बैठे बैठे बोअर हुए ? मग घ्या जुन्यातून नवी डिझायनर साडी बनवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 16:49 IST2020-04-02T16:38:25+5:302020-04-02T16:49:29+5:30
जुन्या साडय़ा काढा; त्यातलं चांगलं जे आहे, ते मस्त जोडा. मोकाट सोडा कल्पनाशक्तीला मग बघा, खास डिझायनर साडी तुम्हाला घरच्या घरी बनवता येईल!

बैठे बैठे बोअर हुए ? मग घ्या जुन्यातून नवी डिझायनर साडी बनवा!
सारिका पूरकर-गुजराथी
आता आपल्याला घरातच चोवीस तास राहायचं असलं तरी आपली कल्पनाशक्ती तर कुठंही भटकायला जाऊच शकते. मग तिला जरा मोकाट सोडू आणि आपण घरात बैठक मारून बसू! आणि शाळेत शिकलेलो आणि यू-टय़ूबवर ढिगानं असलेलं बेस्ट आउट ऑफ वेस्टची कला जरा कामाला लावू! बाकी टेन्शन नि व्हॉट्सअॅप ठेवू बाजूला. आणि घरातली फडताळं, कपाटं जरा धुंडाळू. बघा एखादी कित्येक वर्षात न नेसलेली, आजीची-आईची-वहिनीची साडी मिळतेय का? अजूनही काही सापडेल, त्यांच्याशी गोड बोलून जरा ते तेवढं ताब्यात घ्या, आणि लागा कामाला. घरच्या घरी डिझायनर साडी तयार करण्याची एक भारी आयडिया लढवू. हे लॉकडाउन संपलं की पुढच्या पार्टीसाठी आपली डिझायनर साडी रेडी! तर हे करून तर पाहा.
1) तुमच्याकडे काही हातमागाच्या, ट्रेंडी, पारंपरिक साडय़ा असतील तर त्या साडय़ांच्या बॉर्डर्स कापून घ्या. या बॉर्डर्स वारली पेंटिंगच्या असू शकतात, कलमकारी, काथा वर्कच्या असू शकतात. या बार्डर्स तुम्ही तुमच्या एखाद्या जुन्या साडीच्या पदराला लावून घ्या. सॉफिस्टिकेटेड पण तरीही नवीन लूक साडीला मिळेल.
2) बनारसी, मोठय़ा काठाच्या, ब्रोकेडच्या साडय़ांचा ट्रेण्ड आत्ता जरी इन असला तरी तुमच्या जुन्या साडय़ांचे डिझाइन जुने झाल्यामुळे तुम्ही त्या कोप:यात ठेवल्या असणार, याची खात्री आहे. त्या साडय़ांचे काठ, बॉर्डर्स मात्र अजूनही तुमच्या उपयोगी पडू शकतात. या बॉर्डर्स काढून एखाद्या प्लेन, बोअरिंग वाटणा:या साडीला लावा. नाही साडीला चार चाँद लागले तर काय?
3) असं बरेचदा होतं, एखाद्या साडीवर लग्नसमारंभात किंवा घरी अनावधनाने भाजी, काही रंग, तेल पडून ती डॅमेज होते. प्रयत्न करूनही ती रिपेअर होत नाही. मग, म्हणून खट्ट व्हायला होतं; पण आता अशी साडी मिक्स अॅण्ड मॅच करून नव्याने नेसायची वेळ आलीय. साडीचा जो भाग डॅमेज्ड झालाय तो काढून टाका. आता आणखी एक जुनी साडी घ्या. दोन साडय़ांचे मिक्सिंग करताना रंगसंगती, साडीचे पोत याकडे लक्ष द्या. शिफॉन आणि कॉटन मिक्स कराल तर ते चांगले दिसणार नाही. पोताबरोबरच साडीचे डिझाइन, बॉर्डर्सही बघून घ्या. साडीचे दोन रंग वेगळे असतील तरच ही साडी छान दिसते. म्हणून रंग निवडताना विशेष काळजी घ्या. सध्याची हाफ साडी म्हणून हा प्रकार ट्राय करता येईल. पदराचा भाग एका साडीचा व निरीचा भाग एका साडीचा अशा दोन साडय़ा स्टिच करून डिझायनर साडी करता येते. साडीची बॉर्डरही तुम्ही बदलू शकता. फ्लोरल निरी व प्लेन पल्लू, चेक्सच्या निरी, प्लेन पल्लू असे बरेच प्रयोग मिक्स साडीत करता येतील. जुन्या दुपट्टय़ांचाही वापर मिक्स साडीसाठी करता येऊ शकतो.
4) आपल्याकडे गोधडी ही पॅचवर्क कलेचे सुंदर उदाहरण आहे. जुन्या साडय़ांपासूनच गोधडी शिवली जाते. तोच फंडा ट्राय करायचाय, फक्त साडीला गोधडी लूक नाही द्यायचाय. साडीला एखाद्या ठिकाणी भोक पडलेले असेल किंवा मग धागे निघून मोकळी दिसत असेल तर त्या भागावर दुस:या रंगाच्या कापडाचा पॅच लावून डिझायनर लूक देता येईल. मात्र हे पॅचवर्ककरताना साडीवर अन्य भागावरही काही अंतरावर, पदरावर किंवा शोल्डरवर पॅच लावताना कलात्मकता जपल्यास साडीचा लूकच बदलून जाईल. हे पॅच कॉटन, सिल्क कापड, जरदोसी वर्क, वूलन वर्कचे असू शकतात.
5) घरात बघा वेळोवेळी आणलेल्या काही लेस असतील. कटवर्क, मिररवर्क, वेल्वेट, कच्छी भरतकाम, जरदोसी, मोतीवर्क अशा असंख्य डिझाइन्सच्या लेसेस एरव्ही मिळतात. त्या शोधून जुन्या साडय़ांना लावल्यासही साडीचा मेकओव्हर अगदी सहज, काही मिनिटातच करता येतो.
6) काही जुन्या प्लेन शिफॉन, सिल्कच्या साडय़ांवर स्टोनवर्कतसेच भरतकाम करूनही तिला नवी बनवता येईल. तुम्हाला स्वत:ला भरतकाम करता येत नसेल तर ते ऑनलाइन व्हिडीओ पाहूनही सहज शिकता येईल.
7) असं याचं काढं, त्याला जोड अशा भन्नाट आयडियाज वापरूनच अनेक डिझायनर साडय़ा बनतात. जुन्यातून नवं करण्याची ही कला यानिमित्तानं जगून घेऊ!
(सारिका मुक्त पत्रकार आहे.)