coronavirus : work from homeने चिडचिडला आहात ? काम संपतच नाही ?- हे घ्या  उपाय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 04:53 PM2020-04-02T16:53:26+5:302020-04-02T17:00:17+5:30

वर्क फ्रॉम होम एकदमच आपल्या अंगावर येऊन आदळलं. त्यात नेटची जा-ये, विजेचा लपंडाव लहान घरं आणि कलकलाट हे सारं स्वीकारण्यावाचून काही पर्याय आहे का?

coronavirus: how to deal with work from home? | coronavirus : work from homeने चिडचिडला आहात ? काम संपतच नाही ?- हे घ्या  उपाय 

coronavirus : work from homeने चिडचिडला आहात ? काम संपतच नाही ?- हे घ्या  उपाय 

Next
ठळक मुद्देवर्क फ्रॉम होम नावाच्या कलकलाटाची घर घर की कहानी!

- गौरी पटवर्धन

‘शी!’ - प्राची मोठय़ांदा ओरडली.
‘काय झालं?’ सोहम इतका दचकला की त्याच्या हातातला टॉवेल खाली पडला.
‘टॉवेल तसाच काय वाळत टाकतोयस?’
‘का?’
‘का काय? धुवायला टाक तो. घाणोरडा कुठला.’
‘कोण घाणोरडा? मी का टॉवेल?’
‘फालतूपणा करू नकोस. टॉवेल धुवायला टाक.’
‘अगं पण का?’ बायको इतकी का चिडचिड करतीये तेच सोहमच्या लक्षात येईना. शेवटी तिने रागारागात त्याचा टॉवेल धुवायच्या बादलीत टाकला.
‘अगं काय करतेस? परवाच धुतलाय तो.’
‘मग? टॉवेल रोज धुवायचा असतो.’
‘असं कोण म्हणो?’
‘कोण म्हणो काय? काही हायजिन वगैरे आहे की नाही तुला?’
सोहम अजूनही बुचकळ्यात पडलेलाच होता. त्यांच्या लग्नाला सहा महिने होऊन गेले होते. आजवर हा विषय कधीच चर्चेला आलेला नव्हता. इन फॅक्ट आपण इतर नव:यांसारखे ओला टॉवेल बेडवर टाकत नाही याबद्दल त्याने अनेकदा स्वत:ला मनातल्या मनात शाब्बासकी दिलेली होती. आणि आता हे प्राचीने नवीनच काहीतरी काढलं होतं.
‘याच्यात कसलं आलंय हायजिन?’
‘नाही कसं? अंग पुसलेला टॉवेल तसाच वाळवून परत वापरायचा?’ 
आणि मग तिच्या एकदम लक्षात आलं, ‘ईईईईई!  म्हणजे तू रोज असंच करतोस?’
‘अर्थात!’ रोज प्राची नऊला घरातून निघायची आणि तो दहाला. त्यामुळे त्याचा टॉवेल हा विषय कधी चर्चेला आलाच नव्हता.
‘मला असला घाणोरडेपणा चालणार नाही. मी रोज टॉवेल धुवायला टाकते हे दिसतं ना तुला?’
‘तुला टाकायचा तर तू टाक ना. शिवाय तू पंचा वापरतेस. माझा टर्किश टॉवेल आहे. तो कसा रोज धुणार?’
‘मग तूपण पंचा वापर.’
‘प्राची हे अति होतंय हं!’
‘माझं अति होतंय? तूच अति करतोयस’

