coronavirus : ‘कोरोना विरुद्ध भारत’ या युद्धात तरुण डॉक्टरांनी नेमकं काय करावं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 19:49 IST2020-04-09T19:40:45+5:302020-04-09T19:49:05+5:30
तरुण डॉक्टर मित्रांनो , संघर्षाचा, आव्हानांचा पूर उसळला आहे, उडी घ्या!

coronavirus : ‘कोरोना विरुद्ध भारत’ या युद्धात तरुण डॉक्टरांनी नेमकं काय करावं?
डॉ. अभय बंग
माझ्या तरुण मित्नांनो,
तुम्ही कोणीही असू शकता, वैद्यकीय विद्यार्थी असाल, इंटर्न असाल, इंटर्नशिप पूर्ण झालेले तरुण डॉक्टर असाल, जे रुग्णालयामध्ये किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रावरती काम करता आहात किंवा ‘नीट’ची तयारी करता आहात, किंवा इतर विषयाचे तुम्ही विद्यार्थी असाल. सोशल वर्कर असाल, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल, कुणीही असाल; गेले तीन महिने तुमच्या समोर, तुमच्या समक्ष एक इतिहास घडतो आहे.
आपण वाचतो की, शंभर वर्षापूर्वी भारतामध्ये 1918 साली स्पॅनिश फ्लूची साथ आली. त्यात दीड कोटी माणसं मेली. आपण वाचतो की, 1945 साली बंगालमध्ये प्रचंड मोठा दुष्काळ आला आणि आकडेवारी तर पुरेशी नाही पण त्यात तीस लक्ष माणसं कुपोषणामुळे, उपवासामुळे मेली.
अशाच प्रकारचा एक इतिहास, कोविड-19 नावाचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर घडतो आहे. एक रोगजंतू निसर्गात पहिल्यांदाच निर्माण होतो काय, त्याचा एक आरएनए व्हायरस म्हणून तो प्रगट होतो, त्याचा रोग तयार होतो, त्याला नाव दिलं आपण कोविड-19; पण सुरुवातीला फक्त काही लक्षणं- ताप, खोकला, न्यूमोनिया.
त्या रोगाची चीनमध्ये साथ काय होते, बघता बघता ती जागतिक साथ काय होते! एखाद्या वादळासारखाहा रोग आणि त्याची साथ जगभर आता पसरली आहे. पूर्वी हे घडायला शंभर र्वष लागायची, जगाच्या एका भागात निर्माण झालेला रोग सर्वत्न पसरायला! आता जणू काय फास्ट फॉरवर्ड मुव्ही जावी तसं तीन-चार महिन्यांच्या काळात, आपल्या डोळ्यांसमोर आपण बघतच राहिलो, बघता बघता आपल्या डोळ्यांसमोर एक पॅनडेमिक घडतं आहे. एक इतिहास घडतो आहे. या घटनाक्र माला अनेक अंग आहेत. म्युटेशनचं अंग आहे. निसर्गात एक म्युटेशन होऊन जुन्या व्हायरसमध्ये बदल होऊन एक नवा व्हायरस निर्माण झाला. याला जेनिटिक्सचं अंग आहे, याला व्हायरॉलॉजीचं अंग आहे. हा एक आरएनए व्हायरस आहे.
याला झुनोसिसचं अंग आहे. मूलत: प्राण्यांमधला असलेला रोग हा माणसांमध्ये आलाच कसा? माणूस आणी प्राण्याचा संपर्ककुठे कुठे होतो? आणि प्राण्यांमधले रोग माणसाला कसे होतात? त्याला झुनोसिस म्हणतात. या एक वैद्यकीय रोगाच्या रूपात हा प्रगट झाला.
चीनमधल्या एका डॉक्टरला असं वाटलं पहिल्यांदा, की हे न्यूमोनिया, जरा जास्त व्हायला लागलेत अचानक. आणि इतरांनी त्याला फक्त न्यूमोनिया मानलं पण तो म्हणाला की, हा काहीतरी वेगळा न्यूमोनिया दिसतोय. त्यातनं त्याला बदनामी, सरकारी रोष भोगावा लागला. आणि हा रोग नव्या व्हायरसमुळे आहे हे माहीत नसल्यामुळे तो स्वत:च त्या रोगाला बळी पडला. त्यालाच तो रोग झाला, त्यात मृत्यू झाला.
