coronavirus: आसाममध्ये मराठी पुढाकाराने चालतेय मानसोपचार हेल्पलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 18:22 IST2020-04-09T18:06:56+5:302020-04-09T18:22:20+5:30
आसाम आणि अरुणाचलमध्ये मानसिक आरोग्यासाठी काम करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञाला दिसणाऱ्या मानसिक आजारांच्या साथीविषयी.

coronavirus: आसाममध्ये मराठी पुढाकाराने चालतेय मानसोपचार हेल्पलाईन
-डॉ. नीलेश मोहिते
25 तारखेच्या सकाळी पाच वाजताच आसामच्या एका दुर्गम भागातील आरोग्य सेवकाचा फोन आला.
तो सांगत होता, चाळीस वर्षाची स्त्री रात्रीपासून खूप आरडाओरडा करतेय. विचित्र वागतेय.
त्याच रात्री आठ वाजता पंतप्रधान मोदींनी देशभरात लॉकडाउन जाहीर केलं होतं.
आणि त्यानंतर एकदम या बाई तोल गेल्यासारख्या वागत होत्या. पूर्वी मानसिक आजाराची कोणतीही पाश्र्वभूमी नसताना हा त्रस अचानक सुरू झाला होता.
दुपारी दुस:या जिल्ह्यातून अजून एक फोन आला.
गावातल्या एका कुटुंबाला कोरोनाच्या भीतीने लोकांनी गावाबाहेर काढलं म्हणून कुटुंबातील तरु ण मुलानं आत्महत्येचा प्रयत्न केला.
कोरोना झाला आहे या भीतीने अरु णाचल प्रदेशमधल्या एका सरकारी अधिकारी महिलेने आत्महत्या केली.
एक वीस वर्षाचा तरु ण हृदयविकाराचा झटका येऊन हे जग सोडून गेला. आपल्याला कोरोना झाला आहे या भीतीने त्याला ग्रासलं होतं.
गेल्या पंधरा दिवसांपासून अनेक अशा घटना कानांवर रोजच येत आहेत.
कोरानापेक्षा भीतीमुळे त्रस होणा:या लोकांची संख्या प्रचंड मोठी आहे.
कोरोना हे संसर्गजन्य रोगाचं जागतिक संकट तर आहेच पण त्याचबरोबर ते प्रचंड मोठं मानसिक संकटसुद्धा आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे की कोरोनाच्या महामारीसोबतच ‘इन्फोडेमिक’ सुद्धा आहे.
या नव्या आजाराबद्दल पसरलेल्या चुकीच्या माहितीमुळे जगभर प्रचंड नुकसान होत आहे.
विषाणू पसरायला काही मर्यादा असतात पण चुकीची माहिती पसरायला कोणतीच मर्यादा नसते.
काही दिवसांपासून ह्या आजाराला धार्मिक आणि जातीय स्वरूप देऊन समाजामध्ये दुही निर्माण होईल अशा गोष्टीही सोशल मीडियात व्हायरल झाल्या.
काही दिवसांपासून सोशल मीडियावरती इशान्येकडील तरु णांचे बरेच व्हिडीओ व्हायरल झालेले आहेत.
इतर राज्यांमध्ये होणा:या भेदभावाबद्दल ही तरुण आपली व्यथा मांडत आहेत.
‘तुम चिनी हो और तुम लोगोने कोरोना फैलाया है आप चले जाओ’असं या तरु णांना ब:याच वेळा सांगण्यात आलं. स्वत:च्या देशात अशी अवहेलना सहन करावी लागल्यामुळे हे तरु ण प्रचंड अस्वस्थ आहेत.
जैवविविधतेने नटलेल्या अतिशय सुंदर ईशान्य भारताला शापित अप्सरा ही उपमा चपखल बसते.
सर्व केंद्र सरकारांकडून झालेल दुर्लक्ष, दुर्गम भाग, शिक्षणाचा अभाव, सतत येणारे पूर, दहशतवाद, बांगलादेशी घुसखोरांची समस्या, आसाममधील एनआरसी अशा अनेक प्रश्नांमुळे हा भाग भारताच्या इतर राज्यांपेक्षा नेहमीच मागे राहिला.
त्यात आता हे संकट.
त्यामुळे याभागात अनेक तरुणांमध्ये काही लक्षणं विशेष करून दिसू लागली आहेत.