कोरोनाच्या कृपेने घरोघरी नवरा-बायकोला एकमेकांची नव्याने ओळख होते आहे. एरव्ही सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत एकमेकांचं तोंड बघायला लागत नव्हतं, ते आता अचानक एका घरात कोंडले गेले आहेत. बरं घरात कोंडले गेलेत म्हणून कामाला सुट्टी म्हणावी तर तसंही नाही. वर्कफ्रॉम होम आहेच.  म्हणजे ऑफिसातून कामाचा दट्टय़ा, साहेब तिकडे सतत सांगणार काळ वाईट आलाय, नोक:या सांभाळा. त्याचं प्रेशर. आणि घरात आपला नवरा किंवा बायको हे असे वागतात, याचं हे भलतंच दर्शन. त्यात घरकाम आहेच. सुरुवातीला मारे घेतलं वाटून, आता सुरूझाली टंगळमंगळ. म्हणजे झालंय असं की ना धड सुटी, ना धड आराम आणि कामांचा ढीग. डेडलाइनचं प्रेशर वाढतच चाललंय. आणि ते प्रेशर बाहेर काढण्यासाठी तरी घरातल्या लोकांपासून कुठेतरी दूर जाऊन येऊ म्हटलं तर तेही करण्याची सोय उरलेली नाहीये.
या वर्क फ्रॉम होमचं म्हणजे असं झालंय की म्हणायला घरी, पण काम अखंड. डोकं भणभणलेलं आणि नात्यांत तणाव अकारण. म्हणजे लहानशा गोष्टी ज्या एरव्ही लक्षात येत नाहीत, त्या सध्या घरीच असल्याने खुपायला लागल्या आहेत.
त्यामुळे कधी एकदा ते ऑफिसचं रुटीन सुरूहोईल असं अनेकांना होऊ लागलं आहे. वर्क फ्रॉम अंगावरच येऊन आदळलं आहे. खरं तर एरव्ही ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचं स्वप्न बघणा:या मंडळींना आता त्या संधीचा फायदा का घेता येत नाहीये? तर त्यात बहुतेक सगळे लोक एकाच ट्रॅपमध्ये अडकताना दिसतायत. वर्कफ्रॉम होम आणि सुटी याची मजबूत गल्लत त्यांच्या आणि त्यांच्या घरच्यांच्या मनात झालेली दिसते आहे. तर तसं होऊ नये आणि जे काही पुढचे दिवस आपल्याला वर्क फ्रॉम होम करायचं आहे, त्याची ट्रिक आपल्याला जमो. म्हणून करायच्या या काही गोष्टी. या ढोबळ आहेत, शेवटी तुमच्या चक्रव्यूहातून तुमचा मार्ग तुम्हालाच काढायचा आहे.
शुभेच्छा!

वर्क फ्रॉम होम? हे करून पाहा.


1. सगळ्यात आधी, वर्कफ्रॉम होममधला ‘फ्रॉम होम’ हा शब्द आपण आपल्या मनात तरी खोडून टाकला पाहिजे. ते आपलं काम आहे आणि ते शंभर टक्के कार्यक्षमतेने केलंच पाहिजे.
2. घरात एक जागा आपलं वर्कस्टेशन बनवा. तिथलं वातावरण शक्यतो ऑफिससारखंच राहील याची खबरदारी घ्या. 
3. घरातली जी इतर कामं आपण ऑफिसच्या वेळेच्या आधी आवरतो ती त्याच वेळेत आवरा. फिजिकली जरी ऑफिस आणि घर वेगळं करता येत नसलं तरी निदान घडय़ाळात त्याचे कप्पे स्वतंत्र ठेवा.
4. कामाच्या वेळात सोशल मीडिया स्ट्रिक्टली बंद ठेवा. त्यात भयंकर वेळ जातो.
5. घरातली इतर डिस्ट्रॅक्शन्स शोधून काढा. त्यापासून स्वत:ला वाचवा.
6. घरातल्या लहान मुलांना परिस्थिती समजावून सांगा. काही गोष्टी ते अॅड्जस्ट करू शकतात. 
7. होता होईल तोवर आपलं टाइमटेबल बिघडू देऊ नका. 
8. हे सगळं केल्याच्या नंतर एरव्ही प्रवासात आणि ऑफिसच्या तयारीत खर्च होणारा वेळ तुमच्या हाताशी जास्तीचा उरेल. तो वेळ तुम्हाला पाहिजे तसा खर्च करा.
9. मुख्य म्हणजे घरातल्या सगळ्यांनी घरातली कामं करा. आणि काही कामं आपल्याला जमणार नसतील, एखाद्या दिवशी ऑफिसचं काम जास्त असेल तर घरात तसं सांगा.
1क्. लहान घरं, सतत नेटचं जाणं-येणं, विजेचा लपंडाव, त्यानं होणारा मनस्ताप या गोष्टी अटळ म्हणून स्वीकारा. जे आपल्या हातातच नाही, त्याविषयी किती चिडणार. बाकी आपणही जाऊच लवकर ऑफिसला, असं सांगत राहा स्वत:ला!


( गौरी मुक्त पत्रकार आहे.)
 

Web Title: coronavirus: how to deal with work from home?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.