पण एक नवा रोग जो पूर्वी नव्हता, त्याची क्लिनिकल रोगचिन्हे काय? या रोगाचे जेव्हा हजार रुग्ण तपासले तेव्हा चीनमधनं प्रकाशित झाला अभ्यास की, किती टक्के लोकांना ताप असतो? किती टक्क्यांना खोकला असतो? किती टक्क्यांना श्वासात त्नास असतो? इतर वेगवेगळी चिन्हे काय असतात? या रोगामध्ये काही सौम्य असतात, काही गंभीर असतात, काही व्हेंटिलेटरवर, अतिगंभीर असतात. काही मरतात. या रोगाला सिरॉलॉजीचं अंग आहे. डायग्नोस्टिक लॅबरोटरीचं, पीसीआर टेस्टचं अंग आहे. या रोगाला याची मेडिकल मॅनेजमेंट कशी करायची याचं अंग आहे. या रोगाचा वैद्यकीय उपचार हा बाह्यरु ग्ण पातळीपासून आयसीयूर्पयत आहे. पूर्ण वैद्यकीय रंगपट आहे.
याला औषधं काय वापरायची? इतिहासात हा रोग पहिल्यांदाच त्यामुळे अजून कोणाला माहीत नाही. त्यामुळे हायड्रॉक्सि क्लोरोक्वीन प्रभावी ठरतं का? एजिथ्रोमायसीन प्रभावी ठरतं का? की अजून काही?
.. कितीतरी शोध घ्यायचा बाकी आहे. या औषधांची परिणामकता कशी तपासायची, मोजायची? अनेक जण दावे करतील, कोणीतर हेही म्हणतील की गोमूत्न आणि गोमलाने हा रोग बरा होतो, आणि चंदन लावलं तरी बरा होतो. तर खरं काय मानायचं?
याची लोकल एपिडेमिऑलॉजी/स्थानिक साथशास्त्न, प्रकट होते आहे. मुंबईच्या धारावीच्या झोपडपट्टीमध्ये तीन केसेस झाल्या. एक छोटं एपिडेमिक तेथे सुरू झालेलं आहे पासून तर निझामुद्दीनमध्ये जी काही प्रार्थनेच्या निमित्ताने हजारो माणसं गोळा झाली. त्यातल्या अनेकांना रोग झाला. गल्लीपासून दिल्लीर्पयत याची एपिडेमिऑलॉजी जागोजागी आकार घेते आहे, घडते आहे. आणि तिथून तर ग्लोबल एपिडेमिऑलॉजीर्पयत घडते आहे.
याचं मॉडेलिंग करता येतं की हा रोग कसा पसरेल, किती लोकांना होईल? याचं संख्याशास्त्न आहे, याचं मॉडेलिंग आहे. व्यक्ती-व्यक्तीचं वागणं याच्यामध्ये किती महत्त्वाचं आहे? माणूस हात स्वच्छ धुतो की नाही? आपल्याला माहिती आहे की हात स्वच्छ धुण्याने हा रोग टळतो. जवळपास दीडशे वर्षापूर्वी सेमेलेवीसने हात स्वच्छ धुतल्याने बाळंतपणातला जंतुदोष व मातामृत्यू कमी होतात, हे शोधून काढलं. त्यानंतर आज अचानक हात स्वच्छ धुणं इतकं महत्त्वाचं होऊन गेलंय.
रोग पसरण्यामध्ये हात न धुण्याचा काय संबंध आणि हात स्वच्छ धुण्यासाठी लोकांची वर्तणूक कशी बदलायची ? याची सवय कशी करायची? स्मरण राहत नाही, त्यासाठी कसं लोकांना प्रेरित करायचं?