झोप न येणं, सतत मरणाचा विचार मनात येणं, भूक न लागणं, चिडचिड होणं, लक्ष न लागणं, सतत उदास वाटणं अशी बरीच मानसिक आजाराची लक्षणं दिसून येत आहेत. ताण सहन न झाल्यामुळे काही लोकांनी आत्महत्येचा प्रयत्नसुद्धा केला आहे.
जे लोक आधीपासून मानसिक रुग्ण आहेत त्यांची अवस्था तर प्रचंड वाईट आहे.
ब:याच लोकांना त्यांचे नियमित औषध घेण्यामध्ये समस्या येऊ लागल्यामुळे त्यांचे मानसिक आजार बळावत आहेत.
आपल्या देशांमध्ये मानसिक आरोग्याला नेहमीच दुय्यम महत्त्व देण्यात आलेले आहे त्यामुळे या समस्या सोडवण्यासाठी लागणार पुरेसं मनुष्यबळ आपल्याकडे उपलब्ध नाही. एकाच वेळी समाजातील अनेक लोकांमध्ये या मानसिक समस्या निर्माण झाल्यामुळे याला मानसिक आरोग्याची महामारी म्हणता येऊ शकतं. त्यामुळे यासंदर्भात काम करायचं ठरवलं.
येत्या काही महिन्यांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होऊ शकते. सध्याची जटिल समस्या ही कम्युनिटी मेंटल हेल्थ क्र ायसिस असल्यामुळे आपल्याला विविध सामाजिक पातळ्यांवर मेहनत घ्यावी लागेल. समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन आपल्याला यामधून मार्ग काढावा लागेल. वैज्ञानिक दृष्टिकोन, संविधानिक मार्ग, विवेकवादी विचारधारा, समता आणि सामाजिक एकता या महत्त्वाच्या गोष्टींना एकत्र घेऊनच आपण जटिल कम्युनिटी मेंटल हेल्थ क्र ायसिसवर उपाय शोधू शकतो.
संपूर्ण जगाला हादरवून सोडणारा हा आजार आपल्या आयुष्याचे दोन भाग करणार आहे. कोरोनापूर्वीचे दिवस आणि कोरोनानंतरचे दिवस.
प्रचंड वेगाने आपल्या समोर इतिहास लिहिला जात आहे. या इतिहासामध्ये तरु णांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. म्हणून आपल्या शारीरिक आरोग्यासह मनाचीही काळजी घ्या.
मनोबल वाढवा.
आपण सारे सोबत आहोत, बोलत राहू..
आसाम आणि अरुणाचल प्रदेशात मनोबल हेल्पलाइन
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या परिवर्तन संस्थेमार्फत आरोग्याच्या विविध समस्यांवर गेल्या नऊ वर्षांपासून आसाम आणि अरु णाचल प्रदेश मध्ये काम केलं जातं.
अतिशय दुर्गम भागांमध्ये संस्थेमार्फत मानसिक आरोग्याच्या सुविधा पुरवल्या जातात. सद्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी संस्थेने ‘मनोबल’ नावाची हेल्पलाइनसुद्धा सुरू केली आहे.
ब:याच वेळा गावातील लोकांना हेल्पलाइन ला फोन करून आपल्या समस्या मांडण्यामध्ये संकोच आणि भीती वाटते म्हणून संस्थेने समाजातील इतर घटकांना, तरु णांना हेल्पलाइनशी जोडून घेतले आहे. हे तरु ण स्वत:हून आपल्या ओळखीतल्या, गावातल्या, नात्यतल्या लोकांना स्वत:हून फोन करून मानसिक आरोग्याबद्दल विचारपूस करतात.
ज्या लोकांच्या समस्या गंभीर आहेत त्यांना डॉक्टरमार्फत औषधोपचार केले जातात. अफवांना बळी पडून सामाजिक सलोखा धोक्यात येऊ नये यासाठी संस्था काम करत आहे. संस्थेचे समुपदेशक दिलीप गावकर, भगवान दास, पूर्णा पावे, अलिफा हे रात्रंदिवस मेहनत करून लोकांच्या विविध प्रश्नांना उत्तरं देण्याचे प्रयत्न करत आहेत.
(लेखक मानसोपचार तज्ज्ञ असून आसाम आणि अरुणाचलमध्ये कम्युनिटी सायकॅट्रिस्ट म्हणून काम करीत दुर्गम भागात
मानसिक आरोग्य सुविधा पुरवितात.)