कोरोनकोंडीत चॅलेंजची गर्दी, घे की दे चॅलेंज हाच ऑनलाइन उद्योग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 06:30 IST2020-04-16T06:30:00+5:302020-04-16T06:30:06+5:30
कोरोना काळात जगभरात तरुण मुलं घरात आहेत, ते काय करत आहेत?

कोरोनकोंडीत चॅलेंजची गर्दी, घे की दे चॅलेंज हाच ऑनलाइन उद्योग
सारिका पूरकर-गुजराथी
हम तुम एक कमरे मे बंद हो. और चावी खो जाए..
बॉबी चित्नपटातील या गाण्याच्या ओळी आज प्रत्यक्षात उतरल्या आहे.
सगळं जगच घरबंद झालं. आणि कोरोनाच्या कुलपाची चावी सापडेल तेव्हा सापडेल अशी गत आहे.
एरव्ही घरात पाय नसतो तरुण मुलांचा. दोस्तांचे अड्डे हेच घर, जेवण्यापुरतं (तेही कधीतरी) घर आणि रात्री झोपायची सोय.
बाकी घरातले काही का म्हणोनात, आपण बाहेरच असं एकूण आयुष्य होतं. (जे घरकोंबडे होते, ते अपवाद आणि क्षमस्व.)
पण मग आज जगभरात तरुण मुलं घरबंद आहेत, तर ते काय करत आहेत, हे जरा शोधून पाहिलं.
त्यात या काही गोष्टी दिसतात.
बहुदा सगळीच तरुण मुलं घरात आहेत, आणि बाहेर जाऊन मदतकार्य करणारेही आहेतच.
मात्र बहुसंख्य घरात आहेत, कारण घरात राहणंच अपेक्षित आहेत.
त्यात सध्या ही मुलं काय करतात.
1.
सोशल मीडिया, त्यावर दोस्त, झूम, डय़ुओसारखे अॅप्स, त्यावरच्या लांबलचक गप्पा हे तर कॉमन आहे.
त्यात अजून कॉमन आहे सोशल मीडियात चॅलेंज.
अगदी खाण्यापिण्याच्या पदार्थापासून ते कपडे, घरातली कामं, कविता असं सतत चॅलेंज घेणं-देणं सुरू आहे. दालगोना कॉफी नावाचं प्रकरण गेल्याच आठवडय़ात जगभर गाजलं.
कोरोना कॉमेडी हा प्रकारही सध्या भयंकर चर्चेत आहेत. त्यात गाण्याच्या विडंबनापासून मिम्सर्पयत वाट्टेल ते उद्योग केले जात आहेत. एकीकडे टिकटॉकचा वापर जगभर वाढला आहे.
साधं दालगोना कॉफीचं उदाहरण घ्या, जंग इल वू या दक्षिण कोरियातील अभिनेत्याने या कॉफीचे प्रात्यक्षिक मध्यंतरी दाखवलं आणि हा ट्रेंड हिट झाला. भारतातही सोशल मीडियावर जुने फोटोज अपलोड करून त्यावर यमक जुळवण्याचा ट्रेंड बरेच दिवस फॉलो केला गेला. भारतात युवतींनी साडीतील फोटो, लाइफ पार्टनरसोबतचा फोटो टाकण्याचे चॅलेंजही चालवले. तरुणाई आज घरातूनच हातात एक-एक शब्दाचा बोर्ड घेऊन फोटो काढतेय व त्या फोटोंचा कोलाज करून शुभेच्छा देण्याचा ट्रेंडही चालवतेय. डेटसाठी भेटणारे आता डेटिंग अॅपद्वारे व्हच्र्युअल डेटिंग करतेय.
2. लेटर ऑफ होप नावाचा एक ट्रेण्डही आहे. ही आजीआजोबांना लिहायची पत्रं होती. कारण ते हाय रिस्क झोनमध्ये आहेत. आता मात्र आपल्याजवळच्या, आवडत्या माणसांना ही पत्रं लिहावीत, त्यानं उमेद वाढावी असेही प्रयत्न हॅशटॅग लेटर ऑफ होप लावून होताना दिसतात.
3. व्यायाम अनेकजण करू लागलेत या काळात. अनेक जण यू-टय़ूबवर व्हिडीओ पाहून व्यायाम करत आहेत. एकमेकांसोबत टायमिंग चॅलेंज लावत आहेत.
स्पेनमधील सेविले येथे राहणारा सानो सेविला हा फिटनेस इन्स्ट्रक्टर आहे. लॉकडाउन काळात तो त्याच्या घराच्या गच्चीवर वर्कआउट करतोय व त्याचे शेजारी बाल्कनीत उभे राहून, त्याचे व्यायाम पाहून त्याला फॉलो करताय. आहे की नाही गंमत? स्पेनमध्ये युवक त्यांच्या बाल्कनीत उभे राहून कोणी गिटार वाजव तर त्याच्या जोडीला कोणी बासरी वाजव, अशी मस्त मैफल सजवताहेत. नागरिकांना सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसताहेत. भारतातदेखील अनेकजण योगासनांचे व्हिडीओ, वर्कआउटचे व्हिडीओ शेअर करकरून इतरांना ‘जे’ अर्थात जेलस करवत आहेत. सोशल मीडियाच्या जगात हा असा तरुण धुमाकूळ रंगला आहे.
(सारिका मुक्त पत्रकार आहे.)