याला मानसिक अंग आहे. रोग एवढा पसरलाय त्यापेक्षा शंभर पटीने रोगाची भीती पसरली आहे. हा जसा रोगाचा विषाणू, व्हायरस आहे तसा या भीतीचादेखील जणू काय व्हायरस आहे. या रोगाच्या भीतीमुळे काही लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत.
आपल्या डोळ्यासमोर हा रोग नियंत्रित करण्यासाठी स्थानिक पातळीपासून, राष्ट्रीय पातळीपासून, जागतिक पातळीवरती नेतृत्वाच्या वेगवेगळ्या प्रतिसाद / प्रतिकार पद्धती दिसू लागल्या आहेत. खासगी आणि सरकारी वैद्यकीय क्षेत्र ही परिस्थिती कशी हाताळते, तेही आपल्या नजरेसमोर घडतं आहे. थेट एम्सपासून खाली आशा, आरोग्य सेविकांर्पयत सगळे कामाला लागलेले आहेत. कम्युनिटी कंट्रोल कसा करायचा, नॅशनल कंट्रोल कसा करायचा? ग्लोबल कंट्रोल कसा करायचा, याचं मोजमाप कसं करायचं? किती लोकांना संसर्ग झाले, किती मृत्यू झाले याचं मोजमाप कसं करायचं? याची आर्थिक किंमत काय? रुग्णाला खर्च काय पासून देशाला भरुदड काय पासून जगाला याचा आर्थिक भरुदड काय पडणार आहे?
मानवी स्तरावर तर या रोगाने हाहाकार उडवला आहे, अनेक शोकांतिका समोर येत आहेत. जेव्हा अनपेक्षतिरीत्या लॉकडाउन सुरू झालं तेव्हा दिल्लीचे अनेक मजूर आपापल्या गावी पायी परत निघाले. मुरेना जिल्हा मध्य प्रदेशातला, तिथला एक मजूर पायी निघाला अडतीस वर्षाचा माणूस. परत येता येता शंभर किलोमीटर चालून आल्यानंतर आग्य्राला येईर्पयत अतिशय थकला. घरी फोन करतोय, त्याला छातीत दुखायला लागलं. दम लागला, रस्त्याच्या बाजूला तो पडला आणि शेवटचा फोनवर घरच्या लोकांशी बोलला की, ‘‘लेने आ सकते हो तो आजाओ’’ आणि मग शांतता!
आता आपल्यासमोर ही एक आपत्तीगंगा वाहते आहे. जिज्ञासेने, कुतूहलाने, अभ्यासाच्या अंगाने आपण तिला स्पर्श करू शकतो. सेवेच्या संधीच्या अंगाने स्पर्श करू शकतो. तुमचा प्रतिसाद कसा राहील? गंगा तर आपल्या समोर वाहते आहे. याच्यात तुम्ही उडी घेणार की नाही घेणार?
ही उडी तुम्ही का घ्यायची आहे? ती तुम्हाला काय देईल?
- याबद्दल काही मुद्दे मी स्वतंत्रपणो मांडतो आहे, ते वाचा आणि विचार करा-
खूप वर्षापूर्वी जयप्रकाश नारायणांच्या तोंडून एक अतिशय सुंदर कवितेची ओळ मी ऐकली होती. 1974 मध्ये समाजात बदल करण्यासाठी तरुणांचं प्रचंड मोठं आंदोलन सुरू झालं होतं. बिहारमध्ये- नवनिर्माण आंदोलन! लाखो युवक त्यात भाग घेत होते. त्यावेळी वृद्ध,आजारी जयप्रकाश नारायण यांनी रामधारी सिंह दिनकर यांच्या कवितेची एक ओळ म्हटली. ते म्हणाले -
‘‘तीर पर कैसे रुकूँ मैं, आज लहरों में निमंत्नण!’’
- या लाटा मला बोलावत आहेत, निमंत्नण देत आहेत की, झोकून दे, उडी घे, अशावेळी मी किना:यावर कसा बसून राहू?
