गावाकडच्या पोरांच्या स्वप्नाचं कोरोना काय करेल ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 14:04 IST2020-05-14T13:53:26+5:302020-05-14T14:04:48+5:30

स्वप्नांची  ओझी होऊन धावणारे तरुण आणि आपल्या लेकरांना तरी सावलीत नोकरी मिळेल म्हणून राबणारे कष्टकरी आईबाप यांना नव्या परीक्षेला कोरोनाने बसवलं. आणि स्पर्धा परीक्षा भलतीच सुरूझाली !

coronavirus lockdown- rural youth & their dreams at stake. | गावाकडच्या पोरांच्या स्वप्नाचं कोरोना काय करेल ?

गावाकडच्या पोरांच्या स्वप्नाचं कोरोना काय करेल ?

ठळक मुद्देया परीक्षेत कोण पास होणार?

गणेश  पोकळे

आपणही धावत असतोच दैनंदिन व्यवहार आणि स्वप्नांच्या पिशव्यांसह अपेक्षांचे ओझे  घेऊन..
त्यातलेच काही स्पर्धा परीक्षा देतात. अधिकारी होण्याचं स्वप्न घेऊन गावखेडय़ांतून मुलं लाखोंच्या संख्येने शहरात येतात. तशी ती पुण्यात आली होती. शहरही या तरुणांच्या संख्येनं गजबजून गेली होती..
मात्न, कोरोनाची साथ आली आणि ही शहरं एका फटक्यात रीती झाली..
मार्च महिन्याच्या सुरु वातीला कोरोनाची पुणो शहरात मोठय़ा प्रमाणात चर्चा सुरू झाली होती. इथं स्पर्धा परीक्षावाले तरुण तर त्यांच्या वेगानं चालत होतेच.
तिथंच या कोरोनानं पहिला घाव घातला. सगळं बंद होणार, काय खाणार, गर्दीच्या लहान खोल्यांत कसं राहणार म्हणत या तरु णांनी गावाकडं जाण्याची चर्चा सुरू केली. मात्न, गावाकडं जायचंय ही चर्चा सुरू होतीये की नाही तोर्पयतच दोन-चार रुग्ण पुण्यात सापडले, अशी बातमी आदळली. गावाकडं जाणा:यांची बसस्थानकावर रोजच रांग लागू लागली. त्यातच टाळेबंदी जाहीर झाली. हा सगळा घटनाक्रम इतक्या वेगात घडला की, गावात पाणी शिरलंय ही गोष्ट कानावर पडेर्पयत गाव पाण्याखाली गेलाही...
हे असं अचानक घडल्यानं कित्येकांची  धावपळ झाली. येत्या आठ-दहा दिवसांत गावकडून येऊ म्हणून कुणी नुसतेच कपडय़ांची बॅग घेऊन गावी गेलंय, कुणी दहा-पंधरा दिवसांत येऊ म्हणून दोन पुस्तक सोबत घेऊन गेलंय, कुणी दोनच दिवसात येऊ म्हणून पुस्तक सोडा पुरते कपडेही घेऊन गेलं नाही. आणि काही गेलेच नाही. बहुतांश लोकांना जाताही आलं नाही. गावी गेलेल्यांचे सुरु वातीचे 10 दिवस मजेत गेले. मात्न, आता इतका मोकळा वेळ असतानाही हाती एकही पुस्तक नाही हे जरा कठीण चाललंय. सगळे गावी गेलेले असताना आपल्या पलीकडल्या गल्लीत काही करोना रु ग्ण सापडलेत म्हणून शहरात गुंतलेले समोर पुस्तकांची थप्पी पडलीये; पण त्याच्याकडे पाहायला तयार नाहीत.
 काहींना रोजच उठून 9 वाजता अभ्यासिकेत जाण्याची सवय होती, तीच आता रोज उठलेकी त्नास देतीये.  एकीकडे गावी आलेल्या तरुणांची कित्येक दिवस शहरात राहायला गेल्याने ती अंग मोडून शेतात राबायची सवयही मोडून गेलीये. असा दुहेरी पेच निर्माण झालेला तरुण आज मोठय़ा प्रमाणात अस्वस्थ आहे. त्यातही ही अस्वस्थता वाढवणारी बाब म्हणजे आत्ता कुठेतरी काहीतरी हाती लागेल असे वाटत असतानाच या कोरोना संकटाने सगळंच हिसकावून घेतलंय असं वाटणारी आहे. या अस्वस्थतेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यासह कित्येक क्षेत्नातले कित्येक लोक आहेत..
 इथल्या स्थलांतरित शहरवासीयांच्या कित्येक मुक्या झालेल्या इमारती या तरुण-तरुणींनी किरायाने घेऊन बोलायला लावल्यात, इथे जेमतेम पगारात नोकरी करणा:या आणि परवडत नसले तरी किरायाच्या घरात राहणा:या कित्येक लोकांना स्वत:चे घर घेण्याइतकी परिस्थिती निर्माण केलीये या मुलांनी त्यांच्याकडे मेस लावून !  इतकंच नाही तर प्राध्यापक, किंवा मोठे-मोठे अधिकारी होऊ शकले असते आणि प्रचंड प्रतिष्ठा तसेच पैसे कमावले असते याच्यापेक्षा कित्येक गुना जास्त या मुलांच्या शिकवणीवर या लोकांनी प्रतिष्ठा आणि पैसा मिळवलाय. मात्न, आज हे सगळंच थंडावलंय किंबहुना थांबलंय. आणि त्याचाच मोठा धोका वाटतोय विशेषत: या तरु णांना. आज मागे वळून पाहिले तर कुणी चार वर्षे झालं, कुणी आठ वर्षे झालं तर कुणी तब्बल दहा-बारा वर्षापासून या स्पर्धा परीक्षांची तयारी करतायेत. आपल्या स्वप्नांशी झुंजतायेत. त्या सगळ्या परिश्रमाचा एक परीघ पूर्ण होत आलेला असतानाच कोरोना संकटाने घाव घातला आणि पुन्हा अनिश्चिततेला अनिश्चित वर्तुळात नेऊन ठेवले..


अर्थात आता हे कोरोनाचं निमित्त आहे; पण कोणत्याही काळात, कोणत्या ना कोणत्या पिढीत या गोष्टींना तरुणांना  जावंच लागतं.
हा काळ आजच्या तारुण्याची परीक्षा पाहतो आहे.
आज कुणी नोकरी मिळण्याच्या उंबरठय़ावर उभे आहेत..
कुणी कुठल्या चांगल्या दर्जाच्या संस्थेत प्रवेश मिळेल म्हणून वाट पाहत अभ्यास करत आहेत.
आपल्या पिढय़ान्पिढय़ा काबाड कष्टात गेल्या आता आपल्या लेकरांना काहीतरी सावलीतलं काम मिळावं म्हणून राबणाऱ्या  कित्येक कष्टकऱ्याच्या, कामगारांच्या आणि त्यांच्या लेकरांच्या आयुष्यात नव्या अडचणी परीक्षा पहायला येऊन उभ्या राहिल्या आहेत..
त्यापैकी काहींनी कायमचा वेदनादायी परतीचा प्रवासी सुरूकेला आहे.
हा काळ फार काळ राहणार नाही, जाईल निघून; पण परीक्षा तर कठोर पाहतो आहे.
म्हणून सांगत राहायचं स्वत:ला, हा थांबा शेवट नाही विसावा आहे..


(गणेश  मुक्त पत्रकार आहे.)

Web Title: coronavirus lockdown- rural youth & their dreams at stake.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.