘दीपक, उठ पंधराचा पाढा म्हणून दाखव, लक्ष कुठे आहे तुझं..?’आधीच वेदनांनी पाठ दुखत होती, त्यात गुरुजींनी सांगितलेला पाढा, म्हणजे धमकीप्रमाणे वाटत होता. पंधरा एकी पंधरा, पंधरा दुनी तीस, पंधरा त्रिक...पंधरा त्रिक... अंगातील सर्व त्राण गेल्यासारखे वाटलं. मागे वळून बघतो तर सारा वर्ग माझ्याकडे बघतोय... पण, माझी नजर पंकजला शोधत होती. पंकजकडे पाहताच त्याने झटक्यात आपल्या हातातील आगपेटी दप्तरात टाकल्याचा भास झाला.धपाक..पुन्हा पाठीत एक दणका. आई गं ! वर्गात कुजबुज. काहीसा हशा..‘शिकवताना लक्ष बाहेर दारात असतं, मग कसा शिकशील? मोठा झाल्यावर काही बनायचं आहे की नाही?’गुरुजींचा हा प्रश्न सुन्न करून गेला. माझी मान अजूनही खाली, गुरुजी खूप काही-काही बोलत होते, खरं म्हणजे, ते रागवत जास्त आणि बोलत कमी. पण, अजूनही माझं लक्ष दारातच...दूरवर झेंड्यासाठी तयार केलेला खांब, पटांगणाच्या मध्यभागी उभा आहे. त्याचा पायथ्याशी सिमेंटचा ओटा बनवला आहे. त्या ओट्यावर ती बेरकी बेडकं चढतायत, उड्या मारत डराव डराव करत आहेत. काय, हिम्मत यांची? यांना चांगले दोरांनी बांधायला हवं, असं मला कळकळून वाटलं.गुरुजी पुन्हा, ‘अरे लक्ष कुठे आहे तुझं?’एवढ्यात दारावर कुणाची तरी सावली, त्यापाठोपाठ शिपाई, त्याच्या हातात हेडमास्तरांची जाड वही. (दादा त्याला रजिस्टर म्हणतात.. हं तीच ही वही !) म्हणजे नोटीस वाटतं..! गुरु जी नोटीस वाचून दाखवतात... ‘पावसाळा सुरू झाल्यामुळे, शाळेची साफसफाई करण्याचे ठरविले आहे, तरी त्यासाठी या तासानंतर विद्यार्थ्यांकडून सामूहिक श्रमदान अपेक्षित आहे. त्यामुळे ज्यांना कुणाला या श्रमदानासाठी थांबावयाचे असेल त्यांनी थांबावे व शाळेच्या मदतनीस बार्इंना आणि शिपाई काकांना मदत करावी. ज्यांना थांबावयाचे नसेल त्यांनी काहीही गोंधळ न करता निमुटपणे घरी जावे.’ सही - मुख्याध्यापक.अरे वा ! मुलांचा एकच गोंधळ.. तेवढ्यात घंटा वाजते.टन टन टन....गुरुजींच्या बोलण्याकडे लक्ष न देता आणि शिपायाला अगदी दरवाज्यातच अडकवत सगळे बाहेर पळतायेत. ‘शाळा सुटली, पाटी फुटली.. हे.. हा.. हुर्रे हुर्रे..‘पंक्या, थांब आपण शाळेची सफाई करायला थांबू, मजा येईल यार, नदीवर जायला मिळेल, बेडकंपण पकडू’, मी पंक्याच्या पाठीमागे वर्गातून केव्हा बाहेर पडलो हे गुरु जींनाच काय; पण मलाही कळलं नाही.पटांगणातून पळता पळता कुणीतरी मागून पायात पाय घालून च्याट मारली, मी सरळ डबक्यात.‘आयला, सगळे कपडे खराब झालेत यार’,‘दिप्या, तो नक्की ब तुकडीतील अतुल असणार यार’ - पंक्या बोलला.‘माजलेत यार ब तुकडीवाले, दाखवायला पाहिजे त्यांना एकदा’, चंदू येऊन मिळाला. कमरेचा बेल्ट आणि दफ्तरातील पाट्या बाहेर निघाल्या.‘पकड, त्या अतुलला, तो बघ बाजाराकडे पळतोय’, चंदू ओरडला.आम्ही सर्व अतुलच्या मागे...अतुल मात्र तेथून क्षणात सटकला. शेवटी उद्या त्याला सुगडी वाटताना धरायचं असं ठरलं.