तुमच्याकडे तर तुमच्या वैद्यकीय ज्ञानाची एक भक्कम नौका आहे, ती तुम्हाला संरक्षणही देते, सेवा करण्याचं साधनही देते. ती नौका द्या लोटून प्रवाहात आणि म्हणा ‘‘तीर पर कैसे रुकूँ मैं, आज लहरों में निमंत्नण!’’
1.आजचा अभय बंग ज्यातून घडला, त्यातले दोन प्रसंग
मी मेडिकलचा विद्यार्थी असताना माङया जीवनामध्ये काही आव्हानाचे क्षण आले. मी सेकंड एमबीबीएसच्या परीक्षेचा अभ्यास करत होतो. एक महिन्याने माझी परीक्षा होती. वर्ष 1971 आणि अचानक बांग्लादेशचं युद्ध सुरू झालं. एक कोटी बांग्लादेशी भारतामध्ये निर्वासित म्हणून आले. आरोग्य सेवेची प्रचंड गरज निर्माण झाली. नेमकी त्याचवेळी माझी परीक्षा होती सेकंड एमबीबीएस ची. काय करू? मी विचार असा केला, परीक्षा दर सहा महिन्याने येऊ शकते. अशा प्रकारचं भयकारी संकट, ज्यात एक कोटी माणसांना आरोग्य सेवेची गरज आहे, क्वचितच येतं! मी माझा खारीचा वाटा उचलला पाहिजे. शेवटी मी डॉक्टर कशासाठी बनतो आहे? ज्यासाठी डॉक्टर बनतो आहे त्याची गरज प्रत्यक्ष असताना परीक्षेचा अभ्यास करू की ते आव्हान घेऊ?
पुढे मी इंटर्नशिप करत होतो तेव्हाही असाच प्रसंग आला. महाराष्ट्रामध्ये 1972 चा तो भयानक दुष्काळ पडला. मराठवाडय़ामध्ये, ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवेची प्रचंड गरज. दुष्काळी स्थितीमुळे लाखो माणसं प्रभावित झालेली. मेडिकल कॉलेजमध्ये इंटर्नशिप करू की तिकडे जाऊ?
आज मी मागे जेव्हा वळून बघतो तेव्हा मला असं दिसतं की, या दोन्ही कसोटीच्या वेळी, बांग्लादेश युद्धाच्यावेळी मी परीक्षा सोडली आणि मी बांग्लादेशच्या सीमेवरती काम करायला गेलो. काही महिने तिथे काम केलं. बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळामध्ये 1973 साली मी इंटर्नशिपला असताना काम केलं.
- यातून मला काय मिळालं? मी माझं कर्तव्य पूर्ण केल्याचं समाधान! मी डॉक्टर आहे, मी माझा स्वधर्म पूर्ण केला. अशी जी निमंत्नणं आली त्यातनं माझं शिक्षण झालं आणि आजचा अभय बंग त्यातनंच घडला.
अशी आव्हानं जेव्हा उभी ठाकतात तेव्हा आपण त्याला कसा प्रतिसाद देतो याच्यातनं आपण घडत असतो.
2. आज तुम्ही स्वत:ला विचारा माझा स्वधर्म काय आहे?अर्जुनासमोर कुरूक्षेत्नी एक आव्हान आलं. प्रथम त्याला त्यातनं पळवाट काढावीशी वाटली. पण अशा कुरूक्षेत्नावरती आपण आव्हानाला काय प्रतिसाद देतो, आपला स्वधर्म आपण स्वीकारतो की नाही, त्या आव्हानात आपण आपलं कर्तव्य निभावतो की नाही यातूनच माणूस घडत असतो.
तर आता तुमच्या समोर एक इतिहास घडतो आहे. एक विराट आव्हान उभं आहे. तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही वैद्यकीय विद्यार्थी आहात किंवा तरुण डॉक्टर आहात. अशावेळी आपण स्वत:ला विचारावं की मी काय करू शकतो, माझा स्वधर्म काय आहे?
3. इतिहासाचे साक्षीदार होताहात तुम्ही या अनुभवाचं काय करणार?
