Join us  

'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 3:37 PM

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका जाहीरातीमध्ये मराठी उमेदवारांना स्थान नाही असं म्हटल्याने मोठा वाद उफाळून आलाय

Viral News : नुकताच राज्यात मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आलाय. १०५ हुताम्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य स्थापन झालं. पण याचं मराठी भाषिकांच्या राज्यात मराठी तरुण तरुणींना नोकरी नाकारली जात असल्याचं धक्कादायक वास्तव पुढे आलंय. मराठी लोकांना इथं स्थान नाही असं एका जाहीरातीमध्ये म्हटल्याने मोठा वाद उफाळून आलाय. शेवटी हे प्रकरण तापल्यानंतर याप्रकरणी माफी मागण्यात आली. मराठी दिग्दर्शक अक्षय इंडीकरनेही हा प्रकार समोर आणत आपला रोष व्यक्त केला.

एका एचआर रिक्रूटरने लिंक्डइनवर पोस्ट केलेल्या नोकरीच्या जाहीरातीमुळे सोशल मीडियावर नाराजी पसरली. गुजरातमधील एका फ्रीलान्स एचआर रिक्रूटरने ग्राफिक डिझायनरच्या भूमिकेसाठी मुंबईत नोकरीची जाहीरात तिच्या लिंक्डइन प्रोफाईलवर शेअर केली होती. पण धक्कादायक बाब म्हणजे या जाहीरातीमध्ये एचआरने "येथे मराठी लोकांचे स्वागत नाही" असे लिहिले होते. या सगळ्या प्रकारामुळे नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला. 

काय म्हटंलय अक्षय इंडीकरने? "मुंबईत मराठी माणूस चालणार नाही हे जाहीर लिहणारी माणसं ? मराठी माणसांना मत मागणाऱ्या सगळ्या पक्षाकडून जबरी दखल घेण्याची अपेक्षा ... तरीही नागरिक म्हणून आपण खपवून घेतोय ? एवढा तिरस्कार ? शेयर करा आणि योग्य ती दखल घ्यायला भाग पाडा," असे अक्षय इंडीकरने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

नेटकऱ्यांनीही कंपनीच्या पक्षपाती नियुक्तीबद्दल टीका केली. मराठी भाषिकांची सर्वाधिक संख्या असलेल्या महाराष्ट्राला नोकरीच्या संधींपासून वगळण्यात येत असल्याकडे काहींनी लक्ष वेधलं. तर मराठी लोकांना भेदभावाचा सामना करावा लागण्याची ही पहिलीच वेळ नाही, असेही म्हटलं आहे. आणखी एका नेटकऱ्याने, मराठी लोकांविरुद्ध भेदभाव.... नोकरीच्या वर्णनात काही लोकांविरुद्ध भेदभाव पाहणे वाईट आहे, हे कायदेशीर आहे का?, असा सवाल केला आहे. दुसऱ्या एका नेटकऱ्याने, मराठी लोक सर्वात जास्त स्वागतार्ह आहेत आणि हे लोक आदरातिथ्याची परतफेड कशी करतात? हा निर्लज्जपणा आहे. कृपया हा भेदभाव थांबवण्यासाठी मदत करा," असं म्हटलं आहे.

दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर संबंधित एचआरने माफी मागितली आहे. "मी खरोखर माफी मागते. काही दिवसांपूर्वी मी ग्राफिक डिझायनर जॉब ओपनिंग पोस्ट पोस्ट केली होती आणि एका आक्षेपार्ह वाक्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. तुम्हाला कळवायचे आहे की मी अशा गोष्टींना समर्थन देत नाही ज्यामध्ये कोणाशीही भेदभाव होईल. हे माझ्या दुर्लक्षामुळे झाले," असे या एचआरने म्हटलं आहे. 

टॅग्स :मुंबईमराठीनोकरीसोशल मीडिया