आता आम्ही सर्व पटांगणात परतलो, पाऊस आता थोडा कमी झालाय. आमची कौलारू शाळा पावसाने धुऊन निघाली आहे. मागच्याच महिन्यात रम्याच्या दुकानातून शाळेचा बोर्ड नवीन कलर होऊन आला होता. त्यामुळे मस्त दिसत होता.

आयला, त्या दिवसापासून रम्याचा फॉर्म काय वाढला..?

पण, रम्यादेखील त्याच्या वडिलांसारखीच सुंदर चित्र काढतो, त्यामुळे रम्या मला आवडतो. आमच्या ग्रुपमध्ये सर्व असेच आहेत...

पंक्याचं हॉटेल आहे, त्यांच्या हॉटेलात मिसळ लय भारी...! लोणारीच्या वडिलांकडे घोडा आहे. तो ते लग्नांत भाड्याने देतात, लोणारी कधी कधी आम्हाला त्याच्या घोड्यावर बसू देतो. नाझींमच्या अब्बांचे भंगाराचे दुकान आहे. आई मला नेहमी स्टोव्ह रिपेअर करायला तिथे पाठवते, गर्दीत पण आपला नंबर लवकर लागतो. चंदूचे वडील पेरेशपूरच्या शाळेत गुरुजी आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे रंगीत खडू नेहमी असतात. आयला, आपल्या ग्रुपमध्ये सर्व कामाची लोकं आहेत, यूसलेस (ताई, हा शब्द नेहमी वापरते) असं कुणीच नाही.आम्ही सगळे कार्यकर्ते हातात शाळेच्या बादल्या (त्यांच्यावर लाल रंगाचा ठिपका आणि शाळेचे नाव आहे) घेऊन नदीवर निघालो. दुपारच्या शाळेतील काही मुलीपण होत्या बरोबर; पण आपण त्यांना भाव देत नाही. छे ! मुलींशी कोण बोलणार?शेवटी आम्ही सर्व धबधब्याजवळ. सगळे म्हणतात साक्रीचा धबधबा खूप डेंजर आहे. पण, आपण कुठे घाबरतो..? पावसाळ्यात कान नदीला खूप पाणी असतं.‘साक्रीच्या नदीला कान का म्हणतात रे पंक्या? पाय, हाथ, नाक का नाही?’ चंदूचा प्रश्न. पाठीमागून बोरसे गुरु जी येऊन थडकले,

‘अरे लवकर भरा बादली... शाळा धुवायची आहे ना..!’

आम्ही सर्व पाण्यानी भरलेली बादली घेऊन शाळेकडे निघालो. रस्त्याने चालताना बादलीतील पाणी सारख डबकत होतं. आज शाळा साफ करायला खूप मजा येणार होती, पाणी भरून झाल्यानंतर शेण आणायला जायचं होतं. मग वर्ग शेणानी सारवायचे होते. गेल्या वर्षी आमचा शेणानी सरावलेला वर्ग होता. त्यावर बसल्यावर खूप थंड वाटायचं. पण या वर्षी शाळेनी काही वर्गांमध्ये फरशी बसवली, त्यामुळे आता आम्हाला फरशीचा वर्ग मिळाला. पण मला शेणानी सारवलेला वर्गच जास्त आवडतो, काय रे पंक्या? हो न यार... पंक्या क्षणात बोलला.अजून खूप कामं होती. आज वर्ग नाही, पाढे नाहीत. गणित नाही, धडा नाही, की पाठांतर नाही. दिवसभर फक्त पाणीच पाणी. पाऊसच पाऊस...!आम्ही शाळेत पोहचलो, सगळ्यांनी आपआपल्या बादलीतील पाणी, टाकीत टाकलं.माझा नंबर आला आणि मी पुढे सरकलो तर सर्व हसायला लागले... हे सगळे का हसतायेत पेशल करून या शिष्ट मुली...! मला काहीच कळत नव्हतं.तेवढ्यात... धापऽ धपाकऽऽ.पाठीत काहीशा वेदना...गुरु जी ओरडले, ‘दिप्या, सर्व पाणी रस्त्यावर सांडून आला लेका, बादली रिकामीच..!’मी लाजेनं लालेलाल झालो होतो, वर बघायची हिम्मत होत नव्हती. खाली मान घालून माझ्या बादलीकडे बघत होतो. सगळेच मला पाहून हसत होते.तेवढ्यात, माझ्या बादलीतून एका छोट्या बेडकाने, टुणकन उडी मारली आणि तो त्या मोकळ्या हिरव्यागार पटांगणाकडे पळायला लागला...