एक विचार करा- आज जे तुमच्या आजूबाजूला घडते आहे, त्याला तुम्ही किती पद्धतीनी प्रतिसाद देऊ शकाल?
मी वैद्यकीय शास्त्रज्ञ किंवा डॉक्टर म्हणून याचा अभ्यास करू शकतो. हा एक आरएनए व्हायरस आहे, याची व्हायरॉलॉजी कशी? झुनोसिस कसं? याची एपिडेमीआलॉजी काय? कोणत्या सवयीमुळे हा पसरतो? याच्याविषयी प्रचंड माहिती आज निर्माण होते आहे. कोविड-19 नावाच्या कितीतरी वेबसाइट्स आहेत, त्यातल्या काही चांगल्या म्हणजे डब्लूएचओची साइट आहे, सीडीसीची वेबसाइट आहे. जॉन्स हॉपिकन्सची वेबसाइट आहे, लँनसेटची वेबसाइट आहे, न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसनची वेबसाइट आहे, आणि दि इकॉनॉमिस्टची वेबसाइट आहे. या काही पाच-सहा वेबसाइट ज्या मी मध्ये मध्ये बघतो.
मेडिकल शास्त्न आपल्या डोळ्यासमोर आकार घेतंय. याचा अंतिम शब्द अजून लिहिला गेलेलाच नाहीये आणि वैज्ञानिक अभ्यास करत आहेत, ते सात दिवसांमध्ये प्रकाशित होतंय आणि आपण ते वाचू शकतो. म्हणजे आपण टेक्स्टबुकच्या कितीतरी पुढे राहू शकतो. टेक्स्टबुकांमध्ये हे दोन वर्षानी येणार आहे. ते आपल्या डोळ्यासमोर ज्ञान घडतंय, त्याचा आपण अभ्यास करू शकतो.
4. दोन क्षेत्रं तुमच्यासाठी खुली झाली आहेत घरात आणि घराबाहेर
तुम्हाला काय काय करता येईल?
आपलं कुटुंब, आपलं घर ही आपलीएक छोटीशी लॅबोरेटरी आहे. आपल्या कुटुंबात कितीवेळा आपला एकमेकांशी संपर्कयेतो? किती वेळा आपण हात धुतो? खोकला आला तर आपण काय करतो? ही निरीक्षणं करता येतील. आणि आपल्याच कुटुंबातील लोकांचं वागणं, सवयी कशा बदलता येतील, कुटुंबातील लोकांना सुरक्षित कसं करता येईल?- हे पाहू शकतो.
तुमच्या घराबाहेरही एक प्रयोगशाळा आहे. तिचा विचार करा.
जिथे मी राहतो त्या कम्युनिटीत काय घडतं आहे? ते एक अपार्टमेंट कॉम्प्लेक्स असेल, एक गल्ली असेल, एक मोहल्ला असेल, गाव असेल, विद्यार्थी असाल तर होस्टेल असेल. एक ती छोटी कम्युनिटी आहे. शक्य आहे, दोनशे पाचशे माणसं तिथे राहत असतील. त्या स्थानिक जागी मी वैद्यकीय विद्यार्थी म्हणून काय करू शकतो? किती लोकांना ताप, खोकल्याची साथ सुरू होते किंवा किती लोकांना गंभीर रोग होतात याचं मोजमाप करणारी व्यवस्था सुरू करू शकतो. लोकांचं आरोग्य शिक्षण करू शकतो. रोगाचं स्वरूप कसं आहे हे सांगून लोकांची भीती कमी करू शकतो. लोकांचं वर्तन बदलवण्याचा प्रयत्न करू शकतो. ज्यांना साधा ताप खोकला असेल त्यांना पॅरासिटामॉल देऊ शकतो. धीर देऊ शकतो. लोकांना क्वॉरण्टाइन करू शकतो. ज्यांना श्वासाचा त्नास होत असेल, त्यांना मी हॉस्पिटलला रेफर करू शकतो.
5. तुम्ही ‘मेडिकल सोल्जर’ बनू शकता का?
युद्धात सैनिक हवे आहेत तुम्ही असा विचार का नाही करून पाहात?-
मी जर हॉस्पिटलमध्ये काम करत असेन, इंटर्न आहे, रेसिडेन्ट आहे, मेडिकल स्टुडंट आहे तर मी तिथे हॉस्पिटलमध्ये स्वयंसेवक म्हणून स्वत:चा वेळ देऊ शकतो. या कोरोना साथीमुळे प्रचंड प्रमाणामध्ये लोकांना गंभीर न्यूमोनिया आणि अन्य आजार होतील. अमेरिकेसारख्या समृद्ध देशामध्येसुद्धा हॉस्पिटल अपुरे पडत आहेत. त्यांनी चौकामध्ये तंबू उभारून तिथे मेडिकल ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली आहे. अमेरिकेत हे आहे तर भारतामध्ये काय स्थिती होईल जिथे अगोदरच वैद्यकीय सेवा फार कमी आहेत, तर अशावेळी ज्यांना थोडंबहुत वैद्यकीय ज्ञान आहे आणि कौशल्य आहे अशा लोकांची खूप मोठय़ा प्रमाणात गरज पडेल. अशावेळी मेडिकल विद्यार्थी, तरुण डॉक्टर, नर्सेस, इंटर्न्स, रेसिडेन्ट्स हे सगळे आपण आपला वेळ, आपल्या सेवा देऊ शकतो. आपण मेडिकल सोल्जर बनू शकतो.
साथ पसरते आहे, पसरणार आहे. साथ नियंत्नण कसं करायचं? जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तुमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये साथ नियंत्नणाचा प्रयत्न सुरू आहे. जिथे स्थानिक साथीनिर्माण होत आहेत त्यांना कसा आळा घालता येईल? गडचिरोलीच्या जिल्हा आरोग्य अधिका:यांशी मी बोललो त्यावेळी ते म्हणाले, आम्हाला खूप मोठय़ा प्रमाणात डॉक्टरांची गरज आहे. गावोगावी आम्ही जे करतो आहोत, आशा, एएनएम हे प्रयत्न करताहेत; त्यांना मेडिकल सुपरव्हिजनची गरज आहे, मदतीची गरज आहे.. तुम्ही तुमच्या जिल्ह्यातल्या आरोग्य यंत्रणोसोबत काम करू शकता. ‘‘सर्च’’ सारख्या स्वयंसेवी संस्था ज्यांचं हॉस्पिटलही आहे आणि एक लक्ष लोकसंख्येमध्ये, दीडशे गावांमध्ये, कम्युनिटीमध्ये काम आहे. कोरोना साथीच्या नियंत्नणासाठी आम्ही इथे कार्यक्र म सुरू केले आहेत. सर्च आणि सर्चसारख्या अन्य संस्थांबरोबर तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करू शकता.
6. टीका होईल, उपहास वाटय़ाला येईल, तरीही उत्साह पुरून उरला पाहिजे!
हे काम करायला टाइमलाइन काय असू शकते? एक आठवडा असू शकतो, एक महिना असू शकतो. तीन महिने असू शकतात. कोरोनाची साथ किमान तीन महिने चालणार आहे. दुसरी लाट येईल, किमान बारा महिने तरी हा रोग राहणार आहे. तुमची तयारी, तुमच्या जीवनातली स्टेज बघून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला किती वेळ या कामासाठी द्यायचा आहे.
यात काही धोकेही आहेत, ते समजून घ्या.
पहिली गोष्ट, तुमचा वेळ त्यात जाणार आहे आयुष्याचा. ‘या वेळेचा तुम्ही कितीतरी अधिक चांगला उपयोग करू शकता’ असा उपदेश करणारे तुम्हाला हजार लोक भेटतील. म्हातारे कोतारे तर नक्कीच सांगतील की चला आपल्या परीक्षांची तयारी करा, आपल्या करिअरचा विचार करा. तर उपदेश करणारे, उपहास करणारे खूप भेटतील. निरूत्साही करणारे खूप भेटतील. तुमचा उत्साह त्यांना पुरून उरला पाहिजे. जीवनाची परीक्षा देण्याची ही वेळ आहे. त्यामुळे त्या आधारावर तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे.
7.कामाला उतरलात, तर संसर्गाचा धोका असणार हा धोका तुम्ही पत्करणार की नाही?
तुम्ही गावांमध्ये काम करायला गेलात, मोहल्ल्यामध्ये काम करायला गेलात तर असं समजू नका की, हार तुरे मिळतील! लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, तुमचा उपहास करतील, तुमच्याशी असहकार करतील, लोक ऐकणार नाहीत पासून तर लोक शिव्याही देतील. या सगळ्या प्रकारच्या अनुभवांसाठी तुमची तयारी पाहिजे. इट्स पार्ट ऑफ द गेम. मेडिकल रिस्क आहे. जो यामध्ये काम करेल, वैद्यकीय सेवेसाठी, हॉस्पिटलमध्ये त्याला काही संसर्गाचा धोका नक्कीच आहे. मेडिकल काम करणा:या फोर्सला, आरोग्य सेवकांना सामान्य जनतेपेक्षा संसर्गाचा धोका जास्त आहे. हा धोका घ्यायचा की नाही घ्यायचा? युद्धावर जाणा:या सैनिकाने जखमी व्हायचा धोका पत्करायचा? की नाही पत्करायचा? की युद्धावरच्या सैनिकाने सीमेवर गेल्यावर म्हणायचं की ‘नाही नाही मी असा धोका घेऊ शकत नाही, मी परत जातो’. आपण युद्धावरचे सैनिक आहोत. यावेळी तर आपल्याला युद्धात उतरलं पाहिजे. सुदैवाने तुम्ही तरुण आहात. तरुणांना संसर्ग झाला, तरी मृत्यूचा धोका अतिशय कमी आहे. बहुतेक मृत्यू हे साठ वर्षावरच्या वयोगटातले आहेत. त्यामुळे धोका तुम्हाला फार कमी आहे, पण आहे. सो टेक केअर अँड टेक रिस्क. यातच जीवनाची मजा आहे. फेसबुक में क्या रख्खा है दोस्त, जिंदगी तो बाहर घटीत हो रही है!
8. मला याच्यातून काय मिळेल? - यातून तुम्ही ‘घडाल’!
आता शेवटचा प्रश्न - मला याच्यातनं काय मिळेल? तर मी म्हणोन वन्स इन अ लाइफ टाइम अशी ही संधी आहे तुम्हाला, पुन्हा आयुष्यात अशी संधी नाही येणार. तुम्हाला अनुभव मिळेल. या शोधातनं, या कामातनं तुम्हाला ज्ञान मिळेल. सगळ्यात मोठं म्हणजे तुम्हाला समाधान मिळेल की, मी माझं कर्तव्य पूर्ण केलं. यासाठीच तर मी डॉक्टर होतो आहे. फक्त तिजोरी भरून ठेवायला किंवा फिक्स डिपॉङिाटमध्ये आणखी पैसे टाकायला मी डॉक्टर होत नाही आहे. फ्रीजमध्ये टाकायला मी फ्रोजन डॉक्टर होत नाही आहे. आज ही संधी आहे, आज हे युद्ध उभं राहिलेलं आहे त्याला मेडिकल सैनिक म्हणून मी प्रतिसाद दिला याचं समाधान मिळेल. तुम्ही घडाल, तुमचं व्यक्तिमत्त्व घडेल, तुमचं कर्तृत्व घडेल, तुमची लीडरशिप घडेल, तुमचं चारित्र्य घडेल. यातनं तुम्ही घडाल; आणि तीस वर्षानी-चाळीस वर्षानी जेव्हा मागे वळून बघाल तेव्हा म्हणाल की, हो तेव्हा मी हे आव्हान घेतलं म्हणून मी घडलो.
(लेखक जेष्ठ समाजसेवक, सर्च संस्थेचे संस्थापक आणि पब्लिक हेल्थ अभ्यासक आहे )